मुक्ता चैतन्य
सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची रचना वापरकर्त्यांनी पुन्हा पुन्हा त्या प्लॅटफॉर्म्सवर यावी अशी केलेली आहे कारण तो एक व्यवसाय आहे. कुठलाही व्यवसाय चालायचा असेल तर ग्राहकाने फक्त एकदा येऊन भागत नाही तर परत परत यावं लागतं. दारुच्या दुकानांत, पान टपरीवर लोक पुन्हा पुन्हा जातात कारण तिथे मिळणाऱ्या गोष्टींच्या सेवनाची त्यांना सवय लागलेली असते. सुरुवातीला अवलंबत्व आणि मग व्यसन लागेलेलं असतं. तोच काहीसा प्रकार सोशल मीडियाच्या संदर्भात होतोय असं जगभरातल्या अनेक संशोधनातून पुढे येतंय. तिथे निर्माण होणारी ओळख, मिळणारं कौतुक, फॉलोअर्स याची मनाला, मेंदूला सवय लागली की त्यातून अवलंबत्व आणि पुढे जाऊन व्यसन लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण हे झालं जे पोस्ट्स करतात त्यांच्या संदर्भात. पण इंटरनेटच्या आणि सोशल मीडियाच्या जगात असाही प्रचंड मोठा समुदाय आहे जो तिथे खूप ऍक्टिव्ह नसतो. तो तिथे लव्ह, लाईक, व्ह्यूज, कौतुक यासाठी येत नाही तरीही त्याला सतत, पुन्हा पुन्हा इंटरनेटवर, सोशल मीडियावर यावंसं वाटतं. तो तिथे अडकून पडतो आणि हळूहळू व्यसनी होतो किंवा तशी शक्यता निर्माण होते. असं विविध कारणांमुळे होतं पण इंटरनेट प्रामुख्याने असा आभास निर्माण करतं की व्यक्ती काहीतरी करते आहे, प्रत्यक्षात ‘स्क्रोल’ करण्याव्यतिरिक्त पॅसिव्ह वापरकर्ते काहीच करत नसतात, पण आपण काहीतरी करतोय हा आभास मात्र निर्माण होतो.
आता मुलांच्या संदर्भात हे बघूया. गणितं सोडवण्याच्या सोप्या युक्त्या सांगणारे कितीतरी रील्स ऑनलाईन बघायला मिळतात. मुलं ते बघत असतात पण स्वतः गणितं सोडवण्याची वेळ आली की किती टक्के मुलं रील्स मधल्या गोष्टी लक्षात ठेवून करुन बघतात? किंवा रील्स बघत असताना एकीकडे कागदपेन घेऊन त्या युक्त्यांप्रमाणे एखाद दोन गणितं सोडवून बघतात? याचे प्रमाण कमी आहे. म्हणजे आपण गणित सोडवतोय, सोडवू शकतो, या युक्त्या वापरून आपण चटकन अभ्यास संपवणार आहोत हे विचार मनात असतात पण प्रत्यक्ष कृती घडतेच असं नाही. मुलांच्या बाबतीत हे सातत्याने होत राहिलं तर त्याचे दीर्घकालीन विपरीत परिणाम होऊ शकतात.
हेही वाचा >>>हिवाळ्यात कानदुखीचा खूप त्रास होतोय? मग करा ‘हे’ आठ सोपे उपाय, काही मिनिटांत मिळेल आराम
सोशल मीडियाच्या व्यसनातून किंवा अवलंबत्वातून जे प्रश्न मुलांच्या संदर्भात तयार होतायेत त्यातला अजून एक गंभीर प्रश्न म्हणजे त्यांना त्यांचं सगळं जग ऑनलाईन विश्व वाटतंय. ते ज्या घरात, शहरात, देशात राहतात त्याच्याशी त्यांचा कनेक्ट तुटलेला आहे असं नाही पण खऱ्या जगापेक्षा ऑनलाईन जगावर त्यांचा जास्त विश्वास आहे, जे धोकादायक असू शकतं. मुलांच्या कार्यशाळेत मुलं अनेकदा सांगतात की पूर्वी वाचन जास्त होतं आता फोनमुळे वाचनच होत नाही, हस्तकला करण्याचा कंटाळा येतो, मैदानावर खेळायला जावंसं वाटत नाही, रील्स खूप बघतो पण लक्षात राहत नाही, अभ्यास करायचा असतो पण कंटाळा येतो, एकाग्रता नाहीये.. सोशल मीडिया आणि इंटरनेटचे विविध स्तरीय परिणाम मुलांवर होतायेत. त्यातला अजून एक प्रकार म्हणजे शरीराविषयी विविध कल्पना. विशेषतः इन्स्टाग्राम हा व्हिज्युअल सोशल मीडिया असल्याने मोठ्या प्रमाणावर फिल्टर्स वापरले जातात. शिवाय ऑनलाईन जगात जे काही दिसतंय ते खरं आणि की खोटं हे तपासण्याची कुठलीही व्यवस्था नाही. विशेषतः इन्फ्लुएन्सर्सच्या जगात. त्यामुळे इन्फ्लुएन्सर्स जे सांगतायत ते खरं मानण्याकडे मुलांचा प्रचंड कल दिसून येतो. मग ते सौंदर्याच्या, देहाच्या आकाराच्या कल्पना असोत नाहीतर राजकीय विषय. त्यामुळे स्वतःविषयी, समाजाविषयी चुकीच्या धारणा आणि कल्पना विकसित होण्याचा धोका मुलांना असतो. वर म्हटल्याप्रमाणे मुलांच्या ऑनलाईन जगावर अधिक विश्वास आहे त्यामुळेच अर्थात त्यांच्या संदर्भात सायबर गुन्हेही मोठ्या प्रमाणावर घडतात. सायबर बुलिंग पासून सेक्सटॉर्शन पर्यंत अनेक धोके मुलांना ऑनलाईन जगात आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठीच्या कुठल्याही योजना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स विकसित करणाऱ्या कंपन्यांकडे नाहीत. सध्या अमेरिकेत जो वाद सुरु आहे आणि मार्क झ्युकरबर्गने पालकांची माफी मागितली ती याच सगळ्या मुद्यांमुळे.
सोशल मीडिया मुलांसाठी हानीकारक आहे हे वेळोवेळी सिद्ध होतंय. मुळात प्रत्येक गोष्ट करण्याचं वय असतं, तसंच ते सोशल मीडिया वापरण्याचंही. याचा गांभीर्याने विचार पालक आणि सरकार यांनी करायला हवा आहे.