जागतिक आरोग्य संघटनेने २०२२मध्ये दिलेल्या ग्लोबल स्टेटस रिपोर्ट ऑन फिजिकल अॅक्टिविटी नुसार २०३० पर्यंत जगभरात ५०० दशलक्ष लोक बैठ्या जीवनशैलीमुळे (शारीरिक निष्क्रियतेमुळे) होणाऱ्या आजारांमुळे ग्रस्त असतील. यात हृदयाशी संबंधित आजार, स्थूलत्व, मधुमेह यासारख्या आजारांचा समावेश आहे. शारीरिक निष्क्रियतेमुळे होणाऱ्या आजारांचे उपचार आणि प्रतिबंध यावर होणार खर्च हा समाजावर आणि जगावर प्रचंड आर्थिक भार आणू शकतो असंही यात नमूद केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर दिलेली आकडेवारी बघता शारीरिक क्रियाशीलता समजून घेणं आणि अमलात आणणं अतिशय आवश्यक झालेलं आहे. दैनंदिन आयुष्यात जास्तीत जास्त क्रियाशील राहण्याचे मार्ग आपण बघणार आहोतच पण त्याआधी काही मुख्य संकल्पना किंवा मुद्दे माहिती करून घेणं आवश्यक आहे.

शारीरिक क्रियाशीलता फक्त हृदयासाठी आणि शरीरासाठी महत्वाची नसून मानसिक आरोग्यासाठी पण तितकीच महत्वाची आहे. जगभरात होणारे तीन चतुर्थांश मृत्यू हे हृदयरोग, टाइप 2 मधुमेह आणि कॅन्सर यामुळे होतात. शारीरिकरित्या क्रियाशील असणाऱ्या व्यक्तींमध्ये हे आजार होण्याचा धोका अतिशय कमी होऊन जातो. शारीरिक क्रियाशीलतेमुळे मेंदू जास्त चांगल्या प्रकारे काम करतो त्यामुळे तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता, नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता वाढते. डोपामाइन नावाचं संप्रेरक पुरेशा प्रमाणात स्रवतं, त्यामुळे आनंदाची भावना निर्माण होते.

हेही वाचा : पोटाची चरबी कमी करण्यासाठी ही पाच घरगुती पेये ठरू शकतात फायदेशीर; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात…

समथिंग इज बेटर दॅन नथिंग अँड मोर इज बेटर

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने प्रौढ व्यक्तींसाठी आठवड्याला दीडशे ते तीनशे मिनिटं मध्यम स्वरूपाच्या एरोबीक व्यायामाची आणि लहान –किशोरवयीन मुलांसाठी दर दिवशी किमान साठ मिनिटांच्या मध्यम स्वरूपाच्या एरोबीक व्यायामाची शिफारस केली आहे.

सगळ्या प्रकारची शारीरिक हालचाल महत्वाची

शारीरिक हालचाल ही फक्त व्यायामाच्या स्वरूपात असायला हवी असं गरजेचं नाही. कामाच्या ठिकाणी, खेळाच्या स्वरूपात, प्रवासादरम्यान (चालणं, सायकलिंग) या आणि अशा कोणत्याही स्वरूपात ती असू शकते.

स्नायूंची शक्ती वाढवणाऱ्या व्यायामाना प्राधान्य द्या

जसजसं वय वाढत जाईल तसं एरोबीक व्यायामानसोबत वजन उचलण्याचे व्यायाम सुद्धा करा. त्याने तुम्हाला तोल सांभाळण्यात, हालचालींमधली सुसूत्रता वाढवण्यात मदत होईल आणि वयोमानानुसार तोल जाऊन पडण्याचा धोका कमी होईल.

हेही वाचा : तुम्ही रोज सकाळी अक्रोड खाल्ल्यास शरीरात काय बदल होतील? तज्ज्ञांनी सांगितले फायदे व तोटे

शारीरिक क्रियाशीलतेचा फायदा हा सगळ्या वयोगटातील व्यक्ती न अगदी गरोदर स्त्रिया आणि नुकत्याच प्रसूती झालेल्या स्त्रियांनाही होतो. त्यामुळे शारीरिक क्रियाशीलता ही कुणालाही वर्ज्य नाही. (फक्त ती व्यक्तीनुरूप वेगळी असू असते)

कामाच्या ठिकाणी, घरी आणि प्रवास करताना शारीरिकरीत्या क्रियाशील राहण्याचे प्रत्यक्ष उपाय पाहूया पुढच्या भागात

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sitting for too long causes serious diseases sitting is new smoking part 2 hldc css
Show comments