Shah Rukh Khans Daily Routine Fitness Secret : बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान वयाच्या ५८ व्या वर्षीदेखील एकदम फिट अँड फाइन दिसतो. शाहरुख खानने आपल्या अभिनय कारकिर्दीत एकापेक्षा एक अशा सरस भूमिका साकारल्या, यातील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचीही पसंती मिळाली. चित्रपटांव्यतिरिक्त हा अभिनेता आता त्याच्या फिटनेसमुळेदेखील चांगलाच प्रकाशझोतात आला आहे. किंग खान, पठाणसारख्या चित्रपटामधील त्याचे सिक्स पॅक अॅब्स पाहून चकित झाले. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान शाहरुख खानने त्याच्या डेली रुटीनबद्दल असा काही खुलासा केला, जे जाणून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
‘द गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान किंग खान म्हणाला की, ९० च्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा मी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा मी ॲथलिट होतो. मला नेहमीच तंदुरुस्त राहायला आवडते. माझे स्वप्न होते की, माझे सिक्स पॅक अॅब्स असावे आणि खूप निरोगी शरीर असावे, यासाठी मी खूप मेहनतही करायचो.
शाहरुख खानने पुढे सांगितले की, तो रोज सकाळी ५ वाजता झोपतो आणि मग सकाळी ९ किंवा १० वाजता उठतो. त्याच वेळी तो एखाद्या चित्रपटाचे शूटिंग करत असला तर तो रात्री २ च्या सुमारास घरी येतो आणि नंतर अंघोळ करतो आणि झोपण्यापूर्वी दररोज अर्धा तास व्यायाम करतो. इतकंच नाही तर अभिनेत्याने खुलासा केला की, तो दिवसातून एकदाच जेवतो.
ही पद्धत योग्य आहे का? (Shah Rukh Khan Details His Daily Routine)
किंग खानचे हे डेली रुटीन ऐकून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. रात्री २ च्या सुमारास व्यायाम करणे, सकाळी ५ वाजता झोपणे आणि नंतर सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत उठणे, हे डेली रुटीन कितपत योग्य आहे ते जाणून घेऊया तज्ज्ञांकडून.
हेही वाचा – बापरे! मीठ अन् साखरेमधून तुम्ही रोज खाताय ‘ही’ अतिशय घातक घटक; संशोधनातून धक्कादायक खुलासा
आरोग्यतज्ज्ञ काय म्हणतात?
या विषयावर इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलचे सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार म्हणाले की, ‘प्रौढांसाठी रात्री ७ ते ९ तासांची झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. शाहरुखने सांगितल्याप्रमाणे तो ५ वाजता झोपतो आणि ९ वाजता उठतो. म्हणजेच तो दररोज फक्त चार ते पाच तास झोपतो. पण, पाच तासांपेक्षा कमी झोपल्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, मेटाबॉलिक सिंड्रोम, हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आणि काही प्रकारच्या कर्करोगाचा धोकादेखील वाढू शकतो.
डॉ. कुमार यांच्या मते, रात्री ११ वाजण्यापूर्वी झोपणे ही सर्वोत्तम वेळ आहे. म्हणजेच निरोगी राहण्यासाठी मध्यरात्रीच्या आधी झोपले पाहिजे. यामुळे आपल्या शरीरातील सर्केडियन रिदम बरोबर राहते.
डॉ. कुमार यांच्या व्यतिरिक्त अनेक संशोधन परिणामदेखील दर्शवतात की, जर तुम्ही रोज रात्री उशिरा झोपत असाल तर यामुळे हृदयविकारांसह अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
डॉ. कुमार पुढे म्हणाले की, ३० मिनिटे वर्कआऊट करणे शरीरासाठी फायदेशीर असले तरी पहाटे ३ वाजता ३० मिनिटे व्यायाम करणे ही सर्वोत्तम वेळ नाही. संध्याकाळच्या वेळात वर्कआऊट करणे सोयीचे ठरते. कारण व्यायाम करण्याची वेळ आणि झोपेची वेळ जवळ आल्याने झोपेसंबंधित त्रास होऊ शकतो.
दिवसातून एकदाच जेवण्याच्या सवयीबाबत डॉ. कुमार म्हणाले की, यावर कोणत्याही नियंत्रित चाचण्या नसल्या तरी मानव आणि प्राण्यांवर केलेल्या अनेक अभ्यासामधून असे दिसून आले आहे की, अधूनमधून असे उपाशी राहिल्याने विविध आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.