ख्रिसमस आणि नवीन वर्ष जवळ आले आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन भरपूर सेल्स या दिवसात सुरु होतात. विशेषतः ऑनलाईन सेल्समध्ये प्रचंड वाढ होते. तुफान सवलती दिल्या जातात. अशावेळी ऑनलाईन शॉपिंगचा मोह होणं स्वाभाविक आहे. पण असे असताना रिव्ह्यू वाचणं आणि फेक रिव्ह्यूपासून लांब राहणं आवश्यक आहे. खोटे किंवा पेड रिव्ह्यू देणाऱ्या लोकांची ऑनलाईन जगात चलती असते. पन्नास-शंभर रुपयांना खोटे रिव्ह्यूज लिहून देणारे आज उपलब्ध आहेत. अशावेळी आपण जो रिव्ह्यू वाचतोय तो खरा आहे की खोटा हे माहिती असणं आवश्यक आहे. ऑनलाईन शॉपिंगमध्ये रिव्यूला प्रचंड महत्व असल्याने फेक रिव्ह्यूचा धंदा तेजीत आहे. पण त्यामुळे आपलं मोठं नुकसान होऊ शकतं.
नक्की काय होतं?
फेक रिव्ह्यू म्हणजे प्रॉडक्ट आणि सेवेबद्दलची प्रशंसा करणारी खोटी प्रतिक्रिया वाचून ते प्रॉडक्ट किंवा सेवा जर आपण खरेदी केली तर निम्न दर्जाची वस्तू आणि सेवा आपल्याला मिळण्याचा धोका असतो. अशा फ्रॉड्समध्ये वस्तू किंवा सेवा मिळतच नाही असं होतं नाही. खरेदी केलेल्या वस्तूचे पार्सल वेळेवर आपल्यापर्यंत पोहोचते. पण त्याचा दर्जा आपल्याला जो सांगितला गेलेला असतो तसा नसतो. ५ स्टार्स दिलेले असतात पण प्रत्यक्षात वस्तू १ स्टार देण्याच्या लायकीचीही नसते. म्हणजे आपण जेवढे पैसे खर्च केलेले आहेत, त्या मोबदल्यात आपल्याला वस्तू मिळत नाही. ही एक प्रकारची फसवणूकच आहे.
फेक रिव्यू काय करतात?
वस्तू खूप चांगले आहे, छान आहे, व्हॅल्यू फॉर मनी (म्हणजे जे पैसे आपण खर्च करतोय त्यात योग्य मोबदला) आहे अशा गोष्टी लिहिलेल्या असतात. स्टार्सही ४ किंवा ५ दिलेले असतात. ते सगळं वाचून अनेकदा वस्तू चांगली आहे असं ग्राहकाला वाटू शकतं. तो ती वस्तू खरेदी करतो पण वस्तूच्या माहितीत आणि रिव्ह्यूमध्ये वस्तू किती चांगली आहे याचं जे वर्णन करण्यात आलेलं असतं तशी ती वस्तू निघत नाही. अगदीच खालावलेल्या दर्जाची असते. खरे रिव्ह्यूज मिळायला वेळ लागतो. अशावेळी वस्तू अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेकदा विक्रेते स्वतःच फेक रिव्ह्यूज लिहून पोस्ट करुन घेतात. एखादा व्यक्ती वेगवेगळ्या नावाने आणि युजर नेमने शेकडोने खाती काढून रिव्यू देऊ शकतो. हे रिव्ह्यूज वाचून ग्राहक फसतात.
हेही वाचा – Health Special : इयरएन्डला डाएट सोडताय? मग हे वाचाच
काय करावे?
रिव्ह्यूज वाचत असताना किती रिव्ह्यूज दिलेले आहेत ते बघणं आवश्यक आहे. शंभर रिव्ह्यूजमध्ये ९० टक्के चांगले, अप्रतिम असतील तर तिथे शंकेला जागा आहे. लाखो रिव्ह्यूजमध्ये जर वस्तूचं रेटिंग ४+ असेल तर याचा अर्थ ती वस्तू विकत घेण्याचा विचार तुम्ही करु शकता. अनेक इ कॉमर्स वेबसाईट्स रिव्ह्यूवर युजर वेरिफाइड युजर आहे का हे दाखवतो. अशा वेरिफाइड युजरकडून आलेले रिव्ह्यूज फक्त गृहीत धरावेत आणि त्या आधारावर निर्णय करावेत. जर युजर वेरिफाइड नसेल तर तिथे रिव्ह्यू खरा आणि खोटा ही शंका उपस्थित होऊ शकते. रिव्ह्यू वाचणं आवश्यक आहे पण फक्त रिव्ह्यूवर आधारित निर्णय घेणं बरोबर ठरणार नाही. प्रॉडक्टचा व्हिडीओ आहे का, डिस्क्रिप्शनमध्ये सगळा तपशील लिहिलेला आहे का हेही बघणं आवश्यक आहे. त्यानंतरच वस्तू विकत घ्यायची की नाही याचा निर्णय केला पाहिजे.