– डॉ. वैभवी वाळिम्बे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वेदना झोप प्रभावित करते; तथापि, झोपेचादेखील वेदनांवर परिणाम होतो. योग्य झोपेच्या अभावामुळे वेदना वाढण्याची आणि वेदनांबद्दल संवेदनशीलता वाढण्याची शक्यता असते. क्रोनिक (खूप दिवसांपासून किंवा वर्षांपासून असलेल्या) वेदनेमुळे झोपेच्या समस्या देखील उद्भवू शकतात. वेदना आणि झोप यातील संबंध हा परस्पर पूरक आहे. वेदना आणि झोप यांचा संबंध समजून घेण्यासाठी आपल्याला पेन थ्रेशोल्ड ही संकल्पना समजून घेणं आवश्यक आहे. पेन थ्रेशोल्ड हा किमान बिंदू आहे ज्यावर तुमचा मेंदू कुठल्याही केमिकल, फिजिकल उत्तेजनेचे ‘वेदनादायक’ असे आकलन करतो- वेदना झोपेला आणि झोप वेदनेला पुढीलप्रकरे प्रभावित करते.

१.तीव्र वेदना- ही शक्यतो तीव्र प्रकारात मोडणारी वेदना असते. एखादी मोठी शस्त्रक्रिया झालेल्या दिवशी किंवा त्यानंतरचे काही दिवस अति वेदनेमुळे झोप न लागणे हे सामान्यपणे बघितलं जातं. काही स्ट्रॉंग पेन किलर्स किंवा सेडेटिव्जद्वारे हे सहज नियंत्रणात आणता येतं आणि शक्यतो फक्त दोन ते तीन दिवसांपर्यंत मर्यादित असतं.

२.क्रोनिक पेन – खूप दिवसांपासून असलेली म्हणजेच जुनाट वेदना झोप प्रभावित करू शकते. उदाहरणार्थ संधिवाताची वेदना या वेदनेचं मूळ हे इन्फलमेटरी असल्यामुळे बराच वेळ सांधे (जसं की झोपेत कोपर मोडलेली राहतात, गुडघे एकत्र सरळ राहतात किंवा मोडले जातात) एकाच स्थितीत राहिले की ही वेदना वाढते ज्यामुळे पेशंटला झोपेत अधूनमधून जाग येते, संधिवाताप्रमाणेच पाठीच्या मणक्यांमध्ये होणारा इन्फ्लमेटरी आजार म्हणजे अंकायलोसिंग स्पोंडीलायटिस यात झोपेत पाठीचा कणा काही तास एकाच स्थितीत राहिला की वेदना सुरू होते आणि पेशंटला जाग येते. उठून काही वेळ चाललं, म्हणजेच काहीतरी अॅक्टिविटी केली की वेदना कमी होते.

३.वर दिलेल्या दोन्ही उदाहरणांमधून हे दिसून येतं की वेदनेमुळे जाग येते पण बहुतेकवेळा अशी जाग आल्यानंतर हालचालीमुळे वेदना जरी कमी झाली तरी झोपेचं चक्र मात्र पार विस्कळीत होऊन जातं आणि नंतर सहजी झोप लागत नाही. एक दोन दिवस किंवा आठवडे हा त्रास सहन केला जाऊ शकतो पण जेव्हा हे नेहमीचच होऊन जातं तेव्हा मात्र थेट पेशंटची क्वालिटी ऑफ लाइफ कमी होते. आणि पेशंटचा पेन थ्रेशोल्ड देखील कमी होतो.

४.वेदनेमुळे झोपेतून जाग येणं, वेदना कमी होणं पण नंतर झोप मात्र न लागणं हे सतत झालं की शरीराची रिपेरिंग सिस्टम पूर्ण जोमाने काम करू शकत नाही, दिवसभरात झालेली शरीराची झीज भरून निघत नाही परिणामी आधीच संधीवातसरख्या आजारांमुळे वाढलेलं इन्फलमेशन अजूनच वाढतं आणि परिणामी वेदना अधिक तीव्रतेने जाणवते. म्हणूनच हे वेदनेमुळे झोप न येणं आणि झोप न झाल्यामुळे शरीराची झीज भरून न निघण परिणामी वेदना अजून
वाढणं हे चक्र सुरू राहतं.

५.याव्यतिरिक्त झोप आणि वेदना यांना एकमेकांशी जोडणारा दुआ म्हणजे वेदनेकडे बघण्याचा दृष्टिकोन. काही वेळा वेदनेमुळे रोजच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर बंधनं येतात जसं की आवडीचं काम, आवडीचे पदार्थ खाणं, आवडत्या ठिकाणी फिरायला जाणं, व्यावसायिक किंवा कौटुंबिक जबाबदार्‍या पूर्ण करणं यामुळे व्यक्ती सतत चिंता आणि निराशेत राहू लागते. यामुळे मेंदू पूर्णपणे निश्चिंत होऊ शकत नाही त्यामुळे झोप येत नाही आली तरी
झोपेची गुणवत्ता ही कमी होते. वेदनेमुळे किंवा इतर कुठल्याही कारणामुळे सतत झोपेचं प्रमाण आणि गुणवत्ता कमी अधिक होत राहिली तर त्याचा थेट परिणाम वेदनेच्या थ्रेशोल्ड वर होतो, वेदनेचे थ्रेशोल्ड कमी होते आणि त्यामुळे कुठलीही वेदना आहे त्यापेक्षा अधिक तीव्रतेने जाणवते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sleep disorder mental health pain emotions hldc psp