Sara Ali Khan Start A Day With Turmeric Water : बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानचा (Sara Ali Khan) लवकरच ‘मर्डर मुबारक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर याचनिमित्त कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, ती तिच्या दिवसाची सुरुवात हळदीचे पाणी किंवा पाण्यात हळद घालून करते आणि त्यानंतर ध्यान करते. याआधी यामी गौतमनेसुद्धा दिवसाची सुरुवात हळदीच्या पाण्याने सुरू करण्याबाबत खुलासा केला होता. पण, डॉक्टर रोज हळदीचे पाणी पिण्याचा सल्ला देतात का? तर याबद्दल जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने डॉक्टरांशी चर्चा केली.
मुंबईच्या झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलच्या औषधतज्ज्ञ, डॉक्टर उर्वी महेश्वरी म्हणाल्या की, दररोज हळदीचे पाणी पिताना सावधगिरी बाळगली पाहिजे. हळदीचे पाणी हे त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी वर्षानुवर्षे वापरले जात आहे. हळद जळजळ कमी करण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ओळखली जाते, त्यामुळे हळद पाणी किंवा दुधाबरोबर जोडली जाऊ शकते किंवा त्याचे सेवन केले जाऊ शकते. पण, जर तुम्ही नियमितपणे हळदीचे पाणी पित असाल तर सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण दररोजच्या सेवनाने काही लोकांना मळमळ, अतिसार किंवा पोटदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
डॉक्टर उर्वी महेश्वरी यांच्या मते, काही औषधांमध्ये हळद व्यत्यय आणू शकते. त्यामुळे हळदीचे पाणी दररोज पिण्याचा सल्ला दिला जात नाही. कारण हा उपाय एका व्यक्तीसाठी फायदेशीर ठरत असला तरीही तो दुसऱ्या व्यक्तीसाठी फायदेशीर ठरेल असं होऊ शकत नाही.
दहा ते पंधरा मिनिटे ध्यान करणे
याव्यतिरिक्त डॉक्टर उर्वी महेश्वरी म्हणाल्या की, एखाद्याने दररोज ध्यान केले पाहिजे, कारण ते तुम्हाला तणावमुक्त होण्यास, शांत होण्यास, पूर्वस्थितीकडे पाहण्यास आणि सकारात्मक मानसिकता विकसित करण्यास मदत करू शकते. ध्यान करणे एक विश्रांती तंत्र आहे, जे नकारात्मक विचारांना विसरण्यास आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहण्यास मदत करते.
द इंडियन एक्स्प्रेसने योग प्रशिक्षक मानसी गुलाटी यांच्याशीसुद्धा संवाद साधला. त्यासुद्धा म्हणाल्या की, दररोज किमान दहा ते पंधरा मिनिटे ध्यान करणे आवश्यक आहे. एक शांत, आरामदायक जागा शोधा, जिथे कोणताही व्यत्यय न आणता तुम्ही सराव करू शकता.
ध्यान करण्यासाठी एक आरामशीर आसन घ्या. श्वास घ्या, प्रत्येक श्वासाकडे लक्ष द्या. तुम्हाला काहीही विचार करण्याची किंवा कल्पना करण्याची किंवा तुमचे श्वास मोजण्याची गरज नाही. तुमच्या मनातील विचार आणि तुमच्या शरीराभोवती असलेल्या भावनांकडे लक्ष द्या. जेव्हा ते दिसतात तेव्हा त्यांची नोंद घ्या आणि त्यांचे मूल्यमापन किंवा अर्थ लावण्याचा प्रयत्न न करता त्यांना विसरून जा, असे मानसी गुलाटी यांनी सुचवले आहे.