उन्हाळा सुरू झाला की सर्वांना कैरी आणि आंबा खाण्याचे वेध लागतात. आंबट कैरी आणि गोड आंबे खाल्ल्यानंतर तृप्त झाल्यासारखे वाटते. आज काल लोक आरोग्याबाबत सजग झाले आहेत, ज्यामुळे कोणतीही गोष्ट खाण्यापूर्वी त्याचा आरोग्यावर कसा परिणाम होईल याचा विचार करतात. याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना डॉ. रिचा चतुर्वेदी सांगतात की, “आंब्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने ते कच्चा आंबा म्हणजेच कैरी खाऊ शकतात का, असा प्रश्न अनेक रुग्ण मला विचारतात. कच्चे आणि पिकलेले आंबे यांच्यातील फरक आणि मधुमेहींसाठी कैरी चांगले आहे का ते जाणून घेऊ या.
मधुमेहींसाठी कैरी सेवन करणे सुरक्षित आहे का?
डॉ. चतुर्वेदी सांगतात, “आंबे पिकत असताना त्यांच्या स्टार्चचे प्रमाण नैसर्गिकरित्या ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोजसारख्या साखरेत रूपांतरित होते. ही प्रक्रिया पिकलेले आंबे गोड करते आणि त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) लक्षणीयरीत्या वाढवते. जीआय (GI) हे अन्न रक्तातील साखरेची पातळी किती लवकर वाढवते हे मोजण्याचे एकक आहे.”
पिकलेले आंबे जीआय (GI): विविधता आणि पिकण्याच्या प्रमाणात अवलंबून ५१ ते ६० दरम्यान जीआय (GI) असतो.
कैरी जीआय (GI) : सामान्यतः कमी जीआय (GI) असतो; साधारण ४१ ते ५५ दरम्यान, कारण त्यात नैसर्गिक साखर कमी असते आणि जास्त फायबर आणि स्टार्च घटक असतात.
“कैरीतील साखर आणि जीआय पातळी कमी असल्याने रक्तप्रवाहात ग्लुकोज मंद आणि स्थिरतेने सोडले जाते, यामुळे मधुमेहींसाठी ते एक सुरक्षित पर्याय बनते; ज्यांना रक्तातील साखरेमध्ये तीव्र वाढ टाळण्याची आवश्यकता असते.”
फायबर आणि प्रतिरोधक स्टार्च (Fibre and Resistant Starch)
डॉ. चतुर्वेदी सांगतात, “कैरीमध्ये जास्त प्रमाणात आहारातील फायबर आणि प्रतिरोधक स्टार्च असते, जे पचन आणि ग्लुकोज शोषण मंदावते. प्रतिरोधक स्टार्च शरीरात विरघळणाऱ्या फायबरसारखे वागतो. ते लहान आतड्यात पचनास विरोध करते आणि आतड्यांतील बॅक्टेरियाद्वारे ते आंबवले जाते. या प्रक्रियेचे अनेक फायदे आहेत. ते इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते, जेवणानंतर रक्तातील साखरेची वाढ कमी करते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. याउलट पिकलेले आंबे, साखरेचे प्रमाण जास्त आणि प्रतिरोधक स्टार्चचे प्रमाण कमी असल्याने ते जलद पचतात, ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी जलद वाढते.”
पौष्टिकता आणि आम्लता (Nutritional Profile and Acidity)
डॉ. चतुर्वेदी सांगतात, “कैरीमध्ये व्हिटॅमिन सीदेखील भरपूर प्रमाणात असते, जो एक अँटिऑक्सिडंट आहे, जो ऑक्सिडेटिव्ह ताण किंवा पेशींच्या नुकसानाशी लढण्यास मदत करतो. मधुमेहींमध्ये ही एक सामान्य चिंता आहे. त्यात व्हिटॅमिन ए प्रिकर्सर्स (कॅरोटीन्स), बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे आणि पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे इलेक्ट्रोलाइट्सदेखील मध्यम प्रमाणात असतात. मनोरंजक म्हणजे कैरी आम्लयुक्त असते, ही आम्लता पोटातील रिकामेपणा किंचित कमी करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे ग्लुकोजचे शोषण आणखी कमी होते. पिकलेले आंबे अधिक अल्कधर्मी आणि साखरेने समृद्ध असल्याने हा फायदा देत नाहीत.”
पारंपारिक औषधीमध्ये वापर (Traditional Medicinal Use)
डॉ. चतुर्वेदी सांगतात, “आयुर्वेदासारख्या पारंपरिक पद्धतींमध्ये कैरी “थंड” आणि तुरट मानली जाते, ज्याचा वापर अतिरिक्त उष्णता संतुलित करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी केला जातो. कैरीच्या पन्ह्यासारख्या उन्हाळ्यातील पेयांमध्ये त्यांचा वापर केला जातो, ज्यामध्ये बहुतेकदा जिरे आणि काळे मीठ मिसळले जाते; ते रक्तातील साखर नियंत्रित करण्यास आणि इलेक्ट्रोलाइट्स पुन्हा निर्माण करण्यासाठीदेखील वापरले जाते.”
सावधगिरी आणि संयम अजूनही महत्त्वाचा आहे(Caution and Moderation Still Key)
डॉ. चतुर्वेदी सांगतात, “मधुमेहाच्या रुग्णांसाठी कच्चे आंबे फायदे देऊ शकतात, परंतु साखर किंवा गूळ न घालता ते माफक प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे आहे. लोणचे किंवा चटण्यांमध्ये सामान्यतः वापरले जाणारे पदार्थ. सॅलेडमध्ये साधी, उकडलेली किंवा किसलेली कैरी किंवा गोड नसलेले मसालेदार कैरीचे पन्हे हे आदर्श पदार्थ आहेत.
संवेदनशील पचनसंस्था असलेल्या किंवा आम्लपित्त किंवा जठराची सूज असलेल्या लोकांनीदेखील सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण जास्त प्रमाणात सेवन केल्यास कैरीतील आम्लपित्त पोटासाठी त्रासदायक ठरू शकते. शेवटी दररोज अर्ध्या कपापेक्षा जास्त सेवन करू नका आणि प्रथिनांसह ते खा, असेही डॉ. चतुर्वेदी सुचवतात.
(टीप- हा लेख डॉक्टरांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. दिनचर्येत कोणताही बदल करण्यापूर्वी तुमच्या कौटुंबिक डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
© IE Online Media Services (P) Ltd