Calcium Levels In Women : हाडांच्या चांगल्या आरोग्यासाठी कॅल्शियम हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. याशिवाय इतर शारीरिक कार्यांसाठी कॅल्शियम अत्यंत आवश्यक आहे. विशेषत: ज्या महिलांना मेनोपॉज आला आहे, त्यांच्या शरीरात कॅल्शियमची मात्रा कमी असते. पण, तुमच्या शरीरात कॅल्शियमची मात्रा कमी आहे, हे कसे ओळखावे? जाणून घेऊ या.
पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकच्या प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. कोमल भादू (Dr Komal Bhadu) सांगतात, “पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये कॅल्शियमची पातळी कमी असते, प्रामुख्याने असं हार्मोन्समध्ये झालेल्या बदलांमुळे होतो. यात इस्ट्रोजेन हार्मोन महत्त्वाची भूमिका बजावतात.
इस्ट्रोजेन हार्मोन कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करतो आणि हाडे मजबूत करतो. मेनोपॉजनंतर महिलांच्या शरीरातील इस्ट्रोजेनची मात्रा कमी होते. त्याचबरोबर आहाराच्या सवयी, गर्भधारणा आणि स्तनपानाचासुद्धा परिणाम महिलांच्या कॅल्शियम पातळीवर होतो,” असे डॉ. भादू सांगतात.
महिलांमध्ये कॅल्शियमची मात्रा कमी आहे हे कसे ओळखावे?
कॅल्शियमच्या कमतरतेची अनेक लक्षणे दिसून येतात. सुरुवातीला हे लक्षणे लहान वाटू शकतात, पण कालांतराने ही लक्षणे आणखी गंभीर होऊ शकतात.
१. स्नायूंचे दुखणे वाढू शकतात, पाठ आणि पायामध्ये वेदना जाणवतात.
२. अचानकपणे हाता-पायाला मुंग्या येऊ शकतात.
३. जर तुम्हाला सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल तर तुमच्या शरीरात कॅल्शियमची मात्रा कमी असू शकते.
४. निरोगी त्वचा आणि नखांसाठी कॅल्शियमची मात्रा नीट असणे आवश्यक आहे. कॅल्शियममुळे तुमची त्वचा निरोगी राहते.
५. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दाताच्या समस्या वाढतात.
६. न्यूरोट्रांसमीटरच्या कार्यावर परिणाम करणारी कॅल्शियमची कमी मात्रा व्यक्तीमध्ये चिंता, नैराश्य आणि चिडचिड निर्माण करते.
७. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हृदयाचे ठोके अनियमित दिसून येतात, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो.
कॅल्शियमची मात्र कशी वाढवावी?
कॅल्शियमयुक्त आहार घ्या. दुग्धजन्य पदार्थ जसे की दूध, चीज आणि दही त्याचप्रमाणे हिरवा भाजीपाला, बदाम, धान्ये, ऑरेंज ज्यूससारखे पौष्टिक पदार्थ खावेत.
व्हिटॅमिन डी आतड्यांमधील कॅल्शियम शोषून घेते. सूर्यप्रकाश आणि आहार कॅल्शियमची मात्रा संतुलित ठेवण्यास मदत करते.
जर कॅल्शियमयुक्त आहार तुम्हाला पुरेसा नसेल तर कॅल्शियमचे सेवन करा. तुमच्या आरोग्य तज्ज्ञांशी संवाद साधा आणि त्यांच्या सल्ल्याने कॅल्शियमचा डोस घ्या.
चालणे, सकाळी फिरायला जाणे, स्ट्रेंथ ट्रेनिंगसारखे व्यायाम करा, ज्यामुळे तुमची हाडे मजबूत होतील आणि कॅल्शियमची मात्रा सुधारण्यास मदत होईल.
मेनोपॉजनंतर महिलांना कॅल्शियमची मात्रा संतुलित ठेवण्यासाठी औषधी लिहून दिली जातात.
निरोगी आरोग्यासाठी महिलांनी कॅल्शियमची पातळी तपासणे आवश्यक आहे, जेणेकरून कॅल्शियमची कमतरता लक्षात येईल आणि योग्य वेळेवर उपचार घेता येईल.