Eggs In Summer : सध्या उन्हाळा सुरू आहे. दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे. अशात उन्हापासून संरक्षण करताना आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात थंड पदार्थ किंवा पेयांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. अशात उन्हाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये, हे सुद्धा समजून घेणे गरजेचे आहे. तुम्ही उन्हाळ्यात अंडी खाता का? उन्हाळ्यात अंडी खाणे कितपत चांगले आहे, याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती सांगितली आहे.

जगभरात अंडी हा आहारातील एक महत्त्वाचा भाग मानला जातो. अंड्यामध्ये असलेल्या पौष्टिक घटकांमुळे हा एक चांगला पर्याय मानला जातो. अंड्यामध्ये प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात, जे शरीराच्या आरोग्यासाठी चांगले असतात, पण काही लोकांचा असा विश्वास आहे की, अंडी खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते आणि पोटाचा त्रास होतो.
न्यूट्रिशनिस्ट अमिता गद्रे सांगतात की, आपण उन्हाळ्यात अंडी खाऊ शकतो. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कोणत्याही इन्फ्लूअन्सरचे न ऐकता तुम्हाला काय वाटते ते समजून घ्या. उन्हाळ्यात आहाराबाबत सर्वात मोठी चूक तुम्ही करता ती म्हणजे पुरेसे पाणी न पिणे आणि फायबरयुक्त पदार्थ न खाणे.”

पाहा व्हिडीओ

आहारतज्ज्ञ सल्लागार कनिका मल्होत्रा सांगतात, “अंडी हा पोषक तत्वांनी भरलेला पदार्थ आहे, त्याचे असंख्य असे फायदे उन्हाळ्यातसुद्धा दिसून येतात.”

मल्होत्रा यांनी आहारात अंड्याचा समावेश करण्याची अनेक कारणे सांगितली आहेत. जाणून घेऊ या, आहारात अंड्याचा समावेश का करावा?

हायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट बॅलेन्स –

अनेक लोकांचा गैरसमज असतो की अंडी शरीरात उष्णता निर्माण करतात. उलट त्यात सोडियम, पोटॅशियम आणि फॉस्फरससारख्या इलेक्ट्रोलाइट्सचे चांगले स्त्रोत आहेत, जे शरीरात पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

ऊर्जा पातळी – उन्हाळ्यात अति उष्णतेमुळे थकवा येतो. अंडी हा प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे, ज्यामध्ये आवश्यक अमिनो ॲसिड असतात. हे प्रोटीन शरीरातील नवीन पेशी निर्माण करण्यास मदत करतात, ज्यामुळे आपल्याला दिवसभर ऊर्जा मिळते.

रोगप्रतिकारकशक्ती वाढणे – अंड्यामध्ये आवश्यक व्हिटॅमिन्स, मिनरल्स, जसे की व्हिटॅमिन ए, डी, बी१२ आणि लोहाचे प्रमाण असतात. हे पोषक घटक रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे उन्हाळ्यात आपण लहान मोठ्या आजारांचा सामना करण्यास सक्षम असतो.

डोळ्यांचे आरोग्य – अंड्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स जसे की लुटेन, झेक्साअँथेन ( lutein and zeaxanthin) असतात, जे सूर्यप्रकाशापासून डोळ्यांचे संरक्षण करण्यास मदत करतात. हे अँटिऑक्सिडंट्स वयाशी संबंधित असलेले मॅक्युलर डिजेनेरेशन टाळण्याससुद्धा मदत करू शकतात.

हेही वाचा : खरचं तुम्ही एका आठवड्यात एक किलो वजन कमी करू शकता का? काय सांगतात तज्ज्ञ

उष्ण वातावरणात अंडी खाताना कोणती काळजी घ्यावी?

  • “अंडी तुमच्या शरीरात उष्णता निर्माण करतात असा गैरसमज आहे. अंड्यामध्ये प्रोटिन्स असतात. आपले शरीर हे प्रोटिन्स ऊर्जेसाठी वापरतात. यामुळे आपल्या शरीराचे तापमान एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत नाही”, असे मल्होत्रा सांगतात.
  • अंडी गरम किंवा थंड नसतात, अंड्याचे तापमान हे ते कसे साठवले आहेत, यावर अवलंबून असते.
  • बहुतेक अंडी फ्रिजमध्ये ठेवली जातात, त्यामुळे अशा अंड्यांचे तापमान चार अंश सेल्सियसच्या जवळपास असते.
  • जेव्हा तुम्ही अंडी शिजवता तेव्हा अंड्याचे तापमान वाढते. अंड्याची भुर्जी करता तेव्हा त्याचे तापमान ७१ अंश सेल्सियस असू शकते, तर कडक पाण्यात उकळलेल्या अंड्याचे तापमान १०० अंश सेल्सियसच्या जवळपास असू शकते.

जे लोक अंडी खात नाही त्यांनी उन्हाळ्यात कोणते पर्यायी पदार्थ खावे?

  • वनस्पती आधारित प्रोटिन्स, जसे की मसूर, सोयाबीनसारखे प्रोटिन्सयुक्त पदार्थ खाऊ शकता. याचा समावेश सॅलेड्स, करीमध्ये करू शकता.
  • बदाम, अक्रोड, जवस हे प्रोटिनयुक्त आणि चांगले फॅटयुक्त पदार्थ आहेत. यामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे चांगले स्रोत आहेत. तुम्ही हे पदार्थ सॅलेड्स आणि दह्यावर घेऊ शकता.
  • याशिवाय यिस्ट हा प्रोटीन आणि व्हिटॅमिन बीचा चांगला स्त्रोत मानला जातो.