डॉ. अश्विन सावंत
Health Special: आपल्याकडे पूर्वी युद्धावर जाणार्या योद्ध्याला हातावर दही देऊन निरोप दिला जात असे. आपल्या माणसाने शौर्य गाजवून यशस्वी होऊन घरी परतावे, अशी अपेक्षा दही हातावर घालणारी गृहिणी मनात बाळगत असे. याच अपेक्षेने पुढे भारतामध्ये जेव्हापासून घरातला विद्यार्थी परीक्षेला जाऊ लागला, तेव्हा त्याने त्या परिक्षा नामक युद्धामध्येसुद्धा यश मिळवून यावे यासाठी आई किंवा बहीण त्याच्या हातावर दही देते. तशीही परीक्षेच्या आधी व दरम्यान युद्ध असल्यासारखीच परिस्थिती घरात व समाजामध्ये असते. (जी खरं तर बदलली पाहिजे.)
इथे प्रश्न असा की, युद्धावर वा परीक्षेला जाणार्याच्या हातावर दही देण्याचे कारण काय? युद्ध असो वा परीक्षा त्यात यशस्वी होण्यासाठी शरीराला गरज असते उर्जेची आणि उर्जा मिळते आहारामधून. पण मुबलक उर्जा देणारा आहार खाऊन युद्धावर वा परिक्षेला जाता येईल काय?
मुबलक उर्जा देणारे जेवण भरपेट जेवून ना युद्ध लढता येईल, ना परिक्षा देता येईल. भरपेट जेवल्यानंतर शरीराचा रक्तपुरवठा पचनसंस्थेकडे जातो, इतर अवयवांचा रक्तपुरवठा गरजेपुरताच मर्यादित होतो. साहजिकच शरीराला आणि बुद्धीला मांद्य येते, उत्साह कमी होतो आणि आळस वाढतो. अशा अवस्थेमध्ये युद्धात पराभूत व परिक्षेमध्ये अपयशी होण्याचीच शक्यता अधिक.
हेही वाचा >>>आराम म्हणजे फक्त झोप घेणे का? विश्रांतीचे नेमके किती आहेत प्रकार? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
एक मोठा ग्लास भरून दूध ४८ उष्मांक देईल, मात्र त्याने पोट जड होईल. मुबलक उर्जा देणारे एक वाटी श्रीखंड खाऊन तुम्ही परिक्षेला गेलात, तर काय होईल?परिक्षेच्या तीन तासांचा सदुपयोग झोपण्यासाठी होईल. बरं, पचायला हलके असलेले एक ग्लास ताक पिऊन परिक्षेला गेलो तर? एकतर तेवढ्या ताकामुळेही पोट टम्म होते, काही मिनिटे तरी हालचाल करणे कठीण होते. दुसरं म्हणजे १०० ग्रॅम ताक उर्जा देणार किती? जेमतेम १५ उष्मांक.
या पार्श्वभूमीवर मात्रेमध्ये कमी असुनही शरीराला आवश्यक तेवढे उष्मांक देणारा, मात्र पोटाला जड न करणारा असा पदार्थ कोणता? तो आहे, दही. १०० ग्रॅम दही शरीराला ६० उष्मांक पुरवते. त्याहीपेक्षा विशेष गुण दह्यामध्ये आहे; तो असा की, दही सावकाशीने पचते, खूप वेळ पोटाला आधार देते व शरीराला हळूहळू दीर्घकाळपर्यंत उर्जा पुरवत राहते. महत्त्वाचं म्हणजे त्या काळामध्ये पोट जड होत नाही. याचाच अर्थ शरीर व मस्तिष्काचा रक्तपुरवठा पचनसंस्थानाकडे वळवण्याची गरज भासत नाही, म्हणजेच शरीराला व बुद्धीला मांद्य येण्याचा धोका तर राहात नाही, उलट तरतरी येते. मथितार्थ हाच की युद्धात शरीराला आणि परिक्षेमध्ये बुद्धीला दीर्घकाळ उर्जा पुरवून उत्साही ठेवण्यासाठीच दही दिले जाते.
हेही वाचा >>>Health Special: मिरची खाल्ल्याने खरंच वजन कमी होतं?
सूचना – दही वसंत ऋतुमध्ये निषिद्ध आहे हे ध्यानात ठेवून निदान सर्दी, कफ, ताप, खोकला, सायनसायटीस, दमा वगैरे श्वसनविकारांनी किंवा सांधेदुखी, सांध्यांना सूज, अंगाला सूज अशा समस्यांनी त्रस्त असलेल्यांनी दही वर्ज्य समजावे.