स्किझोफ्रेनिया म्हणजे नक्की काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. स्किझोफ्रेनियाचा शब्दशः अर्थ म्हणजे दुभंगलेले मन(split mind). मराठीमध्ये त्याला एक योग्य पर्यायी शब्द वापरला जातो, छिन्न मनस्कता.
काय छिन्न विच्छिन्न होते या आजारात, असे स्वाभाविकपणे मनात येते. स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर मानसिक विकार(serious mental illness) आहे. सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या मनोविकारांइतके याचे समाजात प्रमाण आढळत नाही. साधारणपणे १% लोकांना स्किझोफ्रेनिया होतो. पुरुष, स्त्रिया दोघांमध्येही आढळतो. सर्व आर्थिक स्तरांमध्ये सारख्याच प्रमाणात असतो. तो गंभीर मानसिक आजार मानला जातो, कारण तो पौंगडावस्थेत किंवा तरुणपणी सुरू होतो, त्याचे रुग्णाच्या जीवनाच्या अनेक आयामांवर खोलवर परिणाम होतात आणि वर्षानुवर्षे रुग्णाला या आजाराचा त्रास होतो.
आणखी वाचा: Health Special: सगळं संपवून टाकावं वाटतं तेव्हा काय विचार …
“समीर १६ वर्षांचा होता. दहावीची परीक्षा जवळ आली होती, अभ्यासाचे टेन्शन वाढत चालले होते. समीर एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जायचा. प्रिलीम झाली, त्याने अभ्यासाचे तास वाढवले. रात्री खूप जगायला लागला, दिवसा सुद्धा सतत अभ्यास करत बसायचा. जेवणही कमी झाले. एक दिवस अचानक खूप रागावला, म्हणायला लागला, शेजारचे लोक मुद्दाम मोठमोठ्याने बोलताहेत, त्यांना त्याची प्रगती व्हायला नको आहे, किंबहुना, त्याला अपयश यावे म्हणून ते सतत प्रयत्न करताहेत. आई वडीलांनी खूप समजावले, की शेजारी फार चांगले आहेत, ते असा विचार कधीच करणार नाहीत. पण समीर ठाम होता. उलट हळू हळू तो सारखा शेजारी काय बोलताहेत ते ऐकण्याचा प्रयत्न करू लागला. त्याचा असा ठाम विश्वास निर्माण झाला की ते त्याच्या विरुद्ध आहेत आणि त्याला मारूनही टाकू शकतात. स्वतःशी पुटपुटत बसायचा, हातवारे करायचा. जेमतेम १०वीची परीक्षा दिली. कधी कधी अचानक खूप रागवायचा, आक्रस्ताळेपणा करायचा, मारायला उठायचा. शेजाऱ्यांना शिवीगाळ करायचा.”
आणखी वाचा: मन:स्वास्थ्य : मानसिक आरोग्याच्या सीमारेषा
अशा प्रकारे स्कीझोफ्रेनियामध्ये माणसाचे व्यक्तिमत्त्व पूर्णपणे बदलून जाते. विचारांमध्ये निर्माण झालेला दोष हे प्राथमिक लक्षण असते. मनात दृढ विश्वास निर्माण होतात, ज्यांना काही तर्कसंगती नसते, किंवा ते बिनबुडाचे असतात. जसे समीरला वाटू लागले की शेजारी आपल्या विरुद्ध आहेत.
एकदा मनात अशा विचारांनी घर केले की पेशंटच्या भावना आणि वागण्यावर परिणाम होतो. समीरही रागीट बनत गेला, आक्रमक बनू लागला. मनात निर्माण झालेले विश्वास हे पक्के असतात, त्या व्यक्तीच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीला विसंगत असतात आणि वास्तव वेगळे आहे हे सांगून किंवा त्याचे पुरावे देऊनही विश्वास ठामच राहतो.(delusion) या विश्वासाचा पगडा सगळ्या जीवनावर राहतो, जणू रुग्ण स्वतःचे असे एक विश्व निर्माण करतो, आपल्याच विचारांच्या कोशात आपले सारे जीवन, आपले व्यवहार सारे सामावून घेतो. त्याचा वास्तवाशी संपर्क तुटतो.(out of touch with reality) असे त्याचे मन आणि जीवन छिन्न विच्छिन्न होते, म्हणून छिन्नमनस्कता हा शब्द समर्पक ठरतो.
मनात वेगवेगळ्या प्रकारचा संशय निर्माण होतो. लोक माझ्या विरुद्ध आहेत, मला मारून टाकतील, ते माझ्याविषयी बोलतात असे विचार येतातच, शिवाय पतीला/ पत्नीला आपली पत्नी/ आपला पती आपल्याशी प्रामाणिक नाही, त्याचे कोणाशी तरी बाहेरख्याली संबंध आहेत, असेही विचार येतात. कधी कधी एखादी व्यक्ती (बऱ्याच वेळा अशी व्यक्ती कोणीतरी प्रसिद्ध व्यक्ती असते)आपल्या प्रेमात आहे अशी ठाम समजूत होते आणि माणूस त्या प्रमाणे वागू लागतो.
विचारांबरोबर रुग्णाच्या पाचही इंद्रियांमधून अस्तित्वात नसलेले भास होतात;(hallucinations) उदा. आवाज ऐकू येणे, डोळ्यासमोर दृश्य दिसणे, वेगळेच वास येणे, कोणाचा तरी स्पर्श झाल्यासारखे वाटणे किंवा भलतीच चव लागणे. प्रत्यक्षात नसलेल्या संवेदना निर्माण होतात.
काही वेळेला अशी सगळी लक्षणे दिसत नाहीत. रुग्ण समाजापासून तुटल्यासारखा वागू लागतो. इतरांशी संपर्क कमी करतो, जास्त बोलत नाही, आपणहून काही काम करत नाही, अगदी स्वतःचे दैनंदिन व्यवहारही, अंघोळ, कपडे बदलणे, दात घासणे इ. करेनासा होतो. कधी शून्यात नजर लावून बसतो. या उलट एखाद्या रुग्णाच्या विचारांची, भावनांची आणि वर्तणुकीची गाडी रुळावरून पूर्णपणे घसरली आहे असे वाटते. असंबद्ध बडबड, दोन वाक्यांमध्ये अजिबात संगती नाही, एखादे वेळेस शब्दच ऐकणाऱ्याला कळत नाहीत, विनाकारण हसणे, विनाकारण रडणे, वागणूकही पूर्णपणे विस्कळीत होते.
कपड्याचे भान असतेच असे नाही. अस्वच्छ,ओंगळ असे रूप बनते. स्किझोफ्रेनिया असा वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटतो. पण त्याच्यावर अनेक परिणामकारक उपचार उपलब्ध आहेत. उपचाराच्या माध्यमाने रुग्णाला समाजात पुन्हा आणणे, समाजात सामावून घेणे नक्कीच शक्य होते. कसे ते पुढील लेखात पाहू.