Seema Kapoor On Om Puri affair : दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्या पत्नी सीमा कपूरने अलीकडेच त्यांच्या वैवाहिक आयुष्याविषयी उघडपणे सांगितले. त्यांच्या बोलण्यातून विश्वासघात, वैयक्तिक हानी आणि भावनिक संघर्ष दिसून आला. सिद्धार्थ कन्नन (Siddharth Kannan)बरोबर संवाद साधताना सीमा कपूर यांनी ओम पुरी यांच्या प्रेमसंबंधाविषयी सांगितले, “ओम आणि नंदिता यांची भेट ‘सिटी ऑफ जॉय’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती.”
सीमा कपूर सांगतात, “आमच्या लग्नानंतर सर्व काही ठीक सुरू होते; पण या चित्रपटानं माझ्या आयुष्यात उलथापालथ केली. माझी चांगली मैत्रीण व विधू विनोद चोप्राची पहिली पत्नी रेणू सलुजा हिला या प्रेमसंबंधाबद्दल माहिती होती. पण तिला, सुधीर मिश्रा आणि इतर सर्वांना वाटलं की चित्रपटानंतर ओम योग्य मार्गावर येईल. मला या प्रेमसंबंधाबद्दल खूप नंतर म्हणजेच दिल्लीत असताना कळले. ओमनं मला फोन केला आणि सांगितलं की, तो दुसऱ्या कोणाला डेट करीत आहे. त्यावेळी माझ्या मित्रांनी सांगितलं की, तो फक्त हे लक्ष वेधून घेण्यासाठी करतोय.”
जेव्हा सीमा यांना समजले की, ओम पुरी त्यांना घटस्फोट देण्याबाबत खरंच गंभीर आहे, तेव्हा क्षणात त्यांचे अख्ख आयुष्य बदलले. सीमा सांगतात, “त्यावेळी मी मुंबईत परतली आणि मला त्यानंतर सर्व काही सामान्य वाटलं. तो एकदा शूटिंगसाठी शहराबाहेर गेला आणि त्याचं सामान बघत असताना मला प्रेम पत्रं सापडली. मी खूप घाबरले. प्रेमसंबंध असूनही मला त्याला कधीच घटस्फोट द्यायचा नव्हता. मी त्यावेळी गरोदर असल्यानं मला आमच्या नात्यातील या गोष्टी सुधारायच्या होत्या. त्याला माहीत होतं की, मी गरोदर आहे; पण हे नंदितासाठी असुरक्षिततेचं कारण होतं. ती माझ्यासमोर त्याला फोन करायची.”
सीमा पुढे सांगतात, “ही परिस्थिती खूपच वाईट होती. पुरीसाहेब खूप मद्यपान करायचे आणि नंदिता त्या गोष्टीचा बाऊ करायची. तेव्हा एका रात्री मी निघून जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मी तीन महिन्यांची गर्भवती होते.”
सीमा यांची ही कहाणी विशेषतः गर्भवती असताना संवेदनशील विषय, त्याग, भावनिक दुर्लक्ष व दुःख यांसारख्या गोष्टी महिला कशा हाताळतात याविषयीचे प्रश्न उपस्थित करते. सीमा सांगतात, “मला सांत्वन देणे सोडा; पण त्यानं त्याच्या सेक्रेटरीच्या मदतीनं मला २५ हजार रुपये पाठवले. मी ते नाकारले. त्याचा सेक्रेटरी मला म्हणाला होता, ‘हा अहंकारच तुम्हाला संपवत आहे’. त्याला तो अहंकार वाटला; पण माझ्यासाठी तो फक्त स्वाभिमान होता.”
गर्भधारणेदरम्यान विश्वासघाताचा स्त्रियांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो?
समुपदेशक सायकोलॉजिस्ट व किराना समुपदेशनचे सह-संस्थापक जय अरोरा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला याविषयीची माहिती दिली. जय अरोरा सांगतात, “अनेकदा गर्भधारणा हा आनंदाचा काळ म्हणून रोमँटिक वाटतो; पण मानसिकदृष्ट्या तो स्त्रियांच्या आयुष्यातील सर्वांत असुरक्षित टप्प्यांपैकी एक असतो. हार्मोनल चढ-उतार, बदलणारी ओळख आणि पूर्णपणे नवीन भूमिका पार पाडण्याची अपेक्षा यांमुळे यादरम्यान महिला अधिक भावनिक झाल्याचे दिसून येते. पण, जेव्हा या काळात महिलेचा विश्वासघात होतो तेव्हा त्या अत्यंत अस्थिर होऊ शकतात.”
जय अरोरा पुढे सांगतात, “गर्भधारणेदरम्यान भावनिक सुरक्षिततेसाठी एक स्त्री तिच्या जवळच्या व्यक्तीवर विशेषत: तिच्या जोडीदारावर जास्त अवलंबून असते. जेव्हा हे नातं तुटतं तेव्हा स्त्रीचं भावनिक आरोग्य खराब होऊ शकतं. तसेच, तिला मुलाच्या भविष्याची भीती वाटू शकते. ही भीती आणि निराधाराची भावना त्या स्त्रीला इतकी कमकुवत होऊ शकते की, त्याचा परिणाम गर्भाशयातील बाळाच्या विकासावर दिसू शकतो.
स्वाभिमान आणि अहंकार यांच्यातील फरक
जेव्हा सीमा कपूर सांगतात की, त्यांनी स्वाभिमानामुळे आर्थिक मदत नाकारली. तेव्हा त्या नकारात स्वाभिमानापेक्षा खोलवर काहीतरी दिसून येते. विश्वासघात झाल्यानंतर व्यक्तीला आर्थिक किंवा भावनिकदृष्ट्या समोरच्या व्यक्तीवर अवलंबून राहिल्याने स्वतःला पुन्हा हानी पोहोचवल्यासारखे वाटू शकते.
स्वाभिमान आणि अहंकार यांच्यात एक महत्त्वाचा मानसिक फरक आहे. स्वाभिमान हा स्वतःच्या मूल्याशी रुजलेला असतो आणि तो भावनिकदृष्ट्या सक्षम दाखवण्यास मदत करतो. पण, अहंकार हा सूड घेण्याचा प्रयत्न करतो. सीमा यांच्या बाबतीत त्यांचा निर्णय स्वाभिमानाशी अधिक जुळलेला वाटतो. स्वत:चा सन्मान जपण्यासाठी त्यांनी हा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता. त्यांना ओम पुरी यांना शिक्षा द्यायची नव्हती. स्वाभिमान निवडणे हे एक स्वातंत्र्य आहे, जे शांतपणे, निर्भयपणे आणि होणाऱ्या वेदनांचा सामना करून जपले जाऊ शकते.