निरोगी जीवनशैलीसाठी आपला आहार सकस आणि पौष्टिक असणे गरजेचे असते. त्यासाठी व्यायामासोबतच वेगवेगळी फळे, हिरव्या पालेभाज्या, भाज्या, डाळी, अंडी व सुका मेवा यांसारखे घटक आपल्या रोजच्या आहारात असावेत, असा सल्ला प्रत्येक जण देत असतो. सुका मेवा खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. दररोज सकाळी एक मूठभर सुका मेवा खाल्ल्याने अनेक रोग आपल्यापासून दूर राहण्यास मदत होते. काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, अंजीर यांचा बऱ्याच खाद्यपदार्थांमध्येही वापर केला जातो. या सर्व सुक्या मेव्याचे स्वतःचे गुणधर्म आहेत.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्या शरीराची उष्णताही वाढते आणि ती कमी करण्यासाठी आपण अनेक थंड पदार्थ किंवा पेयांचे सेवन करतो. सुका मेवा खाणे तसे शरीरासाठी उत्तमच. पण, शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि पोषण होण्यासाठी, उन्हाळ्याच्या दिवसांत दररोज सुका मेवा खायला हवा का? उन्हाळ्याच्या दिवसांत सुका मेवा खाल्ल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? याच विषयावर हैदराबाद येथील सल्लागार, जनरल फिजिशियन व डायबेटोलॉजिस्ट डॉ. रंगा संतोष कुमार यांनी माहिती दिल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. ते पाच पदार्थ कोणते ते आपण सविस्तर जाणून घेऊ…
उन्हाळ्यात सुका मेव्याचे सेवन करावे का?
उन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याची खूप काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी नेहमी सकस आहार घ्यावा लागतो. पण, उष्णतेमुळे अनेक लोक सुका मेवा खाणे टाळतात. उन्हाळा असला तरी तुमच्या आहारातून सुका मेवा पूर्णपणे काढून टाकू नये, असा सल्ला डॉ. कुमार यांनी दिला आहे. डॉ. कुमार यांनी भिजविलेल्या सुक्या मेव्याचे फायदे सांगितले आहेत.
(हे ही वाचा : फक्त पालकच नाही तर तुमच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण झपाट्याने वाढवतील ‘हे’ ५ पदार्थ; सेवनाची पद्धत जाणून घ्या डाॅक्टरांकडून…)
हायड्रेशन : सुका मेवा भिजवून खाल्ल्याने तो पचणे आणि शोषणे सोपे होते. उन्हाळ्याच्या दिवसांत हायड्रेशन होण्यास मदत होते.
चांगले पचन : सुका मेवा भिजल्यावर पाणी त्यांचे फॅटिक अॅसिड नष्ट करते. या फॅटिक ॲसिडमुळे अपचनासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळेच भिजवलेला सुका मेवा खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत होते.
हृदय निरोगी : व्हिटॅमिन ई, अँटिऑक्सिडंट्स आणि आवश्यक तेल बदामामध्ये आढळते. जेव्हा ते पाण्यात भिजवले जाते, तेव्हा फायटिक अॅसिड नाहीसे होते आणि त्यामुळे हृदय निरोगी राहते.
सुका मेवा खाण्याचे फायदे
बदाम : बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि ए जास्त प्रमाणात असते. बदामामध्ये असे गुणधर्म असतात; जे शरीराला थंड आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात. ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत
पिस्ता : पिस्त्यामध्ये प्रथिने, निरोगी चरबी, फायबर व अँटिऑक्सिडंट्स हे घटक मोठ्या प्रमाणात असतात. तसेच पिस्त्यात फॅट आणि कॅलरीज खूप कमी असतात; ज्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.
काजू : काजूमध्ये निरोगी चरबी, फायबर, तांबे व जस्त यांसारखी खनिजे आणि प्रतिकारशक्ती वाढविणारे अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात.
मनुका : मनुके फायबर, पोटॅशियमने समृद्ध असतात. कमी कॅलरीज आणि वजन व्यवस्थापनासाठी ते फार उपयुक्त ठरतात.
अक्रोड : मेंदूच्या आरोग्यासाठी ओमेगा-३ चा हा एक उत्तम स्रोत आहे. जळजळ होणे कमी करणारे आणि हृदयाचे संरक्षण करणारे अँटिऑक्सिडंट्स यात आढळतात.
अंजीर : अंजीरमध्ये भरपूर पौष्टिक गुणधर्म असतात. त्याशिवाय त्यात व्हिटॅमिन ए, सी, ई, के, बी६, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम व मँगनीज यांसारखे आवश्यक पोषक घटक असतात.
अशा प्रकारे सुका मेवा खाण्याचे भरपूर फायदे आहेत. परंतु, डॉ. कुमार यांनी त्याचे अतिसेवन करण्यापासून सावधही केले आहे.
सुक्या मेव्यामध्ये नैसर्गिक साखर असते. पण, ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरात फ्रक्टोजचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे व्यक्तीच्या शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते. सुक्या मेव्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे व्यक्तीची मलप्रवृत्ती सुलभ होते. परंतु, त्याचे जास्त सेवन केल्याने व्यक्तीला बद्धकोष्ठता, पोटदुखी, ब्लोटिंग, पोटदुखी, अतिसार अशा समस्यांचा त्रास होऊ शकतो. म्हणून त्यांनी सुका मेवा कमी प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला आहे.