डॉ. प्रदीप आवटे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Health Special: ताप येणे हे कोणत्याही आणि विशेषतः संसर्गजन्य आजाराचे एक सर्वसामान्य लक्षण आहे. कोणत्याही दवाखान्यात तापामुळे आलेले रुग्ण सर्वाधिक असतात. त्यामुळे ताप येणे हे लक्षण जरी सर्वसामान्यपणे आढळत असले तरी तापाचे नेमके निदान करणे अनेकदा वाटते तेवढे सोपे नसते. मलेरिया, डेंग्य़ू, चिकनगुनिया, टायफाईड, फ्ल्यू , कोविड, न्युमोनिया, लेप्टोस्पायरोसिस अशा अनेक कारणांमुळे ताप येऊ शकतो. अनेकदा काही आजार तर चक्क दुर्लक्षित राहतात. असाच एक दुर्लक्षित आजार म्हणजे स्क्रब टायफस.

अनेकदा तापाचे नेमके निदान न झालेल्या सुमारे २५ टक्के रुग्णांमध्ये हा आजार आढळतो. सुत्सुगामुशी या एका रिकेटिशिया प्रकाराच्या जीवाणूमुळे हा आजार होतो. हा शब्द जपानी आहे. सुत्सुगा म्हणजे आजार आणि मुशी म्हणजे कीटक. म्हणजेच खुरट्या झुडूपांमध्ये आढळणाऱ्या एका विशिष्ट प्रकारच्या कीटकाची (माईट) अळी चावल्यामुळे हा  आजार होतो. वाढते शहरीकरण आणि त्यामुळे होणारी जंगलतोड यामुळे अलीकडील काळात स्क्रब टायफस आजाराचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. या बरोबरच ट्रेकिंग, गिर्यारोहण करणाऱ्या, झाडाझुडूपात काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये देखील हा आजार विशेष दिसून येतो.

हेही वाचा >>> हॉर्लिक्स आता आरोग्यदायी पेय नाही; हिंदुस्तान युनिलिव्हरला हा निर्णय का घ्यावा लागला?

‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे या आजारात वाढ होते आहे. उष्ण आणि दमट भागात हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. हा आजार मुख्यत्वे करून भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, रशिया, जपान, ब्रम्हदेश या देशात अधिक आढळतो. तर भारतात हिमाचल प्रदेशात या आजाराचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये पूर्व आणि पश्चिम विदर्भातील जिल्हे, मराठवाडा, अहमदनगरमध्ये या आजाराचे रुग्ण अधिक संख्येने आढळून येत आहेत.

या जिवाणूने शरीरात प्रवेश केल्यापासून लक्षणे दिसायला १ ते ३ आठवडे लागतात. यालाच आजाराचा अधिशयन कालावधी असे म्हणतात.

स्क्रब टायफसची लक्षणे आणि उपचार

ज्या ठिकाणी कीटक चावतो, त्या जागी छोटासा काळा अल्सर तयार होतो. त्याला ‘इशार’(Eschar) असे म्हणतात. हा इशार बहुतेक वेळा मानेवर किंवा काखेत दिसून येतो. या आजारात ताप, डोकेदुखी, अंगदुखी, लिंफ नोड सूजणे, कोरडा खोकला, अंगावर रॅश उठणे अशी लक्षणे सर्वसामान्यपणे दिसून येतात. काही रुग्णांमध्ये न्यूमोनिया, मेंदूज्वर सदृश्य लक्षणे , मायोकार्डायटिस अशी गुंतागुंत दिसून येते. गंभीर रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे. आजाराच्या निदानासाठी एलायझा किंवा वेल फिलिक्स चाचणी करण्यात येते. स्क्रब टायफस आणि सर्व प्रकारच्या रिकेटशियन तापामध्ये डॉक्सिसायक्लिन हे ॲन्टीबायोटिक्स उपयुक्त आहे. अर्थात ते वैद्यकीय सल्ल्याने घेणे आवश्यक आहे.

स्क्रब टायफस हा आजार तसा सौम्य स्वरुपाचा असला तरी वेळेत उपचार घेतले नाहीत, तर गुंतागुंत निर्माण होऊन रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो त्यामुळे कोणताही ताप अंगावर काढणे योग्य नाही. वेळेत वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.

हेही वाचा >>> मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी ‘या’ वेळी व ‘इतका’ वेळ झोपणं गरजेचं! खाणं-पिणं, व्यायामाशिवाय ‘ही’ चूक ठरते घातक

आरोग्य विभागामार्फत स्क्रब टायफस आजाराची माईट नियंत्रणात आणण्यासाठी कीटकनाशकांचा वापर करण्यात येतो. जी मंडळी व्यवसाय किंवा इतर कारणांमुळे झाडाझुडपात जातात त्यांनी पूर्ण बाह्याचे पायघोळ कपडे वापरणे आवश्यक आहे. अनेकदा सहलीला किंवा पिकनिकला गेल्यावर तेथील हिरवळीवर, गवतावर बसण्याचा, झोपण्याचा आपल्याला मोह होतो. पण तो टाळायला हवा. एखादे शीट अंथरुनच आपण गवतावर बसायला हवे. खुल्या जागी शौचाला जाणे टाळणे आवश्यक आहे तसेच झाडाझुडपात काम करुन आल्यावर कपडे गरम पाण्यात भिजवून धुवावेत.

आवश्यकता असल्यास स्क्रब टायफस प्रभावित भागात अंथरुण पांघरुणावर देखील तज्ज्ञांच्या सल्ल्याने कीटकनाशक फवारणी काही वेळा करावी लागते. या आजारावर कोणतीही लस उपलब्ध नाही त्यामुळे प्रतिबंध हाच यावरील महत्वाचा उपाय आहे. स्क्रब टायफस हा एक प्राणीजन्य आजार आहे. अपघातानेच तो माणसाला होतो. अलीकडील काळात माणसाला होणाऱ्या प्राणीजन्य आजाराचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. म्हणूनच मनुष्य, प्राणी आणि पर्यावरण या तिन्ही घटकांचे आरोग्य परस्परावलंबी आहे हे लक्षात घेऊन ‘वन हेल्थ’ संकल्पना आरोग्यात महत्वाची ठरते आहे. ‘ वृक्षवल्ली आम्हां सोयरे, वनचरे, पक्षीही सुस्वरे आळवती,’ असे म्हणणारे तुकोबा तरी आपल्याला वेगळे काय सांगत होते ! ग्लोबल वॉर्मिंगच्या या काळात आपण अधिक सावध राहायला हवे, हे नक्की !