Sleeping & Diabetes: तुम्ही कधी ना कधी आयुष्यात ऐकलं असेल की तुम्ही भले १०० पैकी ९९ गोष्टी सर्वोत्तम करा पण एखादी गोष्ट चुकली की लोकांच्या तीच लक्षात राहते. त्याचेच वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात, एरवी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तरी चालतं पण आरोग्याच्या बाबत मात्र आपण अशी हलगर्जी करूच नये. तेव्हा आपल्या वतीने जितकी १०० टक्के काळजी घेता येईल तितकी घ्यावीच. आज हे तत्वज्ञान सांगण्याचं कारण म्हणजे बहुसंख्य भारतीयांमधील वाढत चाललेली मधुमेहाची समस्या. एका नव्या सर्वेक्षणात समोर आलेल्या माहितीनुसार, भलेही तुम्ही योग्य आहार घेत असाल, व्यायाम करत असाल तरी झोपेच्याबाबत केलेली एक चूक सुद्धा तुमचा मधुमेही होण्याचा धोका वाढवू शकते.
यूके बायोबँकच्या सर्वेक्षणात २,४७, ८६७ प्रौढांच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले होते. त्यात असे आढळून आले की, जेव्हा लोक दिवसातून सहा तासांपेक्षा कमी झोपतात तेव्हा त्यांना टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका सामान्यपणे झोपणाऱ्या लोकांच्या तुलनेत जास्त असतो. जे लोक पाच तास झोपतात त्यांना टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका १६ टक्क्यांनी जास्त असतो, तर तीन ते चार तास झोपणाऱ्यांना आठ तास झोपणाऱ्यांपेक्षा ४१ टक्के जास्त धोका असतो.
झोप आणि मधुमेह यांचा संबंध काय?
डॉ व्ही मोहन, चेन्नईच्या डायबेटिस स्पेशॅलिटी सेंटरचे अध्यक्ष यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितल्यानुसार, जेव्हा आपण कमी झोपतो, तेव्हा आपल्या शरीरातील काउंटर-रेग्युलेटरी हार्मोन्स सक्रिय होतात. शरीराला वाटतं की आपण विश्रांती घेत नाही म्हणजे आपण तणावाखाली आहात, त्यामुळे ते तणाव संप्रेरक शरीरात सोडू लागतं. हे हार्मोन्स इन्सुलिनच्या कामात व्यत्यय आणतात. तुम्ही खाल्ल्यानंतरही शरीर कमी प्रमाणात इन्सुलिन सोडते ज्यावर शरीर लगेचच प्रक्रिया करू शकत नाही, त्यामुळेच हे ग्लुकोज तुमच्या रक्तप्रवाहात राहते, ज्यामुळे तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका वाढतो आणि हळूहळू हृदयावरही परिणाम होतो.
झोपेची कमतरता ही भुकेची चेतना जागृत करणारा हार्मोन घ्रेलिनला उत्तेजित करते तर तृप्ति देणारा हार्मोन लेप्टिन कमी करते. म्हणूनच उशीरा झोपणाऱ्यांना मध्यरात्री भूक लागण्याची शक्यता असते. ज्यामुळे त्यांचा रक्तदाब वाढतो आणि त्यांना लठ्ठपणाचा धोका असतो, जो मधुमेहाचा आणखी एक जोखीम घटक आहे. कमी झोपेमुळे मधुमेह असलेल्या लोकांवर दीर्घकालीन मानसिक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हालचालींची सुसूत्रता सुद्धा कमी होऊलागते , शेवटी, जेव्हा सर्कॅडियन लय प्रभावित होते, तेव्हा चयापचयावर गंभीर परिणाम होऊ लागतो.
झोपण्याची वेळ काय असावी?
अर्बन रुरल एपिडेमियोलॉजिकल (PURE) स्टडी, २०२१ मध्ये, असे आढळून आले होते की, तुम्ही किती झोपता याबरोबरच झोपेची वेळ देखील महत्त्वाची आहे. रात्री १० ते मध्यरात्री दरम्यान झोपण्याची आदर्श वेळ आहे. मात्र जे लोक अगदी पहाटे १ ते ३ या वेळेत झोपायला जातात त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार होण्याचा धोका जास्त होता.
जास्त झोपणेही घातकच!
जे लोक रात्री सहा तासांपेक्षा कमी झोपतात त्यांना मधुमेह होण्याचाच नव्हे तर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग व परिणामी मृत्यूचा धोकाही असतो, हे सिद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या कालावधीसाठी झोपलेल्या लोकांच्या मृत्यू दराची गणना केली असता असे आढळले की जे लोक दिवसातून सहा ते आठ तास झोपतात त्यांच्यामध्ये मृत्यू दर सर्वात कमी आहे व जे लोक सहा तासांपेक्षा कमी झोपतात त्यांना हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे प्रमाण जास्त होते.
हे ही वाचा<< १० वर्षांच्या मुलीच्या मृत्यूचं कारण ठरलेल्या केकमध्ये ‘हा’ पदार्थ झाला होता जास्त; तुम्हीही व्हा सावध, हे त्रास ओळखा
एक आश्चर्याची बाब म्हणजे फक्त कमी वेळच नाही तर आठ तासांपेक्षा जास्त झोपेमुळेही मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अधिक वेळ झोपणाऱ्यांना हायपोथायरॉईडीझम आणि काही दुर्बल रोगांसारख्या मूलभूत आरोग्य समस्या उद्भवण्याचा धोका असू शकतो. हे लोक लठ्ठपणाचा सामना करू शकतात. अनेकदा झोपेच्या पूर्ण चक्रातील एकूण मिळालेली झोप मात्र कमी असू शकते. त्यामुळे जास्त किंवा कमी झोपणे घातक ठरू शकते.