डॉ. शशांक सामक आणि डॉ. जेसिका सामक
लग्नापूर्वीच, लग्न म्हणजे काय इथपासून लग्नामधील सेक्सची जबाबदारी याची जाणीव संबंधित दोघांनाही करून देणे आवश्यक आहे. बहुतेक नवविवाहितांचे संसार मोडण्यात ही जबाबदारी दुर्लक्षित केलेली किंवा झिडकारलेली असते. मग कोर्टात आरोप-प्रत्यारोपांचे रान उठवले जाते. ते टाळता येऊ शकते.
मनीषा आणि मनीष यांच्या लग्नाला आता सहा वर्षे होत आली होती. या सहा वर्षांमध्ये जसा पाहिजे तसा, खरं म्हणजे जवळजवळ नाही म्हटलं तरी चालेल, या दोघांचा संबंधच आला नव्हता. किंबहुना प्रयत्न करायलासुद्धा मनीषची तयारी नसायची. मनीषा पूर्ण हताश होऊन, सर्व उपाय(?) करून, थकून, शेवटचा पर्याय म्हणून धाडसाने मनीषला एका ‘सेक्सॉलॉजिस्टकडे’ घेऊन आली होती. तिला मनीषचे मन तयार करायला किती कष्ट पडले हे तिचे तिलाच ठाऊक, हेही तिने त्याच्यासमोरच बोलून दाखवले.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

मनीषला पहिल्यापासूनच मनीषाबरोबर सेक्स करायचा प्रयत्न करणे हेसुद्धा चमत्कारिक(!) वाटत होतं. काय गंमत होती बघा, ज्या मनीषाला त्यानेच पसंत करून मागणी घातली होती आणि जिने मोठ्या आनंदाने एका राजबिंड्याबरोबर संसार करायला आपली संमती दिली होती, त्या दोघांच्या आयुष्यात पुढे असे काही घडेल, खरे म्हणजे ‘असे काही’ घडणार नाही, असे स्वप्नातही त्यांना, विशेषत: तिला, वाटले नव्हते.

सुरुवातीचे संकोचाचे दिवस सरल्यानंतरही मनीष कुठलाच पुढाकार घेत नव्हता याचे मनीषाला प्रचंड आश्चर्य वाटत होते. तिला जरी स्त्रीसुलभ कामलज्जा वाटली तरी मनीषला मात्र पुरुषसुलभ कामातुरता वाटायलाच पाहिजे, असे तिचे ठाम मत होते. पण नंतर कधीच तसे ‘काही’ घडले नाही, घडतही नव्हते. या ना त्या कारणाने मनीष सुरुवातीला ‘सेक्स’ला आणि नंतर तिलाही टाळू लागला. ऑफिसची कामे सांगून त्याचे टुरिंगला जाणे नित्याचे झाले होते. नाइलाजाने आठवडय़ातून एक दिवस घरी यायचा, मग झोपेत आणि उरलेल्या कामात वेळ घालवून दुसऱ्या दिवशीच्या भटकंतीला जायचा. असे कित्येक वर्षे चालले होते. जेव्हा जरा जास्त काळ घरी असायचा तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरून त्याला किती त्रासदायक वाटतंय हे मनीषाच्या लक्षात यायचे. सेक्स तर जाऊ दे, तो तिच्याबरोबर वेळही घालवत नव्हता. किरकोळ बोलणं घडायचं तेसुद्धा मनीषानेच विषय काढून सुरुवात केल्यानंतर!

काही वर्षांपूर्वीपासूनच मनीषावर तिच्या घरच्यांचे, मित्रपरिवाराचे, ‘गोड बातमी’साठीचे दडपण वाढले होते. मुळातच ‘तसे काही’ घडत नसल्याने आणि आता या दडपणाने मनीषाला तोंड दाबून बुक्क्यांचा मार मिळत होता. मनीषलाही त्याच्या घरच्यांचे दडपण सतावत होतेच, पण काय करायचे हे सुधरत नसल्याने तो वेळ मारून नेत होता, काळ पुढे जाऊ देत होता. माझ्या सल्ल्याप्रमाणे वागायचे त्याने मनीषाकडे मान्य केले होते.(अर्थात तो कितपत त्याला साथ देईल हा प्रश्नच होता!). पण आम्हा थेरपिस्ट आणि काउन्सेलर मंडळींकडे ‘सर, याला काउन्सेलिंग करा’ असे म्हणून कोणालाही आणले तर त्या व्यक्तीवर अशा काउन्सेलिंगचा काहीही परिणाम होत नसतो हे संबंधितांनी लक्षात ठेवले पाहिजे.

काउन्सेलिंग करून घेण्यासाठी ती व्यक्ती स्वत: प्रवृत्त व्हायला पाहिजे. तरच सुधारणा होऊ शकते, अन्यथा नाही. पुढील प्रत्येक भेटीत मनीष त्यांचे प्रयत्न व्यवस्थित चालले आहेत, असे मनीषासमोरच मला सांगत होता. मनीषाही काही गोष्टींना दुजोरा द्यायची. पण काही दिवसांतच तिने मला एकटे येऊन सांगितले की, मनीष माझ्यासमोर सर्व कबूल करायचा, पण प्रत्यक्षात काहीच करीत नव्हता. मी चकितच नाही तर थक्क झालो. मी तिला म्हटले, ‘अगं, तू त्याच्यासमोर मग दुजोरा का देत होतीस?’ तिने ओशाळून सांगितले की, मनीषचा इगो दुखवायला नको म्हणून. व्वा! मनीषाला काय म्हणावे हेच मला कळेना! मला वाटले मनीषपेक्षा हिलाच काउन्सेलिंगची खरी गरज आहे.

नेमकी त्याच काळात अशीच एक केस आली. आनंद आणि आनंदीची. मनीष-मनीषा केसमधील मनीषसारखाच आनंदकडूनही पुरेसा प्रयत्न होत नव्हता. शेवटी सेक्स-काउन्सेलिंग काय किंवा सेक्स-थेरपी काय यातील यश हे संबंधित जोडपं चार भिंतींच्या आत किती प्रयत्न करतं यावरच अवलंबून असतं. आम्ही केवळ मार्गदर्शक, शिक्षक, गुरू एवढीच भूमिका निभावत असतो… (क्रमश:)

(यापूर्वी चतुरंग पुरवणीत १६ मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झालेला लेख पुनर्प्रकाशित करत आहोत.)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relation between marriage sex importance of sex therapy psp