लठ्ठपणा म्हणजे कित्येक गंभीर आजारांना आयते निमंत्रण. म्हणूनच वाढलेले वजन नियंत्रणात आणण्यासाठी बरेच लोक सर्वतोपरी प्रयत्न करीत असतात. त्या प्रयत्नांचा भाग म्हणून आहार व व्यायामाचे ठरविलेले दैनंदिन वेळापत्रक काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यातच आता ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी वजन नियंत्रित ठेवण्यासाठी ३६ तासांचा उपवास केला असल्याचे समोर आले आहे. त्यांनी रविवारी संध्याकाळी ५ ते मंगळवारी पहाटे ५ दरम्यान ३६ तास उपवास केला असल्याचे, नुकतेच एका मुलाखतीत सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनक यांनी सांगितल्यानुसार, निरोगी आयुष्य जगण्यासाठी नियमित दिनचर्या राखणे महत्त्वाचे आहे. त्यांनी या ३६ तासांच्या उपवास कालावधीत, पाणी, चहा आणि कॅलरी मुक्त पेये घेतले असल्याचे सांगितले. सुनक यांचा हा उपवास म्हणजेच याला ५:२ आहार म्हणतात; ज्यामध्ये साधारणपणे दर आठवड्याला पाच दिवस खाणे, त्यानंतर इतर दोन दिवसांमध्ये तुमच्या कॅलरीजचे प्रमाण ३००-५०० कॅलरीजपर्यंत मर्यादित करणे, हे यामध्ये समाविष्ट आहे, असे आहारतज्ज्ञांनी माहिती दिल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

मॅक्स हेल्थकेअरच्या क्लिनिकल पोषण व आहारशास्त्र विभागाच्या प्रादेशिक प्रमुख, रितिका समद्दार सांगतात, “अनेक लोक वजन कमी करण्यासाठी ५:२ आहाराचे पालन करतात. त्यामध्ये आठवड्यातील पाच दिवस नीट खायचे; पण तुम्हाला दोन दिवस उपवास करावा लागतो. उपवासादरम्यान आपल्याला फक्त ५०० कॅलरीज लागतात. हा आहार फॉर्म्युला वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरतो. ही दिनचर्या जास्त वजन असलेल्या आणि प्री-डायबिटीज अवस्थेत असलेल्यांना त्यांची स्थिती पूर्ववत करण्यास मदत करू शकते. त्याशिवाय ते जळजळदेखील कमी करते; तर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आणि आतड्यांसंबंधी समस्यांना ते कारणीभूत ठरू शकते,” असेही त्या नमूद करतात.

(हे ही वाचा : ‘हे’ एक फळ खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी, साखर नियंत्रणात अन् बद्धकोष्ठता होईल दूर? समजून घ्या खाण्याची पद्धत तज्ज्ञांकडून…)

तर अपोलो हॉस्पिटल्सच्या मुख्य पोषण तज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांच्या मते, या आहाराचे अनेक फायदे आहेत. या आहारामध्ये आपल्या शरीरात उष्मांकांचे व्यवस्थापन केले जाते; ज्यामुळे तुमचे वजन कमी होते. हे तुम्हाला कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यासही मदत करते, असे त्या सांगतात.

तर अभ्यासाने आधीच दर्शविले आहे की, ५:२ आहार हा पर्यायी दिवसांप्रमाणे जास्त वजन आणि लठ्ठ असलेल्या लोकांमध्ये वजन कमी करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी प्रभावी आहे. तथापि, परिणाम तुमची उष्मांक शिस्त, तुमची आहार योजना आणि तुम्हाला किती वजन कमी करायचे आहे, यावर अवलंबून असतात. सुनक यांनी सांगितल्यानुसार, त्यांना मिठाई आणि पेस्ट्री खायला आवडते, असेही त्यांनी नमूद केले होते.

अन्नाशिवाय जास्त काळ, जसे की २४, ३-, ४८ व ७२ तासांचा उपवास आपल्यासाठी आवश्यक नाही; तर तो धोकादायक ठरू शकतो. अधूनमधून उपवास केल्याने दुष्परिणाम होऊ शकतात. त्यात भूक, थकवा, निद्रानाश, चिडचिड, एकाग्रता कमी होणे, मळमळ, बद्धकोष्ठता व डोकेदुखी यांचा समावेश असू शकतो, असेही तज्ज्ञ सांगतात.

डॉ. रोहतगी सांगतात की, २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांनी आणि गर्भवती महिलांनी अशा आहार पद्धतींचा अजिबात अवलंब करू नये; तसेच औषधोपचार सुरू असलेल्या लोकांनीही या आहाराचे पालन करू नये, असे स्पष्टच सांगितले आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishi sunaks viral 36 hour fasting routine can it help you lose weight pdb
Show comments