Five Reasons Why Should You Start Eating Dinner Early : अनेकांना मध्यरात्री प्रचंड भूक लागते, त्यामुळे काही जण रात्री काही खायला आहे का हे स्वयंपाकघरात जाऊन शोधू लागतात, नाही तर मॅगी बनवून खातात. तर काही जण रात्री अगदी लवकर जेवून थेट सकाळचा नाश्ता करतात. तर मध्यरात्री खाण्याचे तोटे आणि रात्री लवकर जेवण्याचे काय फायदे असतात, याबद्दलच आपण या बातमीतून जाणून घेऊया… शाहिद कपूर शाकाहारी जेवण खातो आणि आहाराचा अतिरेक करण्यापासून दूर राहतो. एवढेच नाही तर अभिनेता रात्रीच्या वेळी जास्त खाणेदेखील टाळतो आणि पहाटे ३ वाजता जेवणे किंवा खाणे त्याला पसंत नाही.
कर्लीटेल्सला दिलेल्या मुलाखतीत ४४ वर्षीय अभिनेता शाहिद कपूर म्हणाला की, तो जेवणामध्ये १२ तासांचे अंतर ठेवण्याचा प्रयत्न करतो. दिवसातले त्याचे शेवटचे जेवण रात्री ८ वाजता असते. पण, कधी जेवायला ९ वाजले की तो चिडतो. त्याचे हे विधान ऐकून इंडियन एक्स्प्रेसने लवकर जेवण्याचे काय फायदे आहेत याबद्दल जाणून घेण्यासाठी आरोग्य प्रशिक्षक आणि MY22BMI च्या संस्थापक, पोषणतज्ज्ञ प्रीती त्यागी यांच्याशी चर्चा केली.
तेव्हा त्या म्हणाल्या की, बेफिकीरपणे खाणे, विशेषतः रात्री उशिरा, ही अशी खाण्याची वृत्ती आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुम्ही किती अन्न खाता, त्याची गुणवत्ता किंवा प्रमाण माहीत नसते. असे अनेकदा घडते, जेव्हा तुमचे मन विचलित असते. उदाहरणार्थ – जेव्हा तुम्ही कामाची डेडलाइन जवळ येत असताना जास्त काम करता, तेव्हा तुमची ही भावना तुम्हाला गरज नसतानाही जास्त अन्न खाण्यास प्रवृत्त करते. पण, तज्ज्ञांच्या मते एखाद्याने अन्नाव्यतिरिक्त इतर गोष्टींद्वारे त्यांच्या भावनिक गरजा पूर्ण करायला हव्यात, कारण तुमच्या समस्या काहीही असोत, त्यावरील उपाय प्रत्येकवेळी फ्रिजमध्ये दडलेला नसतो.
या समस्येवर आणखी उपाय काय? (Benefits Of Early Dinner)
रात्री उशिरा जास्त जेवल्याने झोपेत व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे विश्रांती घेणे, झोपणे कठीण होऊ शकते. त्यामुळे दिवसाचे शेवटचे जेवण झोपण्यापूर्वी किमान २.५ ते ३ तास आधी पूर्ण करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. यापेक्षा उशिरा जेवण केल्याने शरीरात चरबी साठते आणि परिणामी वजनसुद्धा वाढते, असे पोषणतज्ज्ञ आणि डीटीएफच्या संस्थापक सोनिया बक्षी म्हणाल्या आहेत.
झोपण्यापूर्वी चांगल्या खाण्याचे इतर महत्त्वाचे फायदे म्हणजे पचन सुधारणे आणि झोपेची गुणवत्तासुद्धा सुधारण्यात मदत होते, हा आहे. संध्याकाळी ७ ते ८ वाजण्याच्या सुमारास शेवटचे जेवण केल्याने तुमचे शरीर कॅलरीज प्रभावीपणे बर्न करू शकते आणि रात्री विश्रांतीच्या स्थितीत येण्यापूर्वी पोषक तत्वे आत्मसात करू शकते. हे महत्त्वाचे आहे, कारण आपण झोपतो तेव्हा आपले चयापचय आपोआप कमी होते, असे पुण्याच्या बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलचे वरिष्ठ आहारतज्ज्ञ डीटी स्वाती संधान म्हणाल्या.
तसेच रात्री उशिरा जेवल्याने अन्न व्यवस्थित पचत नाही, त्यामुळे वजन वाढते आणि हेच शरीर अन्न पचवण्याचा प्रयत्न करते तेव्हा वेदना, छातीत जळजळ आणि अतिक्रियाशील चयापचय होऊ शकतो. जेव्हा तुम्ही लवकर जेवता, तेव्हा तुमच्या शरीराला या आव्हानांना तोंड देण्याची शक्यता कमी असते, ज्यामुळे रात्री खूप शांत झोप मिळते, असे स्वाती संधान म्हणाल्या आहेत.