Bottle Gourd: दुधी भोपळ्याला इंग्रजीत ‘बॉटल गार्ड’ (Bottle Gourd) म्हणतात. दुधी अनेक पारंपरिक पदार्थांमध्ये एक महत्त्वाचा घटक आहे आणि दुधी आरोग्याच्या फायद्यांसाठी प्रसिद्ध आहे. या भाजीत एक मध्यम जाड साल असते, जी आतल्या भागाचे संरक्षण करते. सामान्यतः ती शिजवायच्या आधी काढली जाते. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, दुधीच्या सालीचे सेवन करणे सुरक्षित आहे का? Indianexpress.com ने या प्रश्नावर तज्ज्ञांचा सल्ला घेतला आहे.
एड्विना राज (अॅस्टर CMI हॉस्पिटल, बंगळुरू येथील सेवांसाठी प्रमुख, क्लिनिकल न्यूट्रिशन आणि डाएटेटिक्स) म्हणाल्या की, जरी दुधीमध्ये पोषण घटक आणि फायबर्स भरपूर असले तरी त्यातील कीटकनाशकांचा अंश आणि त्याचे सालीचे टेक्श्चर यांच्याबद्दल व्यक्त केल्या जाणाऱ्या चिंता योग्य आहेत. “दुधीच्या सालीमध्ये जास्त फायबर्स असतात, जे पचनात मदत करतात आणि त्यामुळे पोट भरल्यासारखेदेखील वाटते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते. त्यामध्ये अँटीऑक्सिडन्ट्स आणि महत्त्वाची जीवनसत्त्वेही असतात, जी एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत करतात,” असेही त्यांनी सांगितले.
यावर सहमत होऊन, C V ऐश्वर्या (क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, चेन्नईमधील व्याख्यात्या) म्हणाल्या की, दुधीची साल खाणे सुरक्षित आहे; मात्र ती ताजी, योग्य रीतीने शिजवलेली आणि मोजक्या प्रमाणात खाल्ली तरच. “साल ही डाएटरी फायबर्सची चांगली स्रोत आहे, जी पचन आणि आतड्यांच्या आरोग्याला मदत करते. त्यात पॉलिफेनॉल्स (polyphenols) आणि फ्लेवोनॉइड्ससुद्धा (flavonoids) असतात, जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि दाहकता कमी करण्यात मदत करतात. वैज्ञानिक अभ्यासांनी दाखवून दिले आहे की, दुधीच्या सालीत पोटॅशियम आणि क जीवनसत्त्व जास्त प्रमाणात असते. त्यातील फायबर्स आतड्याचे कार्य सुधारू शकतात आणि बद्धकोष्ठता टाळण्यासाठीही मदत करू शकतात,” असं त्या म्हणाल्या.
ध्यानात ठेवण्याच्या बाबी
ऐश्वर्या यांनी हेही म्हटले, “कधी कधी काही लोकांना दुधीची अॅलर्जी होऊ शकते, ज्यामुळे खाज, सूज किंवा श्वास घेण्यात अडचण होऊ शकते. दुधीच्या रसाचे अति सेवन केल्यास रक्तातील सोडियमची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे कमजोरी, गोंधळ किंवा गंभीर आरोग्याच्या समस्या होऊ शकतात.”
सुरक्षेला महत्त्व देण्यासाठी तज्ज्ञांनी ही भाजी करताना ती धुऊन वापरण्याचा, भाजीची साल चांगल्या प्रकारे सोलण्याचा आणि शक्य असल्यास ऑरगॅनिक भाज्यांचा वापर करावा, असा सल्ला दिला आहे.