Sitopaladi benefits: ऋतू बदलाप्रमाणेच आपल्या आहाराच्या सवयी तसेच आपल्या लहान-सहान गोष्टींमध्ये बदल होत असतात, याचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो. सध्या पावसाळा सुरू आहे आणि या ऋतूमध्ये अनेकदा साथीचे आजार होण्याची शक्यता वाढते, त्यात सर्दी आणि खोकल्याचं प्रमाण जास्त असतं. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि श्वासनलिकांसंबंधी आरोग्य सुधारण्यासाठी पावसाळ्यात वापरला जाणारा एक उत्कृष्ट आयुर्वेदिक हर्बल उपाय म्हणजे ‘सितोपलादी.’
काय आहे सितोपलादी?
सितोपलादी ही बांबू वनस्पती (वंशलोचन), पिंपळी, वेलची, दालचिनी आणि खडीसाखर यापासून बनलेली एक औषधी वनस्पती आहे. डॉ. डिंपल जांगडा, आयुर्वेद प्रशिक्षक आणि आतडे आरोग्यतज्ज्ञ यांच्या मते, सितोपलादीमध्ये दाहक-विरोधी, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत, जे आरोग्य सुधारण्यास आणि सर्दी, खोकला, सायनस आणि पावसाळ्यातील ॲलर्जींशी लढण्यास मदत करतात.
सर्दी, खोकल्यासाठी फायदेशीर
पावसाळ्यात आर्द्रता वाढल्यामुळे आणि वातावरणात अधिक बॅक्टेरिया निर्माण झाल्यामुळे लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत बऱ्याच लोकांना सर्दी, खोकला आणि दमा होऊ शकतो. “सितोपलादी (Sitopaladi benefits) शरीरातील कफ असंतुलन कमी करून या लक्षणांशी लढण्यास मदत करते. कफ दोष हा शरीराला रचना आणि फॉर्म प्रदान करण्यात मदत करतो, परंतु जेव्हा तो असंतुलित होतो किंवा जास्त प्रमाणात वाढतो तेव्हा कफ श्लेष्मा जमा होण्यास कारणीभूत ठरू शकतो आणि यामुळेच जीवाणू आणि विषाणूंचे प्रमाण वाढते. सितोपलादी हा श्लेष्मा साफ करण्यास मदत करते आणि रक्तसंचय कमी करते आणि त्यामुळे श्वासनलिकांसंबंधी आरोग्य समस्या दूर होण्यास मदत होते,” असं डॉ. डिंपल म्हणाल्या.
डॉ. स्वाती दराडे, B.A.M.S. DYA, आयुष दवाखाना, सातारा, महाराष्ट्र यांनी घटकांची यादी केली.
यादीतील समाविष्ट घटक खालीलप्रमाणे
सितोपला (खडीसाखर पावडर) – १६ भाग
वंशलोचन (बांबूच्या झाडाचा आतील पांढरा भाग) – ८ भाग
पिंपळी (लांब मिरी) – ४ भाग
एला (वेलची) – २ भाग
त्वक् (दालचिनी) – १ भाग
“पावसाळ्यात हवा थंड आणि कोरडी होते, परिणामी सर्दी, खोकला, घशात खवखव, चिडचिड आणि वेदना यांसारख्या श्वसनाच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात. अशा परिस्थितीत सितोपलादी चूर्णाने अतिशय आशादायक आणि जलद परिणाम दाखवले आहेत,” असे डॉ. तेजस लोखंडे, सल्लागार आयुर्वेद आणि पंचकर्म फिजिशियन, मुंबई यांनी सांगितले.
“वारंवार सर्दी, खोकला, दमा किंवा श्वासनलिकांसंबंधी आरोग्य समस्यांनी ग्रस्त असलेल्या कोणालाही त्यांच्या आहारात या हर्बल गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे. यातील काही घटक तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातून घेऊ शकता,” असं डॉ. डिंपल म्हणाल्या.
हेही वाचा… आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘हे’ पॉवर ड्रिंक ठरेल वरदान! आहारतज्ज्ञांनी सांगितले फायदे
“सितोपलादी हे पाचक आरोग्यासाठीदेखील उत्कृष्ट आहे. सितोपलादीतील उष्ण गुणधर्मामुळे चयापचय आणि भूक सुधारते. आजारपणात भूक न लागणाऱ्यांसाठी हे विशेषतः चांगले आहे. हे संक्रमण आणि विषाणूंशी लढण्याची शरीराची क्षमता सुधारून प्रतिकारशक्ती वाढवण्यासदेखील मदत करते. दालचिनी, पिंपळी आणि वेलचीमध्ये दाहकविरोधी गुणधर्म असतात, जे जळजळ कमी करण्यास आणि शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. हे विषारी पदार्थ काढून टाकून शरीराला डिटॉक्सिफाई करण्यासदेखील मदत करते,” असे डॉ. डिंपल म्हणाल्या.
कसा कराल वापर
कोरड्या खोकल्यासाठी हे चूर्ण (Sitopaladi uses) साधारणपणे गाईच्या तूपात आणि कफ घालवण्यासाठी मधासोबत दिले जाते. “हे तुमच्या आहारात समाविष्ट करण्यापूर्वी आयुर्वेदिक डॉक्टरांशी बोला”, असे डॉ. लोखंडे म्हणाले.
डॉ. दराडे यांनी नमूद केले की, आयुर्वेदिक सल्लागाराने सांगितल्यानुसार १ ते ३ ग्रॅम मध आणि तूपा (अर्धा चमचा मध आणि १ चमचा तूप) बरोबर घेण्याची शिफारस केली जाते. “कधी कधी यामुळे जठराची सूज वाढू शकते, म्हणून हे आयुर्वेदिक औषध रिकाम्या पोटी घेणे टाळा. सितोपलादी एक-दोन आठवडे घेतले जाऊ शकते,” असे डॉ. दराडे म्हणाले.
“सामान्यतः गरोदर स्त्रिया आणि लहान मुलांना अशा औषधी वनस्पतींचा सल्ला दिला जात नाही, कारण यात शक्तिशाली फॉर्म्युलेशन्स आहेत. तसेच कोणतीही ॲलर्जी आणि इतर औषधांवरील प्रतिक्रियादेखील तपासणे आवश्यक आहे,” असं डॉ. डिंपल म्हणाल्या.