Shevgyachi Chutney Recipe & Benefits: ताटात भलेही चार भाज्या, डाळी, नसल्या तरी चालतील, पण एक चमचाभर चटणी, ठेचा, लोणचं चार घास जास्त खायला भाग पाडू शकते. याच चटण्या थोड्या विचारपूर्वक आणि योग्य पदार्थ वापरून केल्या तर फक्त चवीलाच नाही तर आरोग्याला सुद्धा हातभार लावू शकतात. अशीच एक हेल्दी चटणीची रेसिपी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याला पारंपरिक नाव आहे, ‘मोरिंगा थोरियल’. मोरिंगा म्हणजे शेवग्याचा पाला आणि थोरियल ही चटणी वजा ठेचा अशी रेसिपी आहे. शालिनी संतोष कुमार यांनी ही रेसिपी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली होती, आज आपण ही रेसिपी व त्याचे फायदे सुद्धा जाणून घेणार आहोत.

शेवग्याच्या पानांची चटणी कशी बनवायची?

साहित्य

  • १ कप – शेवग्याची पाने
  • १ टीस्पून – चणा डाळ
  • १ चमचा – उडदाची डाळ
  • १ – लाल मिरची
  • २-३ – लसूण पाकळ्या
  • ५-६ – लहान कांदे
  • ४ चमचे – किसलेला नारळ
  • २ कप – तांदूळ
  • २ टीस्पून -लाकडी घाण्याचे शेंगदाणा तेल
  • कडीपत्ता
  • चिंचेचा एक छोटा तुकडा
  • चवीनुसार मीठ

रेसिपी

  • शेवग्याची पाने चांगली स्वच्छ करून घ्या
  • लोखंडी कढईत शेंगदाणा तेल घाला आणि त्यात उडीद डाळ, चणा डाळ, लाल तिखट आणि कडीपत्ता घालून फोडणी तडतडू द्या.
  • आता त्यात लसूण, व किसलेले खोबरे घालून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतावे.
  • शेवटी त्यात चिंच आणि मीठ घाला.
  • एकदम थंड झाल्यावर पारंपारिक पद्धतीने शक्य असल्यास पाटा वरवंट्यावर वाटून घ्या यामुळे छान दाणेदार चव लागते.
  • गरमागरम भात आणि तुपाबरोबर ही चटणी खा.

तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात शेवग्याचा समावेश का करावा?

आहारतज्ज्ञ सिमरत भुई यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, शेवग्याच्या शेंगा किंवा पाला हा त्याच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे फायदेशीर मानला जातो. शिवाय या पानांमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते त्यामुळे संधिवाताचा त्रास असलेल्यांसाठी हा पाला फायद्याचा ठरू शकतो. काहींना दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी असते अशावेळी हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

डॉ अर्चना बत्रा, आहारतज्ज्ञ आणि प्रमाणित मधुमेह प्रशिक्षक म्हणाल्या की, शेवग्याचा पाला हा जादुई आहे म्हणायला हरकत नाही. शेवगा हा अत्यावश्यक पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहे, जो असंख्य आरोग्यदायी फायदे देतो. ‘मोरिंगा थोग्याल’ म्हणजेच शेवग्याच्या पानांची चटणी ही एक पारंपारिक दक्षिण भारतीय रेसिपी आहेत जी पौष्टिक व चविष्ट आहे. शेवग्याच्या पानांमध्ये जीवनसत्वे व खनिजे मुबलक प्रमाणात असतात. पाहायला गेल्यास त्यात

संत्र्यापेक्षा सातपट जास्त व्हिटॅमिन सी, दुधापेक्षा चारपट जास्त कॅल्शियम आणि केळीपेक्षा तीनपट जास्त पोटॅशियम असते. याव्यतिरिक्त, शेवगा लोह, व्हिटॅमिन ए आणि अत्यावश्यक अमीनो ऍसिडने भरलेला आहे. थोग्याल (चटणी) बनवल्यावर, ही पोषकतत्त्वे चविष्ट स्वरूपात शरीराला पुरवली जातात.

भुई यांच्या म्हणण्यानुसार, शेवग्याची पाने पाण्यात मिसळल्यास ते ‘उत्तम डिटॉक्सिफायिंग वॉटर’ म्हणून काम करतात. यकृत स्वच्छ करण्यासह ते पोटदुखीच्या उपचारात याचा फायदा होता. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहून हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचा धोका कमी करता येतो. त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले योगदान देतात.

हे ही वाचा<< रक्तातील साखर १५ ते १० टक्के कमी करण्यासाठी जेवणात ‘या’ दोन गोष्टी वापराव्याच? डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले फायदे व मर्यादा

शेवग्यामधील व्हिटॅमिन ए दृष्टीसाठी उत्तम काम करतात, व्हिटॅमिन सी त्वचेच्या आरोग्यासाठी कोलेजन निर्माण करण्यास मदत करते. धर्मशिला नारायणा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वरिष्ठ आहारतज्ज्ञ पायल शर्मा यांनी सांगितले की, “शेवग्याच्या पानांमध्ये लोह आणि व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स देखील असतात, जे ॲनिमियाशी लढण्यासाठी आणि ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात.

तज्ज्ञांचा मते, शेवग्याच्या पानांमध्ये प्रतिजैविक आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म देखील असतो, जे आजारांच्या संक्रमणास आळा घालते व पचनाला हातभार लावते.