भात हा आपल्या देशातल्या लोकांच्या जेवणातला एक अनिवार्य पदार्थ आहे. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आणि पश्चिमेपासून पूर्वेपर्यंतच्या सगळ्या राज्यांमध्ये या ना त्या स्वरूपात भात खाल्ला जातो. शिवाय आपल्या देशाला मोठा सागरी किनारा लाभलेला आहे. किनारपट्टीवरच्या लोकांचं भात आणि मासे हे ठरलेलं जेवण असतंच. भारतात भाताच्या शेकडो जाती आढळतात. सामान्यपणे भारतीय घरांमध्ये पांढऱ्या तांदळाचा भात खाल्ला जातो. हे तांदूळ सहज शिजणारे आणि पचन होणारे असतात. पण तुम्हाला माहीत नसेल की, पांढऱ्या तांदळाऐवजी काळे, ब्राउन आणि लाल तांदूळही असतात ज्यांचे अनेक फायदे आहेत. विशेषतः दक्षिण भारतातील वंशपरंपरागत तांदळाच्या जाती या पौष्टिक आणि उपचारात्मक गुणधर्मांचा खजिना आहेत. त्यामुळे भात खाऊनही दक्षिण भारतातील लोकांचं वजन वाढत नाही.
मुख्य पोषणतज्ज्ञ, डॉ. प्रियंका रोहतगी यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना हा तांदूळ इतका उपचारात्मक कशामुळे होतो, याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. तांदळाच्या कोणत्या जातीचा काय फायदा आहे जाणून घेऊयात…
लाल तांदूळ
पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत रेड राइस तेवढं कॉमन नाहीये. हा राइस महाग असतो. तसेच दुकानांमध्ये फार कमी उपलब्ध असतो. पांढरे तांदूळ तुमच्या आरोग्यासाठी पूर्णपणे खराब ठरू शकत नाही, जर तुम्ही हे कमी प्रमाणात खाल्ले तरच. पण रेड राइस तुम्हाला सगळ्या स्थितीत फायदे देतो. पौष्टिक जेवण बनवण्यासाठी तुम्ही यात इतर पौष्टिक गोष्टींचं मिश्रण करू शकता. रेड राइसमध्ये अनेक अॅंटी-ऑक्सिडेंट असतात, जसे की सेलेनियम, व्हिटॅमिन सी आणि बिटा कॅरोटीन. लाल तांदळात फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स, अँथोसायनिन्स आणि फ्लेव्होनॉइड्स भरपूर असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. लाल तांदूळ हा एक सेंद्रिय तांदूळ आहे, जो पॉलिश केलेल्या पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत अधिक पौष्टिक असतो. लाल तांदळात जास्त प्रमाणात मॅंगनीज असते, ज्यामुळे संयोजी ऊतक आणि हाडे तयार होण्यास मदत होते. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठीदेखील उपयुक्त भूमिका बजावू शकते.
कैवरा सांब
ही एक भाताची जात आहे, जी अगदी कमी मातीतही वाढू शकते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, हा तांदूळ रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यास मदत करतो, म्हणूनच मधुमेह व्यवस्थापित करण्यासाठी याचा फायदा होतो.
कुरुवी कर
केरळमधील दुष्काळी भागात या तांदळाचं उत्पादन केलं जातं. यामध्ये सूक्ष्म पोषक तत्वे जास्त असतात आणि सामान्यतः आदिवासी समुदायात हा तांदूळ खाल्ला जातो.
पूंगार
हा एक गोड-सुगंधी तांदूळ आहे, जो विशेषत: तांदळाचे तुकडे बनवण्यासाठी आणि आंबवण्यासाठी पिकवला जातो. कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये हे स्त्रियांना गर्भधारणेदरम्यान दिले जाते. कारण गर्भधारणेदरम्यानच्या अनेक समस्या या तांदळाच्या सेवनानं टाळल्या जातात असे मानले जाते. तसेच यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते, कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि हिमोग्लोबिनही वाढवते.
कट्टू यनाम
उच्च फायबर असलेला लाल तांदूळ, शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतो. या तांदळाची चवही रुचकर आहे आणि तांदूळ ऊर्जेचा चांगला स्रोत आहे. हा तांदूळ पचायलाही हलका आहे.
कोलियाल
हा केरळमधील तपकिरी रंगाचा तांदूळ आहे, जो पुट्टू बनवण्यासाठी वापरला जातो. पुट्टू हा केरळमधील एक नाश्त्यातील पदार्थ आहे.
काळी कावुनी
तामिळनाडूतील हा आणखी एक भात आहे, ज्यामध्ये उच्च अँथोसायनिन घटक असल्यामुळे त्याचा रंग काळा-जांभळा असतो. हा तांदूळ शरीराला थंड ठेवतो, तसेच हृदयाच्या आरोग्यालाही हा फायदेशीर आहे. यकृताच्या आजारांवर उपचार करणाऱ्या गुणधर्मांसाठी मूळ अन्न औषधांमध्येही याचा समावेश केला जातो. मधुमेह असलेल्या लोकांना हा तांदूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.
करुण कुरुवई
या तांदळात प्रथिने आणि फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि सांधेदुखीचा सामना करण्यास मदत होते. त्यात अँटीऑक्सिडंट असतात, जे कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून रोखतात.
मपिल्लई सांबा
यामध्ये व्हिटॅमिन बी१ असते, जे पोट आणि तोंडाचे व्रण बरे करण्यास मदत करते. तसेच स्नायू आणि नसा मजबूत करते.
हेही वाचा >>Blood sugar control: रक्तातील साखर कमी करण्यासाठी करा ‘हे’ सोपे व्यायाम…शुगर राहील नियंत्रणात
केरळमधील तांदळाच्या विविध जातींचे हे आरोग्यदायी फायदे लक्षात घेता, हा कृषी वारसा आणि पारंपरिक शेतीचे जतन करणे किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येते.