गेल्या काही दिवसांपासून मुंबई, दिल्लीसह अनेक शहरांमधील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळली आहे. वाढते प्रदूषण सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक चिंतेचा विषय बनला आहे. अशा परिस्थितीत घरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी एअर प्युरिफायरच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. पण, घराची दारं, खिडक्या पूर्णपणे बंद ठेवूनसुद्धा एअर प्युरिफायरचा वापर करणे प्रभावी ठरतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे घरातील हवा शुद्ध करण्यासाठी तुम्ही एअर प्युरिफायर विकत घेण्याचा जर विचार करत असाल तर तज्ज्ञांनी सांगितलेल्या खालील चार गोष्टी लक्षात ठेवायल्या हव्यात.
एअर प्युरिफायरची गरज नेमकी कोणाला असते?
एअर प्युरिफायरच्या परिणामकारकतेबद्दल मर्यादित पुराव्यांच्या आधारे डॉक्टरांनी शिफारस केली की, ज्यांना श्वसनासंबंधित आजार किंवा इतर कोणते आजार असतील त्यांनीच फक्त एअर प्युरिफायरचा वापर करावा.
पीएसआरआय इन्स्टिट्यूट ऑफ पल्मोनरी, क्रिटिकल केअर अँड स्लीप मेडिसिनचे अध्यक्ष आणि जागतिक वायू प्रदूषण आणि डब्ल्यूएचओच्या आरोग्यासंबंधित तांत्रिक सल्लागार गटाचे सदस्य डॉ. जी. सी. खिलनानी म्हणाले की, एअर प्युरिफायरचा वापर फक्त वृद्ध व्यक्तींनीच केला पाहिजे. जसे की, ८० वर्षांवरील हृदयविकारांसारख्या इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी याचा वापर करणे फायदेशीर आहे. यात ज्यांना आधीच काही श्वसनासंबंधित आजार आहेत आणि त्यांना ऑक्सिजन सपोर्टची आवश्यकता असते, त्यांनीही याचा वापर केला पाहिजे. यावर ते पुढे सांगतात की, अनेक दिवस एकाच रुम किंवा घरात आराम करणाऱ्या किंवा घरातच असलेल्या लोकांनी याचा वापर केला पाहिजे.
सर गंगा राम रुग्णालयातील चेस्ट सर्जन डॉ. अरविंद कुमार यांनी म्हटले की, ज्यांना आधीपासून फुफ्फुसांसंबंधित आजाराने ग्रासले आहे किंवा फुफ्फुसाचे प्रत्यारोपण झाले आहे, अशा रुग्णांनी त्याचा वापर केला पाहिजे.
यावर डॉ. अरविंद कुमार सांगतात की, तुम्ही जोपर्यंत तुमच्या घरात असता तोपर्यंतच ते संरक्षण देते. तरीही सर्वच एअर प्युरिफायर प्रभावी नसतात, यात बहुतेक लोकांना ते विकत घेता येऊ शकत नाहीत. त्यामुळे एअर प्युरिफायर खरंच एक प्रभावी उपाय आहे असे म्हणता येणार नाही. यासाठी प्रदूषण पातळी कमी करण्याची गरज आहे.
ते पुढे म्हणतात की, लोकांनी घरातील एअर प्युरिफायर योग्यरित्या काम करत आहेत याची खात्री केली पाहिजे, कारण काही वेळा या प्युरिफायरच्या सुरक्षिततेबाबत खोटी माहिती दिली जाऊ शकते.
एअर प्युरिफायर खरेदी करताना काय पहावे?
एअर प्युरिफायर खरेदी करताना, HEPA (हाय एफिशिएंसी पार्टिक्युलेट एअर) फिल्टरने सुसज्ज आहे ते तपासावे. जे धूळ, परागकण, मोल्ड आणि लहान धुळीचे कण यांसारख्या ऍलर्जींना प्रभावीपणे काढून टाकण्यास सक्षम असले पाहिजे.
बर्याच एअर प्युरिफायरमध्ये आयनिक फिल्टरदेखील समाविष्ट असतात, जे प्रदूषकांना स्थिर होण्यास आयन उत्सर्जित करतात. याव्यतिरिक्त कार्बन फिल्टर, सल्फर डाय ऑक्साइड, नायट्रोजन डाय ऑक्साइड आणि ओझोनसारख्या वायू प्रदूषकांना काढून टाकण्यास मदत करते.
डॉ. खिलनानी म्हणाले की, कण आणि वायू प्रदूषक या दोघांना शोषून घेण्याची क्षमता असलेल्या एअर प्युरिफायरची निवड करा. काही मॉडेल्समध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस नष्ट करण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट फिल्टरेशन सिस्टम समाविष्ट असते.
क्लीन एअर डिलिव्हरी रेट (CADR) हा विचार करण्याजोगा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे, जो प्युरिफायरची क्षमता दर्शवतो. परिणामकारकता सुनिश्चित करण्यासाठी ते खोलीच्या हवेच्या प्रमाणापेक्षा जास्त असावे; मोठ्या खोलीत एक लहान प्युरिफायर वापरल्यास त्याचा तितकासा प्रभाव जाणवणार नाही. यात विजेचा वापर आणि आवाजाची पातळी विचारात घ्या, कारण एअर प्युरिफायर सामान्यतः दिवसभर चालतात.
तुम्ही खरेदी केलेले एअर प्युरिफायर प्रभावी आहे हे कसे ओळखाल?
एअर प्युरिफायर प्रभावीपणे काम करण्यासाठी, खोलीची सर्व दारे आणि खिडक्या बंद असणे महत्त्वाचे आहे, तुम्ही घरात एसीचा वापर ज्याप्रकारे करता व घर बंद ठेवता त्याचप्रकारे एअर प्युरिफायर वापरतानाही सर्व बंद असणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त फिल्टर कार्यक्षमतेने कार्य करतात, याची खात्री करण्यासाठी एअर प्युरिफायर भिंतीपासून दूर ठेवा. हे फिल्टर वेळोवेळी बदलण्याचे लक्षात ठेवा. फिल्टर बदलांकडे दुर्लक्ष केल्याने केवळ हवा शुद्धीकरणात अडथळा येऊ शकतो, तसेच संक्रमणाचा प्रसार होण्यासही हातभार लागतो.
हवेची गुणवत्ता राखण्यासाठी खोलीत प्रवेश करण्यापूर्वी काही मिनिटं एअर प्युरिफायर सतत चालू ठेवणे आवश्यक आहे. हवा शुद्ध होण्यास वेळ लागतो. तसेच ते प्रभावीपणे काम करण्यासाठी एअर प्युरिफायरचा आकार खोलीच्या हिशोबाने लहान मोठा असायला हवा.
एअर प्युरिफायरबद्दलचे वैज्ञानिक पुरावे काय सांगतात?
काही वैज्ञानिक पुरावे असे दर्शवतात की, बंदिस्त जागेत घरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी एअर प्युरिफायर प्रभावी ठरू शकतात. २०२१ च्या युरोपियन अभ्यासात एअर प्युरिफायर वापरल्याने हवेतील घातक कण आणि वायू पदार्थांमध्ये लक्षणीय घट दिसून आली. विशेषतः मोठे PM10 कण ९० टक्के कमी झाले, तर लहान PM2.5 कण ८० टक्क्यांनी कमी झाले. याव्यतिरिक्त अभ्यासात वायू पदार्थांच्या एकाग्रतेत ५० टक्क्यांची घट नोंदवली गेली.
याशिवाय २०१५-१६ च्या हिवाळ्यात दिल्लीत आयोजित केलेल्या प्रयोगात असे दिसून आले आहे की, एअर प्युरिफायरच्या वापरामुळे घरातील कणांच्या पातळीत लक्षणीयरित्या घट झाली असली तरी रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम करणारी घराबाहेरील प्रदूषण पातळी उच्चच होती. यावरून असे दिसते की, अत्यंत प्रदूषित वातावरणात नाही, तर घरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यास एअर प्युरिफायर प्रभावी ठरत आहे.
पण, अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अशा परिस्थितीत जागतिक आरोग्य संघटनेने घरी आणि कार्यालयात एअर प्युरिफायर वापरण्याची शिफारस केली आहे.