Diabetes Cure Vegetables औषधाविना उपचार – आपल्या दैनंदिन आहारातील भाज्यांकडे आपण केवळ पोषक आहार म्हणून पाहातो. परंतु, अनेक भाज्या अशा आहेत की, ज्या केवळ पोषणाचेच नव्हे तर आपल्या विकारांवर थेट उपचार करण्याचेही काम करतात. म्हणूनच औषधाविना उपचार या मालिकेत त्यांचा समावेश आवर्जून केला आहे. त्यांची गुणवैशिष्ट्ये खालीलप्रमाणे-
तांबडा भोपळा
तांबडा भोपळा बालकांकरिता टॉनिक आहे. पचावयास हलका, शिजवायला सोपा, सोबत कोथिंबीर, मिरची मीठ एवढी तोंडीलावणी पुरते. तांबडा भोपळ्याची भाजी खाल्ली की, तोंडाला रुची येते. रसधातू कमी झाला असता ही भाजी अवश्य खावी. हा भोपळा शुक्रवर्धक आहे. नेहमी उकडून खावा. एकदम खूप खाऊ नये. भस्मकाग्री किंवा ज्यांना कितीही खाल्ले तरी भूक असते, त्यांनी तांबडा भोपळा अवश्य खावा. तांबडा भोपळा उकडून कणकेत मिसळून केलेल्या दशम्या लांबच्या प्रवासात उपयुक्त आहेत, त्या बरेच दिवस टिकतात. बियांतील मगज पौष्टिक व चविष्ट आहे. जंत झाल्यास या बिया खाव्या, नंतर एखादे रेचक घ्यावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुध्या भोपळा

‘आमचे वाढते वजन’ कमी करा, आम्ही काही खातपित नसूनही वजन कसे वाढत नाही कळत नाही. किती औषधे घेतली तरी शरीर हटत नाही.’ अशा एक ना अनेक गोष्टी मी दिवसातून पाच- दहा रुग्णांच्या तोंडून तरी ऐकतो.
वजन घटवायचे ठरवले तर त्याकरिता उपाय आहे. सोपा उपाय आहे. पण तो नेटाने केला पाहिजे. दुध्या भोपळा सर्वांच्या परिचयाचा आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यांत तरी मुबलक, सदासर्वदा व स्वस्तात ताजा मिळतो. दुध्याची भाजी पथ्यकर आहे. दुध्या हलवा उत्तम बनतो. शरीर ज्यावेळी क्षीण होते, शरीरातील रसधातू क्षीण होतो, त्यावेळेस दुध्याचा रस, भाजी, खीर व हलवा यासारखे टॉनिक नाही. रसक्षय झाल्यामळे शब्द सहन होत नाहीत. राग लवकर येतो. झोप अशांत लागते, हातापायाला भेगा पडतात, मानसिक ताण वाढतो. अशा वेळेस दुध्या भोपळ्याला चांगल्या तुपात परतून घेऊन, उत्तम दर्जाच्या दुधात खीर करून खावी.

ब्लडशुगर वाढत नाही

मात्र ज्यांना दमा, सर्दी, पातळ परसाकडे होणे या तक्रारी आहेत त्यांनी दुध्या भोपळ्या रस, खीर किंवा हलवा खाऊ नये. माफक प्रमाणात भाजी खावी. शरीरात फाजील कफ असणाऱ्या कृश व्यतींनी दुध्या भोपळ्याबरोबर, आले, लसूण, जिरे, मिरी अशी वाजवी तोंडीलावणी तारतम्याने वापरावी. मधुमेह विकारात दुध्या भोपळा आवर्जून खावा. गोड पदार्थ खाल्ल्याचे समाधान लाभते. ब्लडशुगर वाढत नाही. या भाजीचा कंटाळा येत नाही. ज्या लहान मुलांना शौचाला साफ होत नाही, कृश आहेत अशांना पाव ते अर्धा कप दुध्या भोपळ्याचा रस चवीपुरता साखर मिसळून द्याावा. किरकिरी, हातपाय रुक्ष असणारी कडांगी किंवा कडकी असणाऱ्या लहान मुलांना वजन वाढविण्याकरिता दुध्याची खीर द्याावी.

दोडका

दोडका हा शिराळे, कोशातकी या नावांनीही ओळखला जातो. फार पूर्वी रानावनात वेलीवर मिळणाऱ्या दोडक्यांचा उलटी व जुलाबाचे औषध म्हणून आयुर्वेदात मोठा वापर केला जात असे. या दोडक्यांची चव कडू असते. बियांचा औषधी उपयोग आहे. दमा, खोकला, कफ, आम्लपित्त, पोटदुखी, पोटफुगी या विकारात या बियांचे चूर्ण किंवा काढा उपयुक्त आहे. त्यामुळे प्रथम उलटी होते किंवा नंतर जुलाबाद्वारे कफ बाहेर पडतो.

आज बाजारात उपलब्ध असणाऱ्या गोड दोडक्यातही औषधी गुण भरपूर आहेत. दोडका ही पथ्यकर भाजी आहे. मधुमेह व स्थौल्य या विकारात दोडका दुध्या भोपळ्याप्रमाणेच उकडून खावा. पाय दुखणे, मलावरोध, अग्निमांद्य, खडा होणे, पोट फुगणे, उष्णतेशी सतत काम असण्यामुळे येणारा थकवा, लघवी कमी होणे, थोडी थोडी लघवी होणे, तिडीक मारणे या विकारात दोडक्याच्या फोडी, भाजी किंवा रस उपयुक्त आहे. अरुची, खोकला, कप, कृमी व ताप या विकारात दोडका पथ्यकर पालेभाजी आहे. कृश व्यक्तींना वजन वाढविण्याकरिता दोडका उपयुक्त आहे. दोडक्याच्या मुळांचा उपयोग मूतखडा पडून जाण्याकरिता होतो.

आमांश, जुलाब, मंदाग्नी, पोटदुखी या विकारात रुग्णांनी दोडका टाळावा. दोडक्याच्या शिरांची किसून तीळ मिसळून फोडणी देऊन चटणी करावी. दोन घास अन्न जास्त जाते.

नवलकोल

कोबी व फ्लॉवरपेक्षा कोवळा नवलकोल ही उत्तम भाजी होय. गुणाने शीत असून पित्तशामक व पथ्थकर आहे.

पडवळ

प्राचीन काळापासून पडवळ, कडू पडवळ अनुक्रमे भाजी व औषधी उपयोगाकरिता वापरात आहे. पडवळ फळ, पाने तसेच सर्व पंचांग औषधी उपयुक्ततेचे आहे. पडवळ गुणाने थंड असूनही वातवर्धक किंवा कफवर्धक आहे. पडवळ तीनही दोषांच्या विकारांत उपयुक्त आहे. जास्त उपयोग कफ व पित्तविकारात आहे.

धुमेहावर गुणकारी

कफाचे विकार विशेषत: तृप्ती, अन्न नकोसे वाटणे, भूक मंद असणे, रुची नसणे, खूप तहान लागणे, स्थौल्य, मधुमेह या विकारात पडवळाची भाजी उत्तम काम देते. पडवळ नुसते उकडावे. चवीपुरते जिरे, मिरी, धने, सुंठ अशी चूर्णे सोबत तोंडी लावणे म्हणून वापरावे. पोटाची भरपाई होते. अजीर्ण, अपचन होत नाही. शरीराचे वाजवी पोषण होते. सम्यक् मल तयार होतो. खूपच कफ होत असल्यास पडवळाचे तुकडे वाफारून त्यांचा रस कपभर घ्यावा. चवीपुरते जिरे व हिंग मिसळावे. ज्यांना खूप उष्णतेशी काम आहे, तीव्र ताप, चक्कर, भ्रम या लक्षणांचा वारंवार त्रास आहे, त्यांनी पडवळाची भाजी किंवा रस नियमित घ्यावा. गुळवेलीचे गुणधर्माशी सादृश्य असलेले पडवळाचे कार्य आहे. पडवळाच्या पानांचा रस उलट्या करवणे किंवा विरेचक म्हणून उपयोग आहे. थोड्या मोठ्या मात्रेने हा रस घ्यावा लागतो. लहान बालकांना तुलनेने लहान मात्रेत हा रस दिला तर त्यांच्या छातीतील साठलेला कफ पडून जातो. छाती मोकळी होते. दमा, खोकला याला उतार पडतो.

चाई पडली असता केस गेलेल्या जागी पडवळाच्या पानांचा वाटून चोथा बांधावा. पडवळ खाण्याकरिता कोवळेच पाहिजे बिया, जून झालेले पडवळ निरुपयोगी आहे. पथ्यकर पालेभाजी म्हणून आजारातून उठलेल्या, अशक्तांकरिता पडवळ चांगले काम देते. साध्या-सोप्या किरकोळ स्वरुपाच्या ज्वरात पडवळाच्या पंचगाचा काढा उपयुक्त आहे. अनुलोमनाचे कार्य करून तीनही दोष समस्थितीत आणण्याचे पडवळाचे कार्य गुळवेलीसारखे आहे. कडू पडवळाचे बी तीव्र रेचक व भेदनाचे कार्य करते. कडू पडवळाच्या बियांचे चूर्ण उदरविकार, कावीळ, शोथ या विकारात उपयुक्त आहे.