गर्भधारणा हा बहुतेक स्त्रियांसाठी आयुष्यातील एक आनंदाचा क्षण असतो. पण यासोबत गर्भधारणेदरम्यान अनेक समस्या जाणवतात. ज्यामुळे ते ९ महिने प्रत्येक महिलेला काही वेदना सहन कराव्या लागतात. गर्भधारणेदरम्यान शरीरात खूप वेगाने बदल घडत असतात. यामुळे महिलांना आरामदायी वाटणे थोडे कठीण होते. यात मळमळ, चक्कर येणे, अस्वस्थ वाढू लागते. यासोबतचं गर्भधारणेदरम्यान महिलांचे पाय खूप सुजतात.
गरोदरपणात ही सामान्य बाब आहे. सुरुवातीच्या महिन्यात ही सूज पाहून अंदाज येत नाही. पण तेव्हा स्वत:चीच चप्पल जेव्हा घट्ट होते तेव्हा लक्षात येत की, पायाला सूज आली आहे. गरोदरपणात कोणत्याही टप्प्यात सूज येऊ शकते. पण तिसऱ्या महिन्यात ही सूज तीव्र होऊ शकते.
गरोदरपणात शरीरातील हार्मोन्स सतत बदल असतात. यावेळी शरीर अधिक पाणी आणि द्रवपदार्थ शोषून घेते. यात पोटात वाढणाऱ्या बाळाच्या वजनाचा तुमच्या पायांवरील नसांवर दाब येतो. यामुळे नसांमधील रक्तप्रवाह मंदावतो आणि रक्तवाहिन्यांना ह्रदयाकडे रक्त पाठवणे कठीण होते. ज्यामुळे सर्व वजनाचा भार तुमच्या पायावर येतो आणि पाय सुजतात. यात काळजीच कारण नाही. पण यामुळे खूप अस्वस्थ वाटू शकते.
गुडघे आणि पायांच्या आसपास सूज येणे सामान्य मानले जाते. गर्भवती महिलांच्या पायांना सहसा सकाळी सूज येते, दिवसभर ती आणखी वाढते पण योग्य विश्रांती घेतल्यास सूज कमी होते. गरम हवामान, असंतुलित आहार, कॅफिन ओव्हरडोज, पाणी कमी पिणे आणि जास्त वेळ उभे रहाणे ही देखील पाय सुजण्यामागची कारणं सांगितली जातात.
कशी काळजी घ्यावी?
योग्य विश्रांती घेऊनही सूज कमी होत नसेल, तर त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच फक्त एका पायाला सूज येत असेल आणि श्वास घेण्यास त्रास, चक्कर येणे, दृष्टी धूसर होणे, छातीत दुखणे आणि डोकेदुखीचा त्रास होत असेल तर त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे.
स्त्रीरोग आणि IVF मधील सल्लागार डॉ. आरती अधे यांनी इंडिया टीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, गर्भधारणेदरम्यान महिलेच्या पायांना हलकी सूज येत असेल, तर तिने रोजच्या रुटीनमध्ये थोडे बदले केले पाहिजेत. ज्यामुळे सूज कमी होण्यास मदत होईल. यात काही सोप्पे उपाय आहेत ज्यामुळे पायांची सूज कमी होऊ शकतेय.
मीठाचा वापर कमी करा.
पाय सूज कमी करण्याचा योग्य उपाय म्हणजे मीठाचे सेवन कमी करणे, मीठ शरीरात अतिरिक्त पाणी साठवते, यामुळे शरीरात जळजळ वाढते. सोडियमचे प्रमाण वाढसे की शरीरास सूज येऊ शकते.
पोटॅशियम असलेले पदार्थ सेवन करा
तुमच्या आहारात पोटॅशियमयुक्त पदार्थांचा समावेश करा, जसे की केळी, पालक, बटाटे, बीन्स, पालक, रताळे, दही डाळिंब आणि संत्री यांसारखी फळे, ज्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते.
कॉफीचे सेवन कमी करा.
गरोदरपणात महिला आणि तिच्या बाळाच्या आरोग्यासाठी कॉफी हानिकारक असते. कारण कॉफीमुळे सतत लघवी होते. यामुळे शरीर लघवीच्या रुपात द्रव बाहेर टाकते परिणामी शरीरातील पाणी साठवण्याची प्रवृत्ती वाढते. ब्लॅक कॉफीऐवजी दुधाची कॉफी किंवा हर्बल चहाचे सेवन करणे आरोग्यासाठी आणि पायाच्या सुजेवर फायदेशीर ठरेल.
भरपूर पाणी प्या.
शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी पुरेसे पाणी प्या. शरीरात पाण्याची कमतरता भासते म्हणून द्रव जमा होत असते. अशावेळी तुम्ही भरपूर पाणी प्यालात तर डिहायड्रेशन होणार नाही. यामुळे शरीरात साचलेला द्रव हळूहळू बाहेर पडेल. यामुळे पायांची सूज कमी होण्यास मदत होईल.
पायांना आराम द्या.
जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा उशीने तुमचे पाय उशीवर ठेवा. तसेच सूज नियंत्रणात आणण्यासाठी रात्री आठ तासांची झोप घ्या. जेव्हा तुम्ही बसता तेव्हा पाय समोर पसरून बसा.
हाता, पायांना सूज येणे ही गरोदरपणात सामान्य बाब आहे. पण शरीरातील बदलांवर लक्ष ठेवून राहायला हवं. तसेच शरीराची अतिरिक्त काळजी घेतली पाहिजे आणि नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.