धावणे आरोग्यासाठी फायदेशीर असते हे आपल्याला माहीत आहे; पण धावण्याबाबत अनेक गैरसमज असल्याचेही तितकेच खरे आहे. त्यामुळे अनेक जण धावणे टाळतात. काही लोकांना धावण्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो किंवा धावणे गुडघ्यांसाठी चांगले नसते, असे वाटते. मधुमेह असलेल्यांसाठी धावणे चांगले असते की नाही याबाबतही अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो. याच प्रश्नांची उत्तरे हैदराबादमधील अपोलो हॉस्पिटल्सचे न्युरॉलॉजिस्ट एमडी डीएम डॉक्टर सुधीर मोघे त्यांच्या ट्विटर अकाउंटवर माहिती देताना दिली आहेत. या ट्वीटमध्ये त्यांनी धावण्यांसंबंधित मिथकांबाबत खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉक्टर सुधीर मोघे यांनी धावण्यासंबंधित मिथकांबाबत सांगितले तथ्य

मिथक १ : धावण्यामुळे गुडघ्यांचे नुकसान होते?
तथ्य : प्रत्यक्षात सत्य अगदी याउलट आहे. न धावणाऱ्यांच्या तुलनेत धावपटूंना गुडघ्यांच्या ऑस्टिओआर्थरायटिसचा धोका तीन पट कमी असतो. पण, हेही लक्षात घेतले पाहिजे की, जास्त धावण्यामुळे गुडघ्यांचे नुकसान होऊ शकते; जे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या धावपटूंमध्ये दिसून येते.

मिथक २ : धावण्यामुळे हृदय बंद पडण्याचा किंवा ह्दयाविकाराचा झटका येण्याचा धोका असतो?
तथ्य : अनेकांना वाटते की, धावण्यामुळे हृदय बंद पडू शकते किंवा हृदयाविकाराचा झटका येऊ शकतो; पण सत्य अगदी विपरीत आहे. प्रत्यक्षात अजिबात न धावणाऱ्यांच्या तुलनेत जे लोक नियमित धावतात त्यांचा धावण्यामुळे हृदय बंद पडण्याचा किंवा हृदयाविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो. पण, जास्त वेळ धावणे किंवा गरजेपेक्षा जास्त धावण्यामुळे हृदय बंद पडण्याच्या धोका किंचितसा वाढू शकतो.

मिथक ३ : ५० पेक्षा जास्त वय असलेल्यांनी धावू नये?
तथ्य : ज्यांचे वय ५० पेक्षा जास्त आहे अशा व्यक्तीही धावू शकतात; पण योग्य ते प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. वयस्कर लोकांनी धावणे सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांकडून तपासणी करून घेऊन वैद्यकीय तपासणी आणि मंजुरी घेणे आवश्यक असल्याचा सल्ला दिला जातो.

हेही वाचा – दीर्घकाळ बसून राहण्यामुळे होऊ शकतो अकाली मृत्यू? कसा कमी करू शकता धोका? जाणून घ्या

मिथक ४ : धावण्यामुळे हृदयाची धडधड वाढते का?
तथ्य : धावताना किंवा धावल्यानंतर काही वेळ हृदयाची धडधड वाढते; पण काही वेळाने हृदयाची धडधड नियंत्रणात येते. कालांतराने नियमित धावणाऱ्यांच्या हृदयाची धडधडण्याची गती कमी होत जाते. हृदयाची धडधडण्याची गती कमी होणे हे हृदयाचे चांगले आरोग्य आणि मृत्यूचा धोका कमी होण्याशी संबंधित आहे.

मिथक ५ : धावण्यामुळे रक्तदाब वाढतो का?
तथ्य : धावताना किंवा धावल्यानंतर लगेत रक्तदाब वाढतो; पण कालांतराने नियमित धावणाऱ्यांचा रक्तदाब कमी होतो.

मिथक ६ : मधुमेह असलेल्यांनी धावू नये का?
तथ्य : अनेकांना वाटते की, मधुमेह असलेल्यांनी धावू नये; पण सत्य अगदी उलट आहे. मधुमेहींना धावण्याचा सल्ला दिला जातो. कारण- त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. न धावणाऱ्यांच्या तुलनेत धावणाऱ्या व्यक्तींमध्ये HbA1C कमी असते.

मिथक ७ : हृदयविकार असेलल्या व्यक्तीने धावू नये?
तथ्य : ज्या लोकांची बायपास सर्जरी झाली आहे किंवा अँजिओप्लास्टी झाली आहे तेसुद्धा धावू शकतात. पण, त्यांनी तज्ज्ञांकडून योग्य ते प्रशिक्षण घेण्यासह मार्गदर्शनाची आवश्यकता असते.

मिथक ८ : धावण्यामुळे भूक वाढते?
तथ्य : लोकांना असे वाटते की, धावण्यामुळे भरपूर कॅलरीज बर्न होतात आणि त्यामुळे भूक वाढते; ज्यामुळे जास्त प्रमाणात खाल्ले जाऊ शकते. पण धावण्याचा परिणाम अगदी याउलट होतो. धावण्यामुळे भूक नियंत्रणात पाहते आणि जास्त प्रमाणात अन्न खाल्ले जात नाही. धावण्यामुळे फॅट्स कमी होतात आणि वजन कमी होते. विशेषत: जास्त वजन असलेल्या किंवा लठ्ठ व्यक्तींमध्ये हे घडते.

मिथक ९ : मानवी शरीर धावण्यासाठी तयार केलेले नाही?
तथ्य : खरे तर मानवी शरीर धावण्यासाठी कालानुसार बदलत गेले आहे. काही प्राणी कमी अंतर पार करण्यामध्ये माणसांना मागे टाकू शकतात; पण त्याचबरोबर जास्त अंतर पार करण्यासाठी मानव इतर सर्व प्राण्यांना पराभूत करू शकतो.

मिथक १० : धावणाऱ्यांना स्ट्रेंथ ट्रेनिंगची आवश्यकता नसते?
तथ्य : हा गैरसमज आहे. धावणे हा एक अॅरोबिक व्यायामाचा प्रकार आहे. पण, आरोग्यासाठी अधिक फायदे मिळवण्याकरिता धावपटूंना आठवड्यातून तीनदा स्ट्रेंथ ट्रेनिंगची आवश्यकता असते.

दरम्यान, डॉक्टर मोघे यांच्या मताला सहमती दर्शवीत, एफआयटीटीआरचे अॅडव्हान्स पर्सनल ट्रेनर उत्सव अग्रवाल यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले, “हृदयाच्या आरोग्यासाठी धावणे ही अत्यंत चांगली बाब आहे; तसेच धावण्यामुळे कॅलरीज बर्न होतात, सहनशक्ती वाढते आणि ताण किंवा चिंता कमी होते. तसेच जर तुम्हाला लोकांबरोबर संवाद साधायला आवडत असेल, तर धावणे हा उत्तम पर्याय आहे. कारण- कित्येक जण ग्रुप करून धावण्याचा सराव करतात किंवा मॅरेथॉनमध्ये एकत्र धावण्यासाठी जातात. अशा वेळी लोकांसह संवाद साधण्याचीही संधी मिळते.”

पहिल्यांदाच धावणे सुरू करणाऱ्यांना अग्रवला सल्ला देतात, “धावण्यासाठी तुम्ही पूर्ण करू शकता, असे ध्येय निश्चित करा. धावण्यासाठी योग्य शूज वापरणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्यामुळे विचार करून पैसे खर्च करा. धावण्यापूर्वी थोडे वॉर्मअप करा म्हणजेच धावण्यासाठी शरीराला तयार करा आणि त्यानंतर स्ट्रेंचिंग (व्यायाम) करा; जेणेकरून तुमचे स्नायू मोकळे होतील आणि धावताना त्रास होणार नाही.”

धावण्यासंबंधित आणखी मिथकांबाबत अग्रवाल यांनी सांगितले तथ्य

मिथक १ : धावणे तुमच्या गुडघ्यांसाठी चांगले नसते?
तथ्य : अनेकांना वाटते की, धावणे हे गुडघ्यांसाठी चांगले; पण सत्य याउलट आहे. धावणे हे गुडघ्यांसाठी चांगले असते. कारण- त्यामुळे गुडघ्यांच्या आसपासचे स्नायू मजबूत होतात आणि सांध्यांचे आरोग्य सुधारते. पण, आधीपासून गुडघ्यांसंबंधी समसल्या असल्यास, चुकीच्या पद्धतीने किंवा गरजेपेक्षा जास्त धावणे गुडघ्यांना नुकसान पोहोचवू शकते.

मिथक २ : धावण्याचे फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला जोरात धावता आले पाहिजे?
तथ्य : धावण्याचे फायदे मिळवण्यासाठी तुम्हाला जोरात धावण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला जसे जमेल तसे धावलात तरीही धावण्याचे फायदे तुम्हाला मिळतील.

मिथक ३ : शरीराला आकार देण्यासाठी धावणे हा एकमेव पर्याय आहे?
तथ्य : धावणे हा एक चांगला व्यायाम आहे; पण शरीराला आकार देण्यासाठी तो एकमेव पर्याय नाही. इतरही अनेक प्रकारचे व्यायाम आहेत; जे तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात.

हेही वाचा – दुपारच्या जेवणानंतर झोपण्याची इच्छा होते का? महिलांमध्ये ही इच्छा खूप तीव्र का होते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या… 

मिथक ४ : धावण्यासाठी महागडे शूज किंवा कपडे वापरावे लागतात?
तथ्य : धावण्यासाठी चांगले शूज वापरणे आवश्यक असले तरी महागडे शूज किंवा कपडे वापण्याची आवश्यकता नाही. साधे आरामदायी कपडेही नव्याने धावणे सुरू करण्यासाठी पुरेसे असतात.

अग्रवाल पुढे सांगतात, “सातत्याने धावणे हीच चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. नियमित धावण्याचे वेळापत्रक आखा आणि त्याचे पालन करा. तुमच्या प्रशिक्षणामध्ये स्ट्रेंथ वर्कआउट्स आणि योगाचा समावेश करायला विसरू नका. तुमच्या शरीराचा प्रतिसाद लक्षात घ्या आणि जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा विश्रांती घ्या. योग्य पोषणमूल्य आणि हायड्रेशनदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमची किती प्रगती होते याकडे लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला शक्य असेल, तर मित्र-मैत्रिणींसह ग्रुप करून धावा. त्यामुळे तुम्हाला धावण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळेल.”

तुमच्या एकूण आरोग्यासाठी धावणे हा अत्यंत आनंददायी आणि सोपा पर्याय आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Should people with diabetes not run experts examine common myths around running snk
Show comments