Disadvantages Of Remembering Every Details Of Life : एखादी वस्तू शोधत असताना आपल्या डोळ्यांसमोर दुसरीच वस्तू येते आणि आपण शोधत असलेली वस्तू विसरून ती दुसरी गोष्टच बघण्यात रमून जातो. पण, नंतर आठवते की, आपण काहीतरी वेगळेच शोधत होतो. मग घरच्यांकडून विचारणा होते की, ‘सापडली का ती वस्तू?’ तो प्रश्न ऐकताच आपल्याला आठवते की, आपण ज्या वस्तूचा शोध घेत होतो, ती शोधायचे विसरून गेलो आहोत. हेच तुम्ही परफेक्ट लक्षात ठेवणाऱ्या व्यक्तीस विचारले की, ‘ही अमुक अमुक गोष्ट कुठे आहे बघितलीस का?’ तर ती व्यक्ती न शोधताही ती वस्तू कुठे आहे ते अगदी सहज सांगते. आणखी स्पष्ट करून सांगायचे झाले, तर बहुतेक लोकांना आठवडाभरापूर्वी जेवणात काय खाल्ले हे आठवतसुद्धा नाही. पण, काही लोकांना अशा गोष्टी लक्षात राहतात किंवा त्या विसरणे त्यांच्यासाठी जवळजवळ अशक्य असते.
असामान्य स्मरणशक्ती (extraordinary memory) असलेल्या एका लेखिकेने अलीकडेच सांगितले की, तिला तिच्या आयुष्यातील प्रत्येक दिवसाची एकेक गोष्ट आठवते. ऑस्ट्रेलियामध्ये दिसलेल्या या महिलेला विचारण्यात आले की, तिच्यात ही दुर्मीळ क्षमता आहे का? त्यावर तिने उत्तर दिले, “५ फेब्रुवारी १९८० रोजी १४ वर्षांची झाल्यावर तिला आतापर्यंत तिच्या आयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट आठवते आणि मला खरोखर माहीत नाही की असे का घडते?”
महिलेच्या अनुभवावर विचार केल्यानंतर दी इंडियन एक्स्प्रेसने कंटेंट क्रिएटर डॉक्टर सेर्मेड मेझर यांच्याशी चर्चा केली. तेव्हा ते म्हणाले की, जर तुम्ही प्रयत्न करूनही आठवणी विसरू शकला नाहीत, तर तुम्हाला कसे वाटेल?
हायपरथायमेसिया किंवा हायली सुपीरियर ऑटोबायोग्राफिकल मेमरी (HSAM) म्हणून ओळखली जाणारी ही दुर्मीळ क्षमता व्यक्तींना अगदी अचूक, वैयक्तिक अनुभव लक्षात ठेवण्यास अनुमती देते. बहुतेकदा अगदी किरकोळ छोट्या छोट्या गोष्टींपर्यंत…, असे डॉक्टर मेझर यांनी व्हिडीओमध्ये नमूद केले. निर्दोष स्मरणशक्ती असणाऱ्या व्यक्तीच्या मेंदूत स्वतःच्या आव्हानांचा संच असतो.
तर, हायपरथायमेसिया असलेल्या व्यक्तीच्या मेंदूत नेमके काय घडते आणि ते सामान्य स्मृतीपेक्षा कसे वेगळे आहे?
सॅलुब्रिटास मेडसेंटरचे न्यूरोइम्युनोलॉजी व वरिष्ठ न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर कदम नागपाल यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, मेंदूतील अमिग्डा भावनांवर प्रक्रिया करण्यासाठी जबाबदार आहे आणि हिप्पोकॅम्पस आठवणी साठवण्यात, पुनर्प्राप्त करण्यात मोठी भूमिका बजावतात. तर हायपरथायमेसिया असलेल्या व्यक्तींमध्ये मेंदूचे काही भाग, विशेषतः अमिग्डाला आणि हिप्पोकॅम्पस, सामान्यतेपेक्षा अधिक सक्रिय आणि मोठे असतात. तर या फरकांमुळे, हायपरथायमेसिया असलेले लोक अनेक वर्षांपूर्वीच्या अगदी लहान लहान गोष्टीदेखील आठवू शकतात, जसे की त्यांनी विशिष्ट तारखेला काय घातले होते किंवा खाल्ले होते इत्यादी. त्यामुळे अशा व्यक्तींच्या आठवणी अधिक स्पष्ट आणि भावनिक असतात, ज्यामुळे त्यांना भूतकाळातील घटना पुन्हा आठवत असल्यासारखे वाटते.
आयुष्यातील प्रत्येक गोष्ट लक्षात राहण्याचे तोटे
सुरुवातीला हायपरथायमेसिया ही एक अद्भुत देणगी वाटू शकते; पण त्याचबरोबर तुम्हाला अनेक गोष्टींना सामोरेदेखील जावे लागते. सामान्य स्मरणशक्ती लोकांना कालांतराने वेदनादायक अनुभव विसरण्यास अनुमती देते; पण हायपरथायमेसिया असलेल्या व्यक्तींना सर्व गोष्टी अगदी स्पष्टपणे आठवतात. याचा अर्थ असा की, क्लेशकारक, दुःखद आठवणी ताज्या राहतात, ज्यामुळे त्यांना भूतकाळातील घटनांपासून स्वतःला मुक्त करणे किंवा पुढे जाणे कठीण होते, असे डॉक्टर नागपाल म्हणतात.
तसेच डॉक्टर पुढे असेही म्हणाले की, सतत इतकी माहिती आठवणे खूप कठीण असू शकते. हायपरथायमेसिया असलेल्या अनेक लोकांना मानसिक थकवा जाणवतो. कारण- त्यांचा मेंदू इच्छा नसतानाही सतत आठवणी पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे वर्तमानावर लक्ष केंद्रित करणेदेखील कठीण होऊ शकते. कारण- त्यांचे मन अनेकदा भूतकाळातील घटनांमध्ये अडकलेले असते. काही व्यक्तींच्या बाबतीत त्यांच्या सक्रिय स्मरणशक्तीमुळे झोपेच्या समस्या आणि चिंतादेखील उद्भवू शकते. तसेच हायपरथायमेसिया असलेल्या रुग्णांमध्येही ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डरसारखी लक्षणे आढळतात आणि आठवणींवर जास्त लक्ष केंद्रित केल्याने, विशेषतः अप्रिय आठवणी, झोपेवर विपरीत परिणाम, चिंता व नैराश्याचा धोका वाढू शकतो.
एचएसएएम (HSAM) असलेल्या व्यक्ती त्यांच्या स्मरणशक्तीला निवडकपणे काम करण्यास प्रशिक्षित करू शकतात का?
दुर्दैवाने हायपरथायमेसिया असलेले लोक त्यांच्या स्मरणशक्तीला निवडकपणे काम करण्यास प्रशिक्षित करू शकत नाहीत. त्यांच्या आठवणी अनैच्छिक (Involuntary) असतात म्हणजेच ते काय लक्षात ठेवायचे किंवा कधी लक्षात ठेवायचे हे निवडू शकत नाहीत. जेव्हा ते एखादी तारीख ऐकतात, एखादी परिचित वस्तू पाहतात किंवा विशिष्ट वास अनुभवतात तेव्हा त्यांच्या आठवणी आपोआप परत जागृत होतात किंवा त्यांना आठवू लागतात. हे सामान्य स्मृतीपेक्षा (normal memory) वेगळे आहे, जिथे लोकांना सहसा लक्ष केंद्रित करावे लागते आणि जाणूनबुजून माहिती आठवावी लागते.
काही व्यक्ती त्यांच्या स्मरणशक्तीमुळे होणारा ताण कमी करण्यासाठी विश्रांती किंवा मानसिक व्यायाम शिकू शकतात. पण, आठवणी आठवणे बंद करू शकत नाहीत किंवा अनावश्यक माहिती किंवा आठवण मेंदूतून काढून टाकू शकत नाहीत. या व्यक्तींना त्यांच्या अद्वितीय क्षमता व्यवस्थापित करण्यास स्मृती नियंत्रण तंत्र मदत करू शकते का हे समजून घेण्यासाठी संशोधक अजूनही हायपरथायमेसियाचा अभ्यास करीत आहेत.