वर्षभरातल्या विविध ऋतुंमध्ये आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, कोणत्या ऋतुमध्ये नेमका काय आहार-विहार ठेवावा यांसारख्या मूलभूत प्रश्नांचे आपल्या भावी पिढ्यांना कोडे पडेल ,हे जाणूनच आपल्या पूर्वजांनी केलेली व्यवस्था म्हणजे सण-व्रते.त्या सण-व्रतांमधला गर्भित अर्थ समजून न घेता इतर दुय्यम गोष्टींना महत्त्व देणारे आपणच करंटे!
आता हेच बघा ना की पावसाळ्यामध्ये आणि त्यातही पावसाळ्यात सांगितलेल्या अनेक उपवासांना कोणती धान्ये खावीत,या प्रश्नाचे उत्तर सरळ आणि स्पष्टपणे आपल्याला पूर्वजांनी सांगितले आहे शिवामूठीद्वारे!तांदूळ,तीळ,मूग आणि जव (बार्ली) ही ती चार धान्ये.श्रावणामध्ये दर सोमवारी यातले एक धान्य देवाला वाहायचे असते. देव हा श्रद्धेचा भाग झाला.माणसासाठी श्रद्धा ही महत्त्वाची आहेच,कारण श्रद्धा नसेल तर मानवी जीवन नीरस आणि निरर्थक होईल.प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय वेगळा असतो इतकाच फरक आणि तुमची श्रद्धा तुम्हाला कमजोर बनवत नाही ना,हे तपासणे महत्त्वाचे.
वाचकहो, ही श्रावणी मूठ कोणासाठी?शिवामूठीचे धान्य काही देव येऊन खाणार नाही आहे.मग हे धान्य नेमके कोणाकरिता सांगितले आहे,अर्थातच तुमच्या-आमच्यासाठी. पावसाळ्यातील वातावरणाचा विचार करून निवडलेली ही चार धान्ये खरोखरच पावसाळ्यामध्ये आरोग्याला अनुरूप अशी आहेत,ते त्यांचे गुणधर्म बघितले की तुमच्या लक्षात येईलच.फक्त एक गोष्ट विसरू नका,की ही धान्ये मूठभर प्रमाणातच घ्यायची आहेत,तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी. कारण कुटुंबाला तेवढेच मर्यादित धान्य हवे आहे,या पावसाळ्यातल्या अग्निमांद्याच्या दिवसांमध्ये.आपल्या पूर्वजांकडे काय शब्दांची कमी होती,त्या व्रताला ’श्रावणी मूठ’ नाव द्यायला?
आणखी वाचा: Health Special: पाऊस, श्रावण आणि उपास यांचं काय कनेक्शन?
श्रावणी मुठीमधील मूग आणि तांदूळ ही उभय धान्ये पावसाळ्याला,पावसाळ्यातील वातावरणाला व स्वास्थ्याला अनुकूल अशी धान्ये आहेत.साहजिकच मुगाचे वरण-भात आणि त्याहुनही मुगाची खिचडी हा आहार पावसाळ्यासाठी योग्य.(पोटफुगीचा,गॅसेसचा त्रास होणार्या काही जणांना मात्र मुगाने त्रास होतो)मुगाचे वरणभात किंवा मुगाच्या खिचडीसोबत सहज पचतील अशा भाज्या,त्यातही सुश्रुतसंहितेने मानवी आरोग्यासाठी योग्य सांगितलेल्या वेलीवरच्या भाज्या हितकर होतील. पावसाळ्यात रात्री मुगाची खिचडी व हलक्या भाज्या हाच आहार योग्य होईल,अर्थात सुर्यास्ता पासुन तास-दीड तासांत.
वरीलपैकी तीळ व जव (बार्ली) या धान्यांचे सेवन पावसाळ्यात तारतम्याने करावे लागेल. पावसाळ्यात जेव्हा मुसळधार पाऊस पडतो, आसपास पाणी जमते, हवेत ओलावा वाढतो, वातावरण ओलसर-कुंद होते आणि शरीराला कोरड्या गुणांचा आहार अपेक्षित असतो, तेव्हा रुक्ष (कोरड्या) गुणाच्या जवाच्या गरमगरम भाकर्या खाव्यात. पावसाळ्यातला ओलावा हा आरोग्यास बाधक होतो , विविध रोगांना आमंत्रण देतो, त्याला प्रतिबंध करण्यासाठी जवाचे सेवन योग्य होईल. त्यातही ज्यांना शरीरात वाढलेल्या ओलाव्यामुळे विविध प्रकारचे श्वसनविकार, सूज संबंधित वेगवेगळे आजार त्रस्त करतात त्यांच्यासाठी जव हितकर. ज्यांच्या शरीरामध्ये साखरेचा चयापचय (मेटानोलिसम) बिघडलेला असतो व त्यामुळे अनेक विकृती संभवतात त्यांना,प्रत्यक्ष मधुमेही रुग्णांना व स्थूल-वजनदार शरीराच्या आणि स्थूलतेशी संबंधित विविध रोगांनी ग्रस्त असलेल्यांसाठी सुद्धा जव अतिशय उपयोगी. मल कोरडा व घट्ट करण्याचा जवांचा दोष लक्षात घेऊन मलावरोधाचा त्रास असणार्यांनी जवाच्या भाकर्या तूप लावून खाव्यात.
दुसरीकडे पावसाळ्यात जेव्हा गार वारे वाहू लागतात, सभोवतालचे वातावरण थंड होते आणि त्या थंडीचा आणि त्या थंडीमुळे संभवणार्या रोगांचा सामना करण्यासाठी तीळासारख्या तेलबियांचे सेवन योग्य होईल. आयुर्वेदानुसार तीळ हे उत्तम वातशामक आहेत. साहजिकच वर्षा ऋतूमधील वातप्रकोपजन्य वातविकारांमध्ये निश्चित उपयुक्त सिद्ध होतील. त्यातही ज्यांना हाडे, सांधे, स्नायू, नसा, कंडरांसंबंधित विविध आजार या दिवसांत त्रस्त करतात अशा कृश शरीराच्या-वातप्रकृती व्यक्तींना तिळाचे सेवन हितकारक होईल.
आणखी वाचा: Health Special: पावसाळ्यात कडधान्ये खावीत का?
हाडांना पोषक कॅल्शियम (१४५०) व फॉस्फरस (५७०) तीळांमधून भरपूर प्रमाणात मिळतो, तोसुद्धा नैसर्गिक-वनस्पतीज.याशिवाय तीळ शरीराला मुबलक उर्जा (५६३ ) पुरवतात, ज्या उर्जेची पावसाळ्यात अशक्त होणार्या शरीराला गरज असतेच. असे सगळ उत्तम गुण तीळांमध्ये असले तरी तीळ पचत आहेत का याकडे लक्ष देऊन तीळांचे सेवन करावे. त्यातही वातप्रकृतीच्या व्यक्ती,कृश-अशक्त शरीर असणारे आणि यांचा अग्नी सहसा दुर्बल असतो त्यांनी. तीळांसारख्या तेलबिया पचल्या तरच उपयोगी पडतील हे ध्यानात घ्य़ावे, अन्यथा नाही. कारण तेलबिया एकतर पचायला जड असतात आणि तीळ शरीरात उष्णता वाढवणारे असल्याने पावसाळ्यात पित्तसंचय असताना पित्त बळावण्याचा धोका असतो,त्यातही पित्तप्रकृती व्यक्तींना.
तीळ उष्ण असल्यामुळे पित्तसंचयाच्या (जमण्याच्या) स्थितीमध्येसुद्धा ज्यांना पावसाळ्यातच पित्तविकार त्रास देतात त्यांनी तीळ टाळावे. त्यामुळेच पित्तप्रकृती व्यक्ती आणि अम्लपित्त, अर्धशिशी, अंगावर पित्त उठणे, त्वचेवर लालसर पुरळ वा फोड येणे, गुदमार्गावाटे रक्त पडणे वगैरे उष्णताजन्य पित्तविकारांनी त्रस्त लोकांनी तरी तीळ कटाक्षाने टाळावेत. विशेषतः पाऊस थांबून ऊन पडत असेल, उकाडा जाणवत असेल तर तीळांपासुन दूरच राहावे. अन्यथा तांदूळ, मूग, तीळ व जव ही श्रावणी मुठीमधील धान्ये आरोग्याला अनुरूप आहेत, फक्त या सल्ल्याचे अनुसरण करताना थोडं तारतम्य बाळगावं.