पारंपरिक गव्हाच्या पिठाऐवजी ग्लूटेन मुक्त किंवा कमी कार्बोहायड्रेट पर्याय शोधणाऱ्यांमध्ये बदामाचे पीठ लोकप्रिय ठरत आहे. अनेक पाककृतींमध्ये हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो, परंतु इतर पिठांऐवजी बदामाचे पीठ वापरण्यापूर्वी त्याचे गुणधर्म आणि मर्यादा समजून घेणे महत्त्वाचे आहे.
बदामाचे पीठ कसे बनवले जाते?
बदामाचे पीठ – जे प्रथिने, निरोगी फॅट्स आणि फायबर यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध आहे. हे बारीक चिरलेल्या बदामापासून बनवले जाते. त्याची खमंगता भाजलेल्या (Baked) पदार्थांना अधिक चव देते, ज्यामुळे ते गोड आणि चवदार दोन्ही पाककृतींसाठी एक बहुमुखी पर्याय बनते. “बदामाच्या पिठात व्हिटॅमिन ई, हेल्दी फॅट्स आणि मॅग्नेशियमबरोबर भरपूर फायबर असते, जे मेंदूच्या विकासाला मदत करते. हे हाडांसाठी चांगले आहे, प्रतिकारशक्ती मजबूत करते आणि ऊर्जा वाढवते,” असे बाल पोषणतज्ज्ञ असलेल्या मोना नरुला यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले.
हेही वाचा – खरंच तुम्ही एका आठवड्यात एक किलो वजन कमी करू शकता का? काय सांगतात तज्ज्ञ
नरुला यांनी बदामाचे पीठ बनवण्याची रेसिपीही शेअर केली
पद्धत
- बदाम रात्रभर भिजत ठेवा
- त्यांना चांगले वाळवा
- त्वचा सोलून घ्या
- ५-७ मिनिटे चांगले भाजून घ्या
- त्यांना थंड करून बारीक वाटून घ्या (जास्त दळणे टाळा)
तर इतर पिठांऐवजी बदामाच्या पिठाचे सेवन करावे का?
बदामाच्या पिठाचा सर्वात लोकप्रिय फायदा म्हणजे त्यात कार्बोहायड्रेट कमी असतात (गव्हाच्या पिठाच्या तुलनेत). “जे लोक कमी कार्बोहायड्रेट किंवा केटोजेनिक आहाराचे पालन करत आहेत, त्यांच्यासाठी हे अतिशय योग्य पर्याय ठरते. शिवाय, बदामाचे पीठ नैसर्गिकरित्या ग्लूटेन मुक्त आहे, ज्यामुळे ग्लूटेन संवेदनशीलता किंवा सेलिआक आजार असलेल्या लोकांसाठी हा एक चांगला पर्याय ठरतो”, असे डॉ. संगीता तिवारी यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले. डॉ. तिवारी या दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनीमधील आर्टेमिस लाइटच्या क्लिनिकल पोषणतज्ज्ञ आहेत.
ब्रेड किंवा केकसारख्या बदामाचे पीठ वापरावे का?
डॉ. तिवारी यांच्या मते, “ब्रेड किंवा केकसारख्या पाककृतींमध्ये फक्त बदामाचे पीठ आवश्यक रचना निर्माण करू शकत नाही. “नारळाच्या पिठासारख्या इतर ग्लूटेन मुक्त पिठांबरोबर ते एकत्र केले जाऊ शकते, जेणेकरून त्याची रचना अधिक चांगली होईल.”
मैदा किंवा संपूर्ण गव्हाच्या पिठाऐवजी बदामाचे पीठ का वापरावे?
मैदा किंवा संपूर्ण गव्हाचे पीठ यांसारख्या इतर पिठांऐवजी बदामाचे पीठ वापरताना त्याचा पोत आणि आर्द्रता शोषणातील फरक विचारात घेणे महत्त्वाचे आहे. “बदामाचे पीठ पारंपरिक पिठांपेक्षा जास्त दाट आणि ओलसर असते, जे भाजलेले खाद्यपदार्थ तयार करताना (baked goods) वापरल्यास त्याच्या चवीवर परिणाम करू शकते,” असे तिवारी यांनी सांगितले.
कुकीज, मफिन्स आणि पॅनकेक्ससाठी बदामाचे पीठ उत्तम पर्याय ठरू शकतो का?
कुकीज, मफिन्स आणि पॅनकेक्ससारख्या पाककृतींसाठी बदामाचे पीठ मैद्यासाठी एक पर्याय असू शकतो. तिवारी म्हणाले, “त्यातील नैसर्गिक आर्द्रता भाजलेले पदार्थ ओलसर आणि कोमल ठेवण्यास मदत करतो, परिणामी एक योग्य पोत निर्माण होतो,” असे तिवारी यांनी सांगितले
मांस आणि भाज्यांसाठी आवरण म्हणून बदामाचे पीठ वापरावे का?
बदामाच्या पिठाचा वापर मांस आणि भाज्यांसाठी आवरण म्हणून देखील केला जाऊ शकतो. पदार्थ तळले किंवा बेक केल्यावर कुरकुरीत पोत देते आणि चवही वाढवते. हा ब्रेडक्रंब्ससाठी देखील आरोग्यदायी पर्याय आहे आणि पारंपरिक पाककृतींना स्वादिष्ट ट्विस्ट देतो,” असेही तिवारी यांनी स्पष्ट केले.
लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
जरी ते बहुमुखी आहे, तरी बदामाचे पीठ दाण्यांची एलर्जी असलेल्या लोकांसाठी योग्य असू शकत नाही. “अशा प्रकरणांमध्ये, त्याऐवजी नारळाचे पीठ किंवा ग्लूटेन मुक्त ओटसचे पीठ वापरता येईल,” असे तिवारी यांनी सुचवल
बदामाचे पीठ हे अनेक पाककृतींमध्ये इतर पिठांसाठी एक नैसर्गिक पर्याय असू शकते, परंतु त्याचे अद्वितीय गुणधर्म, तुमची आहारातील प्राधान्ये आणि इतर वैयक्तिक घटक समजून घेणे तुम्हाला अधिक माहितीपूर्ण निवड करण्यात मदत करू शकते.