डॉ. प्रदीप आवटे, वरिष्ठ आरोग्य अधिकारी, महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैश्विक खेडे झालेल्या या जगासमोर कोणकोणती आव्हाने आहेत आणि त्या आव्हानांना मानव समाज म्हणून आपल्याला कसे तोंड देता येईल, या संदर्भात विविध आंतरराष्ट्रीय संस्था महत्त्वाचे काम करत असतात. आरोग्याच्या अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटना देखील हे काम करत असते. आजच्या जगासमोरील सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने मानवतेला भेडसावणारे जे दहा महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामध्ये सूक्ष्मजीव विरोधी औषधांना निर्माण होणारा वाढता प्रतिरोध (ॲन्टीमायक्रोबियल रजिस्टन्स) हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.

हेही वाचा >>>वर्षभर साखर न खाल्ल्याने शरीराचं काय बदल होतात? कार्तिक आर्यनचा प्रयोग तुमच्या कामी येणार का?

शाश्वत विकासाची जी ध्येये आपण गाठू इच्छितो त्या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या अडचणींपैकी ही एक महत्त्वाची आहे.
सूक्ष्मजीव विरोधी औषधांमध्ये अँटिबायोटिक्स, विषाणूविरोधी औषधे, बुरशी विरुद्ध काम करणारी औषधे आणि परजीवी विरुद्ध काम करणारी औषधे अशा अनेक प्रकारच्या औषधांचा समावेश होतो. सध्या या सर्वच औषधांना वेगाने प्रतिरोध वाढताना दिसतो आहे. त्यामुळे अनेक किंवा सर्वच प्रकारच्या औषधांना न जुमानणारा सुपरबग ही केवळ विज्ञान कथेतील काल्पनिक बाब राहिलेली नसून हा सुपरबग जगभर अनेक रुग्णांमध्ये आढळतो आहे. महत्वाची अशी अँटिबायोटिक्स या प्रतिरोधामुळे निकामी होत असल्याने दिवसेंदिवस जंतुसंसर्गावर उपचार करणे कठीण होत चाललेले आहे कारण नवीन अँटिबायोटिक्स फार सहजतेने मिळत नाहीत.

नवीन अँटिबायोटिक्स शोधण्यासाठी संशोधन प्रक्रियेचा खर्च देखील अव्वाच्या सव्वा आहे त्यामुळे या प्रकारातील नवीन औषधे सापडण्याचा वेग अत्यंत मंद आहे. अनेक गरीब देशांना संशोधनासाठी एवढा खर्च करणे परवडत देखील नाही. अशावेळी आपण आपल्या हातातील आहेत ती उपयुक्त सूक्ष्मजीवविरोधी औषधे गमावणे अत्यंत आत्मघातकी आहे. यामुळे जंतू संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करणे कठीण तर होतेच आहे; पण त्याचबरोबर सिजेरियन शस्त्रक्रिया, सांधे बदलण्याच्या शस्त्रक्रिया, कॅन्सरवरील किमोथेरपी, अवयव प्रत्यारोपण अशा माणसाला संजीवनी देणाऱ्या महत्त्वाच्या शस्त्रक्रिया करणे देखील दिवसेंदिवस अधिक जोखमीचे होत चालले आहे.

हेही वाचा >>>Mental Health Special: रील्स करतंय रिअल आयुष्य खराब

सूक्ष्मजीव विरोधी औषधांना प्रतिरोध निर्माण होण्याची मुख्य कारणे काय आहेत ?

या औषधांचा बेसुमार,वारेमाप वापर हे त्याचे मुख्य कारण आहे. ही औषधे जपून आवश्यक तेव्हाच आणि योग्य प्रमाणात योग्य कालावधी करता वापरली पाहिजेत परंतु असे होताना दिसत नाही.

२) स्वच्छ पाणी, सार्वजनिक स्वच्छता यांचा अभाव हे देखील असा प्रतिरोध वाढण्याचे एक मुख्य कारण आहे.
३) आरोग्य संस्थांमध्ये आणि शेतामध्ये जंतुसंसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण संदर्भातील परिणामकारक उपाययोजना न राबवणे.
४) गुणवत्तापूर्ण आणि सर्वसामान्यांना परवडणारी औषधे, लसी प्रयोगशाळा चाचण्या सहजतेने उपलब्ध नसणे.
५) सूक्ष्मजीव विरोधी औषधांना होत असलेल्या प्रतिरोधाबाबत जागृती आणि माहिती नसणे.
६) या संदर्भातील विविध कायद्यांचे काटेकोर पालन न केले जाणे.

अशा अनेक कारणांमुळे हा प्रतिरोध वाढतो आहे. सूक्ष्मजीव विरोधी औषधांना निर्माण होणारा प्रतिरोध ही काही प्रमाणामध्ये निसर्गतः होणारी गोष्ट आहे. आपल्यामध्ये आवश्यक ते जनुकीय बदल करून सूक्ष्मजीव हा प्रतिरोध निर्माण करतात हे खरे आहे तथापि वर नमूद केलेल्या कारणांमुळे या प्रतिरोधाचे प्रमाण विलक्षण गतीने वाढते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

सूक्ष्मजीव विरोधी औषधांना निर्माण होणारा प्रतिरोध नेमक्या कोणत्या औषधांना आणि कोणत्या सूक्ष्मजीवांचा आहे याची अचूक माहिती मिळून त्यानुसार कार्यवाही करणे शक्य व्हावे यासाठी जागतिक पातळीवर या संदर्भात सर्वेक्षण यंत्रणा तयार करण्यात आलेली असली तरी देखील हे सर्वेक्षण अजून पुरेसे विश्वव्यापी झालेले नाही. जगातील कसेबसे पन्नास एक देश यासंदर्भातील माहिती गोळा करत आहेत. (क्रमश:)

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Resistance to antibiotics has made tb disease more difficult to control hldc amy
Show comments