Reducing Sitting Time by 40 Minutes has Health Benefits: ‘बीएमजे ओपन’मध्ये प्रकाशित झालेल्या २०२४ च्या एका अभ्यासात असं म्हटलंय की, दररोज नेहमी बसता त्यापेक्षा एक तास कमी वेळ बसल्याने पाठदुखी कमी होण्यास मदत होऊ शकते. थोडक्यात, तुम्ही दिवसभरात तुम्ही जेवढा वेळ बसता, त्यापेक्षा फक्त ४० मिनिटं कमी बसण्याची आवश्यकता आहे. सोपं वाटतंय ना? पण असं केल्यावर आपल्या शरीराच्या इतर भागांवर काय परिणाम होतो? जाणून घेऊ…
‘वेदा रिहॅबिलिटेशन अॅण्ड वेलनेस’चे वेलनेस तज्ज्ञ तुषार बिष्ट म्हणतात की, सतत बसून राहण्याच्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. कारण- खूप वेळ बसल्यामुळे रक्ताभिसरण मंद होते, ज्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. “हालचालीअभावी स्नायू व सांधे कमजोर होतात आणि त्यामुळे हाडांची घनता कमी होते. विशेषतः चुकीच्या पोश्चरमध्ये जास्त वेळ बसल्यास कंबरदुखी सुरू होते आणि कंबरेखालील स्नायू ताणले जातात,” असं ते सांगतात.
ते पुढे सांगतात की, शारीरिक हालचालींमुळे शरीरात एंडॉर्फिन (endorphins) नावाचं रसायन तयार होते, जे मानसिक आरोग्य सुधारतं. ते असंही म्हणतात की, कमी हालचाल केल्यानं मानसिक समस्यांचं प्रमाण वाढतं. जर आपण सतत निष्क्रिय राहिलो, तर कालांतरानं वजन वाढू शकतं. कारण- शरीराची जेव्हा हालचाल होत नाही तेव्हा कमी उष्मांक (कॅलरीज) वापरले जातात.
बसण्याचं प्रमाण दररोज ४० मिनिटांनी जरी कमी केलं, तर शरीरावर काय परिणाम?
बिष्ट सांगतात की, फक्त ४० मिनिटांनी बसण्याचा एकंदर वेळ कमी केल्यानं शरीरात रक्ताभिसरण सुधारतं, रक्तदाब कमी होतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. “अॅक्टिव्ह राहिल्यानं वजन नियंत्रणात ठेवायला मदत होते आणि डायबिटीजसारखे मेटाबॉलिक आजार होण्याचा धोका कमी होतो,” असं त्यांनी indianexpress.com ला सांगितलं. ते पुढे म्हणाले की, मन प्रसन्न वाटतं. लक्ष एकाग्र राहतं आणि अर्थातच पाठदुखीही कमी होते.
त्या ४० मिनिटांत तुम्ही काय करू शकता?
“सक्रिय विश्रांती (active breaks) खूप उपयोगी ठरतात. कारण- त्या शरीराला आरामाच्या स्थितीतून बाहेर काढतात आणि मन ताजं करतात. पाच ते सात मिनिटं शांतपणे, चालल्यास लक्ष परत केंद्रित होऊ लागतं आणि अभ्यासांनुसार यामुळे कामाची क्षमता वाढते,” असं बिष्ट म्हणाले.
ते असंही म्हणाले की, हालचाल असलेल्या इनडोअर गेम्समध्ये भाग घ्यावा, जसं की टेबल टेनिस. ऑफिसमध्ये असे खेळ ठेवले आणि फक्त पाच मिनिटांचा खेळही खेळला तरी त्यामुळे टीमवर्क वाढतं, माणसांमध्ये उत्साह निर्माण होतो, काम मजेशीर वाटतं आणि कामाची गुणवत्ता सुधारते.