Sridevi’s Extreme Dieting : अनेकदा सेलिब्रिटींना फिट दिसण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते, जी सर्वांना दिसत नाही. पण, सेलिब्रिटींना ते एकट्याला सहन करावे लागते. चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी २०२३ मध्ये एका मुलाखतीत त्यांची दिवंगत पत्नी दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी हिच्या मृत्यूविषयी उघडपणे सांगितले होते. सडपातळ दिसण्यासाठी श्रीदेवीने केलेल्या कठोर डाएटचा तिच्या आरोग्यावर कसा गंभीर परिणाम झाला, याविषयीसुद्धा ते बोलले.

द न्यू इंडियनला दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर सांगतात, “तिला नेहमी चांगले दिसायचे होते. कारण- जेव्हा तुम्ही स्क्रीनवर असता तेव्हा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने स्वत:ला दाखवायचे असते. स्क्रीनवर चांगले दिसण्यासाठी तिला सडपातळ (good shape) राहायचे होते. तिने ४६-४७ किलोपर्यंत वजन कमी केले. त्यापूर्वीसुद्धा तिने अनेकदा वजन कमी केले होते. डॉक्टर तिला सांगायचे की, तुम्हाला कमी रक्तदाबाचा त्रास आहे. त्यामुळे कठोर डाएट घेऊ नका, आहारात मिठाचे सेवन टाळू नका.” बोनी यांच्या मते, कधी कधी श्रीदेवी उपाशी राहायची, ज्यामुळे शरीरातील पाणी कमी होत असे आणि मीठ टाळल्याने शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, असे तिला वाटायचे. सडपातळ दिसण्यासाठी तिचा संघर्ष क्रॅश डाएटिंगच्या धोक्याविषयी प्रश्नचिन्हे निर्माण करतो.

कठोर डाएट केल्याने रक्तदाबावर कसा परिणाम होतो?

टोन 30 पिलेट्सच्या वरिष्ठ न्युट्रिशनिस्ट आश्लेषा जोशी दि इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगतात, “कठोर किंवा क्रॅश डाएटमुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन आणि रक्तातील साखरेची पातळी बिघडू शकते, ज्यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो. जेव्हा तुम्ही कॅलरीजचे खूप जास्त प्रमाणात मर्यादित सेवन करतात, तेव्हा शरीराला ऊर्जेसाठी पुरेसे ग्लुकोज मिळत नाही. त्यामुळे चक्कर येणे, थकवा येणे आणि गंभीर प्रकरणांमध्ये डाएट केल्याने अंधारी येऊ शकते, यासारखी लक्षणे उद्भवू शकतात. कारण- रक्तातील साखर आणि रक्तदाबात झालेला लहान-मोठ्या बदलांचा परिणाम थेट मेंदूवर झाल्याचे दिसून येते.

तज्ज्ञांच्या मते, वारंवार डोळ्यासमोर अंधारी येत असेल, तर ते मेंदूला अपुरा रक्तपुरवठा होत असल्याचे लक्षण असू शकते. ज्यामुळे पडणे, दुखापत होणे अशा त्रासदायी घटनांप्रमाणेच तुमच्या हृदय व रक्तवाहिन्यांवर दीर्घकालीन ताण येऊ शकतो. वारंवार कठोर डाएट केल्याने शारीरिक तणाव वाढतो, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य, किडनीचे कार्य आणि हार्मोनल संतुलन धोक्यात येऊ शकते.

रक्तदाब आणि एकूण आरोग्य नियंत्रित ठेवण्यात मीठ कसे फायदेशीर?

बोनी यांनी सांगितल्याप्रमाणे, डॉक्टरांनी श्रीदेवी यांना कमी रक्तदाबाचा त्रास असल्याने मिठाचे सेवन टाळू नका, असा सल्ला दिला होता. पण बरेच लोक विशेषतः महिला शरीरात पाणी जमा राहते म्हणून मिठाचे सेवन करणे टाळतात. जोशी याबाबत सांगतात की, सोडियम हे द्रवसंतुलन राखण्यात, तसेच, मज्जासंस्थेचे कार्य व स्नायूंचे आरोग्य यामध्ये मीठ महत्त्वाची भूमिका बजावते. “कमी रक्तदाब असलेल्या व्यक्तीने मिठाचे सेवन कमी केल्याने रक्ताचे प्रमाण कमी होऊन. रक्ताभिसरण प्रक्रिया बिघडू शकते. नैसर्गिकरीत्या कमी रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठी मध्यम प्रमाणात मिठाचे सेवन फायदेशीर आहे.

मिठामुळे पोटफुगी किंवा शरीरात पाणी जमा राहण्याची भीती असणे स्वाभाविक आहे. पण, त्या सांगतात की, याच कारणाने अनेकदा मिठाचे सेवन पूर्णपणे बंद केले जाते; पण शरीरात पाणी जमा राहणे हे खराब हायड्रेशन, हार्मोनल बदल आणि असंतुलित आहारामुळेसुद्धा होऊ शकते. त्यासाठी फक्त मीठच कारणीभूत नाही.

कठोर डाएटद्वारे सडपातळ राहण्याचा प्रयत्न करण्याचे दीर्घकालीन परिणाम

“दीर्घकालीन कठोर डाएट शारीरिकदृष्ट्या चांगले नसते. त्यामुळे पोषक घटकांची कमतरता, हार्मोनल असंतुलन, स्नायूंचे नुकसान, कमकुवत हाडे यांबरोबरच पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे अमेनोरिया (amenorrhea) म्हणजेच मासिक पाळी कमी होणे, ऑस्टिओपोरोसिस (osteoporosis) म्हणजे हाडे कमकुवत होणे, रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होणे इत्यादी आजार होऊ शकतात”, असे जोशी सांगतात. त्या पुढे सांगतात, मानसिकदृष्ट्या अशा डाएटमुळे आहाराविषयी सतत टेन्शन, बॉडी इमेज समस्या आणि खाण्याच्या पद्धतीमध्ये विसंगती दिसू शकते.