Music While Studying : संगीत ऐकणे अनेकांना आवडते. अनेक संशोधनांतून असे समोर आले आहे की, संगीत ऐकल्यामुळे तणाव व चिंता दूर होते आणि मूड सुधारतो. तुम्हाला अभ्यास करताना संगीत ऐकायची सवय आहे का? अभ्यास करताना संगीत ऐकल्यामुळे काही लोकांना लक्ष केंद्रित करता येते; तर काही लोकांचे संगीतामुळे अभ्यासापासून लक्ष विचलित होऊ शकते.
त्याविषयी कंटेंट क्रिएटर राजन सिंह त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये सांगतात, “अभ्यास करताना गाणी ऐकल्यानं तुमच्या स्मरणशक्तीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. कारण- दोन गोष्टी एकाच वेळी तुमच्या कानावर पडत असतील, तर त्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो आणि तुम्हाला ते समजणेसुद्धा अवघड जाऊ शकतं. पण, ज्यामध्ये बोल नाहीत, असं वाद्यसंगीत तुम्ही ऐकलंत, तर त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ शकत नाही.”
हेही वाचा : ‘या’ १०० ग्रॅम फळभाजीच्या सेवनाने झपाट्याने वजन होईल कमी; हृदय राहील निरोगी, ठणठणीत!
कॅडबॅम्स माइंडटॉकच्या मानसशास्त्रज्ज्ञ नेहा पाराशर सांगतात, “संगीत ऐकल्यानं आपली कार्यक्षमता आणि लक्ष केंद्रित करणं यावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्हीही परिणाम दिसू शकतात. संशोधन सांगतं की, संगीतमुळे माणसाचा मूड सुधारतो आणि काम करण्यास प्रोत्साहन मिळतं; ज्यामुळे एकंदरीत आपलं मानसिक आरोग्य सुधारू शकतं.”
नेहा पाराशर या राजन सिंह यांच्याशी सहमत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार -संगीत जर तुम्ही खूप मोठ्या आवाजात ऐकत असाल किंवा त्याचे लिरिक्स खूप जास्त क्लिष्ट असतील, तर त्याचा थेट परिणाम तुमच्या कार्यक्षमतेवर होऊ शकतो. त्यासाठी अतूट लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे.
पाराशर सांगतात, “शास्त्रीय संगीताला मोझार्ट इफेक्ट (Mozart effect)सुद्धा म्हणतात. हे संगीत लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि मन विचलित न होता, मानसिक सतर्कता वाढविण्यासाठी अधिक फायदेशीर आहे. त्याशिवाय आपल्यासभोवतालचं संगीत; जे सतत आपल्या कानावर पडत असतं, तेसुद्धा आपल्या मानसिक आरोग्यासाठी चांगलं असतं. त्यामध्ये लक्ष विचलित करणारे घटक नसतात.”
पाराशर सांगतात, “अभ्यास करताना संगीत ऐकणं फायदेशीर आहे की नाही, हे अनेक घटकांवर अवलंबून असतं. तुम्ही कोणत्या विषयाचा अभ्यास करीत आहात, संगीताचे बोल, अभ्यासाच्या सवयी इत्यादी घटकांचा त्यात समावेश असतो.”
कठीण बोल असणारे आणि पहिल्यांदा ऐकत असलेलं संगीत गणित किंवा भाषेच्या संबंधित अभ्यासात व्यत्यय आणू शकतं. पण, तुम्ही अनेकदा ऐकलेलं आणि आवडणारं संगीत तुमची चिंता कमी करून, तुमचा मूड सुधारू शकतं.
संगीत मूड सुधारून एकटेपणाची भावना कमी करण्यास मदत करतं. त्यामुळे काही लोकांना अभ्यास करताना चांगला अनुभव येऊ शकतो; तर काही लोकांचं लक्ष विचलित होऊ शकतं. अभ्यास करताना संगीत ऐकून तुम्हाला कसं वाटतं आणि तुमच्या कार्यक्षमता आणि मूडवर त्याचा कसा परिणाम होतो याचं मूल्यमापन करणं आणि तुमच्यासाठी काय योग्य आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे.