Salman Khan on his sleep routine: बॉलीवूडचा भाईजान सलमान खानने अलीकडेच त्याचा पुतण्या अरहान खानशी झालेल्या संवादात त्याच्या जीवनशैलीबद्दल सांगितले. त्याने सांगितले की, बहुतेक दिवस तो फक्त दोन तास झोपतो. पण, जेव्हा तो तुरुंगात होता, तेव्हा त्याला चांगली झोप लागली होती. “मी साधारणपणे दोन तास झोपतो आणि आणि महिन्यातून एकदा मला एक दिवस ७-८ तास झोप मिळते. कधी कधी सेटवर छोट्या ब्रेकच्या वेळी मी थोड्या वेळासाठी झोपतो,” असे सलमान खान म्हणाला.
अरहानच्या पॉडकास्ट ‘डंब बिर्याणी’मध्ये बोलताना ५९ वर्षीय सलमान खानने सांगितले की, तो फक्त तेव्हाच झोपतो जेव्हा त्याला काहीच करण्यासारखं उरलेलं नसतं. “म्हणूनच मी तुरुंगात असताना चांगली झोप घेतली. विमानात टर्ब्युलन्स येत असतानादेखील मी झोपतो. कारण- अशा परिस्थितीत मी काहीच करू शकत नाही,” असे तो म्हणाला.
शाहरुख खाननेदेखील आपल्या अनियमित झोपेच्या वेळेबद्दल आधी सांगितले होते. त्याने म्हटले होते की, तो पहाटे ५ वाजता झोपतो आणि सकाळी ९ वाजता उठतो.
त्यावरून अनियमित झोप आणि त्यानंतर झोपेची कमतरता यांमुळे एखाद्याच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो हे समजून घेऊ…
एका प्रौढ व्यक्तीने दररोज ७-९ तास झोपावे, असे डॉ. सुधीर कुमार (कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट, अपोलो हॉस्पिटल्स, हैदराबाद) यांनी सांगितले. “झोपेच्या कमतरतेमुळे लठ्ठपणा, टाईप-२ मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, स्ट्रोक, डिप्रेशन, डिमेन्शिया आणि काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढतो,” अशी पुस्ती डॉ. कुमार यांनी जोडली.
दीर्घकालीन आरोग्य धोक्यांसोबतच झोपेच्या कमतरतेमुळे विविध अल्पकालीन परिणामदेखील होऊ शकतात; जसे की कमी लक्ष लागणे, एकाग्रता कमी होणे, स्मरणशक्ती समस्या, डोकेदुखी, चिडचिड, कामाच्या ठिकाणी कमी उत्पादकता, असे ते पुढे म्हणाले. “वाहन चालविण्याची क्षमतादेखील बिघडते आणि झोप न मिळालेल्या चालकांकडून वाहन अपघात होण्याचा धोका वाढतो,” असे डॉ. कुमार यांनी indianexpress.com ला सांगितले.
एकाच वेळी शक्यतो रात्री संपूर्ण झोप घेणे चांगले असते. “जे लोक रात्री ७ ते ९ तास झोपू शकत नाहीत, ते दिवसभरात बाकीची झोप पूर्ण करू शकतात,” असे डॉ. कुमार म्हणाले.
झोपेची नियमितता म्हणजेच साधारणपणे नेहमीच एकाच वेळी झोपायला जाणे आणि उठणे हेदेखील महत्त्वाचे आहे. “नियमित झोपेची वेळ ही एकंदर आरोग्याच्या दृष्टीने चांगली आहे,” असे डॉ. कुमार म्हणाले.
नियमित झोपेची वेळ राखणे, सकाळचे एक ठरलेले रुटीन तयार करणे आणि झोपण्याआधी स्क्रीनचा वापर टाळणे या गोष्टी चांगली झोप मिळवण्यास मदत करू शकतात.