Rohit Bose Roy Weight Loss: अभिनेता रोहित बोस रॉय याने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये आपल्या वजन कमी करण्याच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल काही खास खुलासे केले होते. मागील काही महिन्यांमध्ये अनेकांना आश्चर्य वाटावं इतकं वेगाने या अभिनेत्याने तब्बल १६ किलो वजन घटवलं. पण हा प्रवास पूर्ण केल्यावर झालेल्या काही चुकांमुळे अगदी तितक्याच वेगाने त्याचं शरीर पूर्वस्थितीत परतलं याचीही कबुली अभिनेत्याने दिली. वजन कमी करण्यासाठी त्याने वापरलेला किटो फंडा नेमका काय काम करतो? त्यात कोणत्या चुका होऊ शकतात? एकूणच कुणी किटो डाएट करायला हवं व कुणी टाळायला हवं याविषयी आपण तज्ज्ञांकडून घेतलेली सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत.
किटो म्हणजे काय? (What Is Keto)
केटोरेट्सचे संस्थापक राहुल कामरा यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, किटो या आहाराचे उद्दिष्ट शरीराला केटोसिसच्या स्थितीत आणणे आहे. केटोसिस म्हणजे चयापचयाची अशी एक प्रणाली ज्यात शरीर कार्ब्स ऐवजी फॅट्स बर्न करून ऊर्जा निर्माण करते. या स्थितीत शरीराला आणण्यासाठी जास्त प्रमाणात फॅट्स, मध्यम प्रमाणात प्रथिने आपल्या आहारात जोडावी लागतात, तसेच कार्ब्सचा एखादा स्रोत पूर्ण बंद करावा लागततो.
किटो डाएटमध्ये काय समाविष्ट आहे?
वर म्हटल्याप्रमाणे जास्त फॅट्स, मध्यम प्रमाणात प्रोटिन्स व कमी प्रमाणात कार्ब्स असं समीकरण किटो डाएटमध्ये असतं. शाकाहारी आणि मांसाहारी दोघांसाठी साजेसे विशिष्ट पदार्थ यात समाविष्ट असतात. शर्करा, स्टार्च, शेंगा आणि डाळी यांचे प्रमाण आहारातून कमी करण्यावर ही पद्धत अधिक भर देते.
किटो सर्वांसाठी योग्य आहे का?
कामरा सांगतात की, अर्धांगवायू, पार्किन्सन्स, अल्झायमर, मधुमेह आणि लिपिड्स सारख्या परिस्थितींवर नियंत्रण मिळवण्यासाठी किटो डाएट उत्तम ठरते. मुळातच किटोसिस ही नैसर्गिक चयापचय पद्धती आहे हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. नवजात शिशूंचे शरीर तर केटोसिस प्रणालीच्या साहाय्याने ऊर्जा निर्माण करते. याचा अर्थ आपल्या शरीराला जन्मजात या स्थितीत कार्य करण्याची सवय असते. त्यामुळे हे स्पष्ट होते की, आपल्या शरीरासाठी किटो ही अगदीच अनोळखी संकल्पना नाही.
किटो डाएट करून वजन कमी का होते?
किटो डाएटच्या भोवती घुटमळणारं एक मोठं व महत्त्वाचं आव्हान म्हणजे जेव्हा तुम्ही हे डाएट फॉलो करणं बंद करता तेव्हा तुमचं वजन पटकन वाढू शकतं. काम्रा यांनी सांगितल्याप्रमाणे, कार्ब्स व प्रथिनांची शरीराला पुन्हा सवय लावण्यासाठी आपण नीट नियोजन करणं गरजेचं आहे. विशेषतः इन्सुलिनमध्ये अचानक होणारी वाढ टाळण्यासाठी हळूहळू कार्ब्स व प्रथिनांचे सेवन सुरु करावे. केटोरेट्स पद्धतीमध्ये मेटाबॉलिक रिव्हायव्हल फेज म्हणून ओळखला जाणारा टप्पा, सुदृढता, निरोगी वजनराखण्यासाठी मदत करू शकतो. इथे लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे अमुक वेळेपुरतं किटो डाएट केलं मग बंद केलं मग पुन्हा वजन वाढलं म्हणून पुन्हा सुरु केलं अशा सवयीने शरीराला गोंधळात टाकण्यापेक्षा आपण संतुलित आहार, व्यायाम व एकूणच जीवनशैलीची सवय शरीराला लावावी.
कामरा सांगतात की, तुम्ही अमुक एक डाएट ट्रेंड म्हणून फॉलो करण्यापेक्षा जर नियमित संतुलित आहार घेण्याकडे लक्ष दिले तर दीर्घकालीन फायदे होऊ शकतात. आहारात निरोगी फॅट्स, प्रथिने, कमी का होईना पण कार्ब्सरुपी भाज्यांचा सुद्धा समावेश करणे महत्त्वाचे आहे.
हे ही वाचा<< घरी धूप, उदबत्ती लावताना १० वेळा विचार कराल, डॉक्टरांनी सांगितलेले हे परिणाम वाचा, मंदिरात झालेला अभ्यास काय सांगतो?
केटोसिससाठी प्रथिने आवश्यक असली तरी, ग्लुकोनोजेनेसिस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रक्रियेद्वारे प्रथिनांचा मोठा भाग ग्लुकोजमध्ये रूपांतरित होण्याची शक्यताअसते. म्हणूनच, टोफू, अंडी, मासे, चिकन आणि मांस यांसारख्या पदार्थांमधून मर्यादित प्रमाणात प्रथिनांचे सेवन करा. लक्षात घ्या, प्रत्येकाची मर्यादा ही एकसारखीच असेल असं नाही. किटो किंवा अन्य आहारपद्धती सुद्धा तुमच्या शरीराची गरज ओळखून अवलंबली पाहिजे. तुमच्या शरीराची नीट ओळख होण्यासाठी आधी तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या.