What To Eat In Shravan: येत्या ५ ऑगस्टपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे. या महिन्याला सणांचा महिना असेही म्हटले जाते. उत्तरेकडे २२ जुलैला श्रावण सुरु होतो तर शालिवाहन शकेनुसार ५ ऑगस्टपासून यंदा श्रावणाची सुरुवात होत आहे. या काळामध्ये मांस, मच्छी खाऊ नये असे आपण वर्षानुवर्षे ऐकत, पाळत आलो आहे. पण नेमकं यामागे कारण काय असावं? काय खायचं नाही हे तर समजलं पण कोणत्या गोष्टी आवर्जून खाव्यात? या महिन्यांमध्ये सणांसह उपवास सुद्धा धरले जातात. या उपवासांना काय खावं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आहारतज्ज्ञ, सल्लागार, प्रमाणित मधुमेह प्रशिक्षिका कनिक्का मल्होत्रा यांनी इंडियन एक्सस्प्रेसशी बोलताना श्रावणात आहाराबाबत पाळायचे नियम व परंपरा याविषयी माहिती दिली आहे.
श्रावण महिन्याला पवित्र का मानले जाते?
श्रावण हा हिंदू धर्मातील एक पवित्र महिना आहे जो भगवान शिवाला समर्पित आहे. यावेळी भाविक विविध प्रथा परंपरा पाळतात. बरेच लोक उपवास करतात, विशेषतः श्रावणी सोमवारी पूजापाठासह आहारातही पथ्य पाळले जाते. श्रावणात अनेकदा सात्विक आहाराचे सेवन करावे असे म्हटले जाते. सात्विक आहार म्हणजे शुद्ध शाकाहारी व ताजं अन्न. शाकाहारी पदार्थांची यादी तशी मोठी असते पण श्रावणात आवर्जून खावे असे काही पदार्थ आहेत ज्यांचे सेवन अत्यंत फायदेशीर ठरू शकते. हे पदार्थ कोणते व त्यांचा कसा फायदा होऊ शकतो हे पाहूया..
कुट्टू (बकव्हीट): तांदूळ आणि गहू यांसारख्या धान्यांचा उत्तम पर्याय म्हणजे बकव्हीट, ज्याला कुट्टू या नावाने ओळखले जाते. यामध्ये जटिल कार्ब्स असतात जे ऊर्जेचा उत्तम स्रोत ठरतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते यामुळेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा पर्याय उत्तम ठरतो. कुट्टू हा प्रथिने आणि फायबरचा स्त्रोत देखील आहे, ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते तसेच बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते.
साबुदाणा (टॅपिओका सागो): श्रावणातील मुख्य पदार्थ, साबुदाणा सहज ऊर्जा देतो. तथापि, त्याच्या उच्च ग्लायसेमिक इंडेक्समुळे, मधुमेहींनी याचे सेवन करताना पोर्शन कंट्रोल ठेवायला हवा. साबुदाण्यातील साखरेचे शोषण कमी करण्यासाठी मसूर किंवा शेंगदाणे आणि भरपूर भाज्या यांसारख्या प्रथिनांच्या स्त्रोतांसह साबुदाणा खायला हवा.
सामक तांदूळ (वरई): हे ग्लूटेन-मुक्त धान्य फायबर, लोह आणि मॅग्नेशियम सारख्या पोषक तत्वांनी भरलेले आहे. उच्च फायबर सामग्री पचनास मदत करते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते, ज्यामुळे मधुमेहींसाठी हा एक चांगला पर्याय बनतो.

दुधी: पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या या भाजीमध्ये कॅलरी आणि कर्बोदके कमी असतात. तसेच दुधी हा जीवनसत्त्वे आणि खनिजांचा देखील एक चांगला स्रोत आहे, जो तुम्हाला उपवासाच्या काळात हायड्रेटेड राहण्यास मदत करतो आणि आवश्यक पोषण पुरवतो.
फ्लॅक्स सीड्स: फ्लॅक्स सीड्स या ओमेगा -3 फॅटी ऍसिडचा समृद्ध स्रोत असतात, यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. शिवाय त्या फायबरचा एक चांगला स्रोत देखील आहेत. पोट भरलेले वाटण्यासाठी तसेच आतड्यांच्या आरोग्यासाठी तुम्ही चटण्या, कालवण यामध्ये फ्लॅक्स सीड्स किंवा अंबाडीच्या बिया वापरू शकता.
श्रावणात हे पदार्थ टाळावेत
मल्होत्रा यांच्या मते खालील पदार्थ हे श्रावणात खाणे टाळायला हवे.
मांस, अंडी आणि मासे: हे सात्विक आहारातून वगळलेले आहेत.
कांदे आणि लसूण: पारंपारिकपणे टाळले जाते कारण यात उत्तेजक गुणधर्म असतात असे मानले जाते.
मद्य: या महिन्याचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता मद्य टाळले जाते.
श्रावण पाळणाऱ्या व्यक्तींसाठी विशेष टिप्स
उपवासाच्या दिवसांतही हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे आहे. दिवसभर भरपूर पाणी प्या. आपण इलेक्ट्रोलाइटसाठी नारळ पाणी देखील आहारात जोडू शकता
तुम्ही कडक उपवास करत नसल्यास, जेवण वगळणे टाळा. उर्जेची पातळी राखण्यासाठी आणि रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक कमी होणे टाळण्यासाठी कमी प्रमाणात पण वारंवार खात राहा.
नट, बिया आणि एवोकॅडो सारख्या स्त्रोतांमधून निरोगी फॅट्सचा शरीराला पुरवठा करा.
मीठावर अवलंबून न राहता नैसर्गिक मसाल्यांनी तुमच्या जेवणाची चव वाढवा. जिरे, धणे, हळद आणि आले यांचा वापर करू शकता.
आपल्याला जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरचा चांगला पुरवठा व्हावा यासाठी फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य (जसे की कुट्टू किंवा सामक तांदूळ) आपल्या आहारात जोडा.
हे ही वाचा<< स्वर्ण भस्म किंवा सोन्याच्या तुपाचं सेवन का आहे फायद्याचं? आयुर्वेदिक तज्ज्ञांनी सांगितलं खरं तूप कसं ओळखायचं?
पॅक केलेले पदार्थ खाताना शर्करा आणि अस्वास्थ्यकर फॅट्सची माहिती तपासा. सोडियम आणि जोडलेल्या साखरेचे प्रमाण कमी असलेले पर्याय निवडा.