Shreyas Talpade Heart Attack: अभिनेता श्रेयस तळपदेला १४ डिसेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. नंतर त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली आता साधारण २० हुन अधिक दिवसांनी श्रेयसच्या परिस्थितीत सुधारणा झाली आहे. आता त्याने आपल्या या धक्कादायक अनुभवाविषयी पहिली प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे. श्रेयसने सांगितले की, २८ वर्षे काम करताना त्याने स्वतःच्या शरीराकडून खूप मेहनत करून घेतली होती मात्र तो कधीच हॉस्पिटलमध्ये दाखल झाला नव्हता. कोलेस्टेरॉल आणि हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास असतानाही त्याला आपल्यावर कधी अशी वेळ येईल असे वाटले नव्हते असेही तो म्हणाला. यालाच जोडून त्याने या अनुभवातून आलेली शिकवण सुद्धा शेअर केली आहे. श्रेयस सांगतो की, “आपण स्वतःला आणि कुटूंबाला खूप गृहीत धरतो आपल्याला वाटतं की आपल्याकडे खूप वेळ आहे.” श्रेयसने बोलण्यातून स्वतःची चूक मान्य करताना इतरांनाही काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष देण्यासाठी भाग पाडले आहे. म्हणूनच कमी वयातच हृदयविकारांचा धोका टाळण्यासाठी नेमकं काय करायला हवं हे आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत.
अतिकष्ट आणि तणावाचा हृदयावर कसा परिणाम होतो?
आजच्या स्पर्धात्मक जगात काही प्रकारचे ताणतणाव आणि अपेक्षा पूर्ण करण्याची गरज याकडे कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही. प्रश्न हा आहे की या ताण तणावाचा सामना करण्याची तुमची तयारी कशी आहे?
फोर्टिस एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली येथील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीचे मुख्य संचालक डॉ निशिथ चंद्रा यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, मानवी शरीर तणावपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज असते. आपत्कालीन किंवा संकटाच्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याची नैसर्गिक यंत्रणा शरीरात असतेच. अगदी साधं उदाहरण म्हणजे अशा स्थितीत वाढणारे हृदयाचे ठोके आणि अंगावर शहारा येणे. ‘तो’ क्षण निघून गेल्यावर स्थिती पुन्हा पाहिल्यासारखीच होते. समस्या कुठे येते तर जेव्हा ही यंत्रणा सतत सक्रिय राहिली किंवा दाबली गेली तर उमटणारे प्रतिसाद सुद्धा भीषण ठरतात.
दीर्घकालीन तणावामुळे एंडोर्फिन, कॉर्टिसॉल आणि अॅड्रेनालाईन सारख्या हार्मोन्सच्या पातळी वाढते परिणामी रक्तातील कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्स, रक्तातील साखर आणि रक्तदाब वाढू शकतो. हे रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ देखील वाढवते. अधिक ताण- तणाव तुमचे रक्त घट्ट करतो, रक्तदाब वाढवतो आणि धमन्या संकुचित करतो काही वेळा तर यामुळे प्लेक फुटून रक्ताच्या गुठळ्या सुद्धा होऊ शकतात.
६० वर्षाच्यावर नाही तर ‘या’ वयातच वाढतो हृदयविकाराचा धोका!
२०२१ मधील एका अभ्यासात असे दिसून आले होते की सुमारे ११.२ वर्षं वैद्यकीय रेकॉर्ड तपासलेल्या प्रतिनिधींमधील ५.८ टक्के लोकांना उच्च तणावामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक किंवा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी अन्य त्रास जाणवले होते. उच्चरक्तदाब, धूम्रपान, लठ्ठपणा, मधुमेह किंवा कमी शारीरिक हालचाल हे जोखीम घटक विचारात घेतले नाहीत तरी त्यांच्या मूत्र चाचण्यांमध्ये कोर्टिसोलची पातळी दुप्पट झाल्याने या घटनांचा धोका ९० टक्क्यांनी वाढला होता. कॉर्टिसॉल आणि डोपामाइन या दोन हॉर्मोन्सचा उच्चरक्तदाबाशी असणारा संबंध ६० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांपेक्षा तरुण प्रौढांसाठी अधिक होता, असेही अभ्यासात आढळून आले होते.
ताणतणाव हा वेळेच्या घड्याळावर धावणाऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच, डॉ चंद्रा म्हणतात, “ज्या व्यक्तींचा हृदयविकारांचा कौटुंबिक इतिहास आहे त्यांनी त्यांच्या २० व्या वर्षापासून सतर्क राहणे आवश्यक आहे, कोणत्याही ३० वर्षांच्या व्यक्तीने वार्षिक तपासणी करून घ्यावी, विशेषत: कोविड नंतर, जेव्हा हृदयविकाराचा धोका स्पष्टपणे दिसून येतो. निदान ईसीजी, ट्रेडमिल, इकोकार्डियोग्राम, रक्तातील कोलेस्टेरॉल आणि साखरेची वार्षिक तपासणी करा.
हे ही वाचा<< Diabetes: काळ्या चण्याची उसळ, मसूरासह ‘हे’ पदार्थ रक्तातील साखर ठेवतील तुमच्या नियंत्रणात; वाचा डॉक्टरांचा सल्ला
तणाव कमी कसा करावा?
डॉ चंद्रा सांगतात की, “माझे बहुतेक रुग्ण त्यांच्याकडे स्वतःसाठी वेळ नाही असे म्हणतात, लोकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की नोकरी आणि स्पर्धा हा आयुष्याचा एक पैलू आहे पण आरोग्य हे सर्वोच्च आहे. दररोज १५ ते २० मिनिटांचा शारीरिक व्यायाम हृदयविकार दूर ठेवण्यासाठी पुरेसा आहे. “त्यासाठी तुम्हाला जिमचा उंदीर बनण्याची गरज नाही.” मानसिक तणाव दूर करण्यासाठी योग, ध्यान, करमणूक यासह योग्य झोप घेणे हे अगदी आवश्यक आहे. “धमन्या आणि रक्तवाहिन्यांमधील पेशींना दुरुस्त आणि बरे होण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे अतिव्यायाम किंवा उशिराने काम करणे देखील हृदयविकाराच्या झटक्याला कारणीभूत ठरू शकते.