मुक्ता चैतन्य
पुण्यातल्या नुकताच एका अल्पवयीन मुलीबरोबर घडलेली घटना सगळ्यानाच हादरवून टाकणारी होती. फ्री फायर गेमवर या मुलीची एका मुलाशी ओळख झाली. मैत्रीही झाली. ही मैत्री जवळपास तीन वर्ष होती. एकदा मुलीचा विश्वास संपादन केल्यावर समोरच्या मुलानेही या मुलीकडे न्यूड फोटोंची मागणी केली, समोरच्या व्यक्तीवर प्रचंड विश्वास असल्याने आणि हल्ली बरेच टीन्स एकमेकांना न्यूड्स पाठवतात त्यामुळे यात काही चुकीचं नाही असा समज करुन घेतल्यामुळे या मुलीनेही स्वतःचे न्यूड फोटो मुलाला दिले. त्यानंतर काही काळ नियमित चॅटिंग सुरु होते. मात्र काही काळाने त्या मुलाने मुलीला त्रास द्यायला सुरुवात केली. तिने तो सांगेल तेव्हा त्याच्याशी चॅट केलं पाहिजे, तो म्हणेल तेव्हा गेमिंग केलं पाहिजे, त्याचे कॉल्स उचललेच पाहिजेत असा दबाव आणायला त्याने सुरुवात केली. मधल्या काळात मुलीशी गोड गोड बोलून तिच्या घरच्यांचे फोन नंबर्स मिळवले होते. जेव्हा मुलगी दबावाला बळी पडत नाहीये, बोलत नाही, बधत नाही हे त्याच्या लक्षात आलं आणि तिने त्याचा नंबर ब्लॉक केला हे समजल्यावर त्या मुलाने तिचे न्यूड फोटो तिच्या कुटुंबीयांना पाठवून तिला धमकावण्याचा प्रयत्न केला.
सायबर गुन्ह्यातील सायबर ग्रूमिंग हा प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे आणि हा प्रकार कुठल्याही वयातल्या मुलं-मुली कुणाही बरोबर होऊ शकतो. सोशल मीडियावर, गेमिंग प्लॅटफॉर्मवर अनोळखी लोकांची ओळख होते. मैत्री होते. दर वेळी आपण ज्या अनोळखी लोकांच्या संपर्कात येऊ ते खरे असतीलच असं नाही. ऑनलाईन जगात अनेक लोक खोटी नावं आणि प्रोफाईल्ससह फिरत असतात. त्यात गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचाही समावेश असतोच. ही माणसं करतात काय तर जाणीवपूर्णक टिनेजर्सच्या संपर्कात येतात. त्यांच्याशी छान मैत्री करतात. मैत्री करुन विश्वास संपादन करतात. मुलांचा पूर्ण विश्वास जोवर तयार होत नाही तोवर ते कसलीही अवाजवी मागणी करत नाहीत. वाह्यात पद्धतीने बोलत-लिहीत नाहीत. काहीही चुकीचं शेअर करत नाहीत. त्यामुळे टीनएजर्सना त्या चॅटिंगमध्ये काहीच धोका वाटत नाही. जेव्हा विश्वासाचं नातं तयार होतं त्यानंतर मग हे गुन्हेगार टिनेजर्सना जाळ्यात अडकवायला सुरुवात करतात. त्यात स्वतःचे न्यूड फोटो/व्हिडीओ पाठव अशी मागणी असते. काहीवेळा घरच्यांच्या बँकेचे किंवा इतर काही खासगी माहिती देण्यासाठी दबाव असतो. आणि हे गुन्हेगार जे सांगतील ते केलं नाही तर फोटो/व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. अनेकदा प्रेमाच्या, डेटिंगच्या नात्यातही न्यूड फोटोंची देवाण घेवाण होते आणि ब्रेकअप नंतर ते फोटो रागाच्या भरात व्हायरल होतात.
आणखी वाचा-Mental Health Special: हसणे मन:स्वास्थ्यासाठी किती आवश्यक?
स्वतःचे न्यूड्स इतरांना पाठवणं यात मुळांतून बरंच काही चुकीचं आहे हे अनेकदा मुलांच्या डोक्यातच येत नाही कारण त्यांच्या वयातल्या अनेकांनी असे न्यूड्स पाठवलेले असतात. त्यामुळे न्यूड पाठवणं ट्रेंड आहे, त्यात चुकीचं काहीही नाही अशी समजून अनेकांची होते. आपल्या समवयीन मुलांमध्ये आपला स्वीकार व्हायला हवा, आपणही कुल, यो, ट्रेंडी आहोत या सगळ्यांना समजलं पाहिजे या भावनेतूनही मुलं या गोष्टी अनेकदा करतात. सायबर गृमिंग करणारे जाणीवपूर्वक लैंगिकतेबद्दलच्या मुलांच्या मनातल्या संवेदनशीलता मारून टाकतात. ही प्रक्रिया दीर्घकाळ आणि हळूहळू केली जाते. जसं या मुलीच्या केसमध्ये घडलं. दीर्घकाळ मैत्री असल्याने आपल्याकडे जी मागणी झालेली आहे ती अवास्तव आहे हे त्या मुलीच्या लक्षातच आलं नाही. इतकं तिच्या मनाचं आणि विचारांचं कंडिशनिंग झालेलं होतं.
या गोष्टी आपल्या मुलांच्या बाबतीत घडू नये यासाठी खालील गोष्टी लक्षात घ्या.
१) सायबर जगतात सायबर ग्रूमिंग करणारी लोकं असतात याची माहिती मुलांना द्या.
२) अनोळखी लोकांशी मैत्री करताना सावधानता बाळगायला सांगा.
३) अनोळखी लोकांशी परिचय झाला तरी कुठलीही खासगी माहिती कधीही शेअर करायची नाही हे सांगा.
४) अनेकदा मुलांकडून न्यूड्सची मागणी केली जाते, अशी कुठलीही मागणी झाली तर लगेच मोठ्यांना कुणाला तरी सांगितलं पाहिजे हे मुलांना माहित असायला हवा. तो विश्वास मोठ्यांविषयी वाटायला हवा.
५) तेरा वर्षांच्या खालची मुलं सोशल मीडियावर नाही ना हे चेक करा. आठ, दहा, तेरा-चौदा वर्षांची मुलं गेमिंग करताना कुणाच्या संपर्कात आहेत याविषयी मुलांशी बोला. पालक आणि मुलं यांच्यात संवाद असेल तर मुलं सगळ्या गोष्टी येऊन पालकांना सांगतात आणि त्यातून आपली मुलं सुरक्षित आहेत की धोक्यात याचा अंदाज पालकांना येऊ शकतो.