Sonakshi Sinha Shares Morning Routine: सकाळी उठताच आपलं रुटीन नेटाने फॉलो केलं तर संपूर्ण दिवस कमाल ऊर्जेने भरलेला जातो. आता रुटीन म्हणजे काय तर प्रचंड व्यायाम, भरपूर नाष्टा, घरातील स्वच्छता वगैरे एवढा भार आम्ही तुम्हाला उचलायला सांगत नाही आहोत. उलट एका सोप्या सवयीमुळे तुम्ही स्वतःच्या आरोग्याची नीट काळजी घेऊ शकता. बरं हे फक्त आम्हीच नाही तर स्वतः अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सुद्धा सांगतेय. २०२२ मध्ये एका मुलाखतीत शिल्पा शेट्टी कुंद्राशी बोलताना हीरामंडी फेम अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने आपलं मॉर्निंग सिक्रेट शेअर केलं आहे. ती सांगते की, “सकाळी उठताच मी पहिली गोष्ट करते ती म्हणजे एक लिटर तरी पाणी पिणं. त्याशिवाय दिवसभरात थोडं थोडं पाणी पित राहण्याचा माझा प्रयत्न असतो. दिवसाची ‘स्वच्छ’ सुरुवात करण्याचा हा माझा फंडा आहे. अर्थात आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यायला हवे असे सर्वच सांगतात पण म्हणून सकाळी १ लिटर पाणी पिणे योग्य आहे का? याविषयी आपण आज तज्ज्ञांचे मत जाणून घेणार आहोत.
Aster RV हॉस्पिटल, बंगळुरू येथील मुख्य पोषणतज्ज्ञ सौमिता बिस्वास यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, सकाळी अर्धा किंवा एक लिटर पाणी पिण्याचे फायदे मिळणार की तोटे हे तुमच्या शारीरिक क्षमतेवर अवलंबून असते. काहींच्या बाबत याचे सकारात्मक तर काहींना नकारात्मक परिणाम सुद्धा दिसू शकतात. आपण हे दोन्ही फायदे व तोटे पाहूया..
सकाळी १ लिटर पाणी पिण्याचे फायदे
- चयापचय सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत होते
- टॉक्सिन्स शरीरातून बाहेर पडतात व शरीर स्वच्छ होते
- रात्रीच्या झोपेनंतर शरीराला हायड्रेशन मिळते
- पचन सुधारते आणि सूज कमी होते
काहींनी मात्र सकाळी उठताच विशेषत: न्याहारीपूर्वी भरपूर पाणी एकाच वेळी पिणे टाळायला हवे. बिस्वास यांनी सांगितले की, सकाळी जास्त पाणी पिण्याचे नकारात्मक परिणाम मूत्रपिंडावर होऊ शकतात. यामुळे लघवीचे प्रमाण वाढून मूत्रपिंडावर ताण येऊ शकतो. याशिवाय काही संभाव्य धोके खालीलप्रमाणे,
- वारंवार लघवी
- पाण्याची नशा (हायपोनाट्रेमिया) ही अत्यंत दुर्मिळ परिस्थिती आहे.
- काही व्यक्तींना पोटात अस्वस्थता किंवा मळमळ जाणवते
पाणी पिण्याबाबत ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच!
बिस्वास यांनी सांगितले की, कोणतेही नवीन रुटीन फॉलो करण्याआधी आपल्या आरोग्यस्थितीसह परिचित असणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांचा आवर्जून सल्ला घ्या. वजन कमी करण्यासाठी हा काही जादुई सल्ला नाही. आपल्याला वजन कमी करायचे असेल तर निरोगी आहार व नियमित व्यायाम व हायड्रेशनचा समतोल राखणे आवश्यक आहे. यासह एक मुख्य सवय स्वतःला लावा ती म्हणजे आपल्या शरीराचं ऐकत जा. आपण केलेल्या कोणत्याही बदलानंतर शरीर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रतिक्रिया देत असते. अगदी तुमची खाण्याची वेळ बदलली, व्यायामाची तीव्रता बदलली किंवा आपण वेगळ्या वातावरणात गेलो तरी शरीर लहान मोठ्या फरकांमधून प्रतिसाद देत असते. त्यामुळे पाणी पिण्याची सवय शरीराला लावत असाल तर हळूहळू सुरु करा. तसेच पाणी पिण्याला आपल्या रुटीनचा भाग बनवा, रुटीन बनवू नका.