Reverse Walk Benefits : पोट, मांड्या यांवरील चरबी जाळण्यासाठी चालणे हा उत्तम पर्याय मानला जातो. कितीही जास्त वजन असले तरीही खाण्यावर नियंत्रण ठेवत रोज चालण्याचा व्यायाम केल्यास वजन हमखास कमी होते. पण, रोज १५ मिनिटे उलटे चालण्याचेही फायदे आहेत. वाचून आश्चर्य वाटलं ना? होय हे खरं आहे. अशा चालण्याला वैज्ञानिक भाषेत ‘Reverse Walk’, असं म्हटलं जातं. रिव्हर्स वॉकिंगचे अनेक फायदे आहेत. या संदर्भात मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील क्रीडा विज्ञान व पुनर्वसन विभागाचे प्रमुख डॉ. वैभव डागा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
“उलटे चालण्याचे फायदे केवळ शारीरिक नसून मानसिकही आहेत. ते मेंदूच्या संज्ञानात्मक कार्याला चालना देण्यास मदत करतात, जे आपल्याला विचार करण्यास, शिकण्यास, प्रक्रिया करण्यास, लक्षात ठेवण्यास व निर्णय घेण्यासही मदत करतात,” असे मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील क्रीडा विज्ञान व पुनर्वसन विभागाचे प्रमुख डॉ. वैभव डागा म्हणतात.
उलटे चालण्याचे शारीरिक फायदे कोणते?
उलटे चालणे पायांच्या स्नायूंना बळकटी देण्यास खूप मदत करते. सामान्य चालण्यामुळे तुम्ही स्वतःला पुढे भारित करता आणि त्यामुळे गुडघ्यांवर जास्त भार पडतो. उलटे चालण्यामध्ये तुमचे गुरुत्वाकर्षण केंद्र सरकते आणि गुडघ्यांवर कमी ताण येतो. असे चालणे तुम्हाला तुमच्या शरीराचे संतुलन चांगले ठेवण्यासदेखील मदत करते.
उलटे चालण्यासाठी खूप जास्त ऊर्जा लागते आणि त्यामुळे कॅलरीज जास्त प्रमाणात बर्न होतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या बसून राहण्याच्या सवयीमुळे आपण नेहमी टेबलावर झुकतो आणि चुकीची स्थिती निर्माण करतो. मागे चालण्यामुळे आपली पाठ सरळ होते आणि चांगली स्थिती राखण्यास मदत होते.
उलटे चालणे मेंदूला अधिक सक्रिय करते, लक्ष केंद्रित करते व समन्वय कौशल्ये वाढवते. अशा चालण्यामध्ये तुमच्या सर्व इंद्रियांचा समावेश असल्याने, तुम्ही याला ‘मेंदूचा व्यायाम‘, असेही म्हणू शकता. अनेक अभ्यासांतून असे आढळून आले आहे की, उलटे चालल्याने तर्कशक्ती आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. या क्रियेमध्ये मेंदू सतर्क आणि सक्रिय असतो. कारण- जेव्हा तुम्ही उलटे चालता तेव्हा अडथळे आणि जोखीम यांचा अंदाज घेणे कठीण होऊ शकते.
फक्त मोकळ्या जागेत चालत असताना काळजी घ्या; जेणेकरून इतर चालणाऱ्यांशी टक्कर होणार नाही. गुळगुळीत, सपाट अशी जागा निवडा. कारण- तशी जागा नसल्यास तुम्ही मागे जमिनीवर पडू शकता. नेहमीपेक्षा ही वेगळी कृती असल्याने त्याची सुरुवात हळूहळू म्हणजे तुमच्या दैनंदिन दिनचर्येत एक किंवा दोन मिनिटे उलटे चालण्याचा उपक्रम सुरू करा. तुमचा आत्मविश्वास वाढल्यावर मग तुमची उलटे चालण्याच्या व्यायामाची वेळ वाढवा.