Shah Rukh Khan’s heat stroke : बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानला ४५ अंश तापमान असलेल्या उष्णतेमध्ये कोलकाता नाईट रायडर्स या त्याच्या संघाचा जयजयकार करणे चांगलेच महागात पडले. मंगळवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामना पाहण्यासाठी हा अभिनेता अहमदाबादमध्ये आला होता. या सामन्यादरम्यान निर्जलीकरण (शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे) आणि उष्माघातामुळे त्याला अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करावे लागले. शाहरूख खानचे वय सध्या ५८ वर्षे आहे. तो आपल्या आरोग्याची योग्य रीतीने काळजीदेखील घेतो. पण डॉक्टर सांगतात, “तुम्ही कितीही तंदुरुस्त असलात तरी बराच काळ उच्च तापमानाच्या संपर्कात राहिल्यास तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो.”
“तुमचे वय ५० पेक्षा जास्त असल्यास आणि उच्च रक्तदाब व मधुमेह यांसारखे आजार असल्यास निर्जलीकरण आणि अतिउष्णतेचा तुमच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो,” असे नवी दिल्ली येथील सर गंगाराम हॉस्पिटलमधील अंतर्गत औषध विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. एम. वाली यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.
उष्माघाताच्या वेळी शरीरात नक्की काय होते?
उच्च तापमानाशी संपर्क आणि भरपूर घाम येणे यांमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होते आणि शरीराचे तापमान वाढते. “शरीराची सहानुभूतीशील मज्जासंस्था (sympathetic nervous system) सक्रिय होते. याचा अर्थ शरीराला संकटाची परिस्थिती जाणवते आणि शरीर तणाव हॉर्मोन्स सोडण्यास सुरुवात करते. कमी पाण्यामुळे रक्ताचे प्रमाणही कमी होऊन घट्ट होत जाते आणि रक्त अधिक प्रमाणात पंप करण्यासाठी हृदय आणि रक्तवाहिन्यांवर जास्त ताण येतो; ज्यामुळे त्वचेमध्ये उष्णता लवकर पसरू शकते. उष्माघातानंतर शरीर त्याचे तापमान नियंत्रित करू शकत नाही. घाम येणे व बाष्पीभवन या क्रिया होणे कठीण होऊन बसते आणि त्यामुळे शरीराचे तापमान सामान्य राहू शकत नाही. जेव्हा उष्माघात होतो तेव्हा शरीराचे तापमान १० ते १५ मिनिटांत १०४°F(फॅरेनहाइट) किंवा त्याहून अधिक वाढू शकते. म्हणूनच रुग्णाला थंड वातावरणात ठेवून सलाइनद्वारे शरीराचे तापमान कमी करावे लागते. मानेवर, हाताखाली व मांडीच्या भागात बर्फाचे पॅक्स ठेवतात; ज्यामुळे शरीराचे तापमान स्थिर राहू शकेल,” असेडॉ. वाली यांनी सांगितले.
हेही वाचा – रोज सकाळी ब्रेड खाणे आतड्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक?अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थ खाणे का टाळावे?
निर्जलीकरणाची लक्षणे काय? वाढत्या वयानुसार तुम्हाला ते का जाणवत नाही?
डॉ. वाली यांच्या मते, “तुम्हाला लघवी किती वेळा होतेय याकडे लक्ष द्या. निर्जलीकरण झाल्यास लघवी होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. “मूत्राचा रंगही गडद पिवळा असू शकतो. तुमचे तोंड कोरडे होऊ शकते, अस्वस्थ वाटू शकते, डोकेदुखी, ताप, धाप लागणे, हृदयाची गती वाढणे आणि रक्तदाब कमी होऊ शकतो. आपण जेव्हा लहान असतो तेव्हा शरीर पाण्याची गरज असल्याचे लक्षण दर्शवते. पण जसजसे आपले वय वाढते तसतसे शरीराला पाण्याची गरज असल्याची लक्षणे जाणवत नाहीत. त्यामुळे तुमच्या शरीराला कार्य करण्यासाठी द्रवपदार्थांची गरज भासत असली तरीही तुम्हाला पुरेशी तहान लागणार नाही. त्यामुळे पुरेसे पाणी न प्यायल्याने तुम्हाला निर्जलीकरणाचा धोका असतो.”
आपण निर्जलीकरण कसे टाळू शकतो? तुम्ही किती पाणी प्यावे?
निर्जलीकरण टाळण्यासाठी लोकांनी उच्च तापमान असलेल्या दिवसांत किमान चार ते सहा लिटर पाणी प्यावे. “तासानंतर पाणी, फळांचे रस किंवा बेल ज्यूस (bael juice) (उष्णतेचा उत्तम प्रतिकार करणारे) पित राहा. तुम्हाला तहान लागली आहे, असे वाटत नसले तरीही तुम्हाला इलेक्ट्रोलाइट्स असलेले पेय पिणे आवश्यक आहे; जेणेकरून तुम्ही घामामुळे गमावलेले शरीरातील क्षार भरून काढू शकता. तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकणे टाळू शकत नसल्यामुळे तुमच्याबरोबर नेहमी पाण्याची बाटली ठेवा. लक्षात ठेवा थंडगार बीअर निर्जलीकरण करते आणि मज्जासंस्थेमध्ये बदल घडवून आणते. धूम्रपान आणि मद्यपानाचे प्रमाण मर्यादित करा,” असे डॉ. वाली सांगतात.
हेही वाचा – गोड पदार्थ खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
उन्हात बाहेर पडताना तुम्ही काय करावे?
“दुपारी सर्वांत अधिक उष्णतेच्या वेळी घरामध्ये राहणे चांगले आहे. परंतु, जर एखाद्याला बाहेर पडायचे असेल, तर थेट उन्हापासून स्वतःचे संरक्षण करा. हलके, सैलसर, सुती कपडे वापरा. परावर्तित पांढरी छत्री सोबत ठेवा. तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे तिथे पोहोचण्याच्या १० मिनिटे आधी तुमच्या कारचा एसी बंद करा. पार्किंग करताना खिडक्या उघड्या ठेवा. उन्हात गाडी तापत असल्यामुळे पुन्हा गाडी बसण्याआधी काही वेळ ती थंड होऊ द्या. त्यासाठी काही काळ दरवाजे किंवा खिडक्या उघड्या ठेवा,” असे डॉ. वाली सुचवतात.