भारतात सकाळी उठल्याबरोबर पहिल्या पाच मिनिटात आधी मोबाईल उघडून व्हॉट्सअप नाहीतर सोशल मीडिया किंवा न्यूज अॅप्स बघणाऱ्यांचं प्रमाण भारतात ६० टक्क्यांहून अधिक आहे. म्हणजे माणसं अनेकदा अंथरुणातून बाहेरही आलेली नसतात पण ती फोनवर बोलायला, चॅटिंग करायला, कमेंट्स करायला सुरुवात करतात. हे वर्तन काहीतरी गडबडीचं आहे असं यातल्या कुणालाही वाटत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तीच गत रात्री झोपतानाचीही. डोळयांवर पेंग येऊन हातातला मोबाईल तोंडावर पडेस्तोवर तो बघत बसणारे अनेक आहेत. सीरिअल्स बघता बघता रात्री झोप लागते आणि सकाळी उठल्यावर सीरिअलचा तो एपिसोड संपून पुढचे अजून काही एपिसोडही संपलेले असतात कारण बिंज वॉच करता करता रात्री कधीतरी झोप लागते पण मोबाईल सुरुच असतो. झोपेत तो बंद करायचं राहूनच जातं. झोपे झोपेपर्यंत डोळ्यांसमोर मोबाईलचा स्क्रीन धरून झोपण्याची सवय हल्ली अनेकांना असते. कितीतरी जणांना तशाच अवस्थेत झोपही लागते पण फोन सुरुच असतो. मग मध्येच नोटिफिकेशन वाजतं, खडबडून जाग येते, डोळे बारीक करत, चोळत काहीबाही बघितलं जातं. अनेकांना झोपेत मध्येच उठून सोशल मीडिया चेक करायची सवय असते. यात झोपेच्या अंमलाखाली असताना आपण कुणाला, कशाला लाईक देतोय, तिथे काय कॉमेंट लिहितोय हेही लक्षात राहत नाही आणि मग सकाळी भलताच काहीतरी गोंधळ झाल्याचं लक्षात येतं.

आणखी वाचा: Mental Health Special: शाळकरी मुलांहाती मोबाईल: फायद्यापेक्षा दुष्परिणामच अधिक!

झोपताना मोबाईल बघण्याची सवय मोडली तर बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. पालकांचं बघून हल्ली मुलंही झोपेपर्यंत मोबाईलला चिकटलेली असतात. एकीकडे पेंग येत असते डोळ्यावर तरीही हातातून मोबाईल सुटत नाही अशी अवस्था पालक आणि मुलं सगळ्यांचीच असते. झोप नीट न झाल्यामुळे अनेक मानसिक, शारीरिक त्रास सुरु होण्याची शक्यता असते. मुलांबरोबर शिबिरं घेतो तेव्हा रात्री जागून मोबाईलवर काय करता असं विचारलं की मुलं म्हणतात, रिल्स बघतो, चॅटिंग करतो किंवा गेमिंग करतो. आणि मग सकाळी शाळा- कॉलेजमध्ये?
पेंगतो.

झोप पूर्ण होत नाही, अभ्यासात लक्ष लागत नाही, चिडचिड वाढते. अपुऱ्या झोपेमुळे डोळ्याखाली काळी वर्तुळं येतात, पचन संस्थेचे प्रश्न तयार होतात, त्याचा चेहऱ्याच्या त्वचेवर परिणाम होतो. आणि मग या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे टीन्स आणि तरुणही स्वतःच्या इमेजशी भांडत बसतात, संघर्ष करत राहतात. एक झोप वेळेवर आणि पुरेशी झाली तर कितीतरी प्रश्न सहज सुटू शकतात पण ना ते मोठ्यांच्या लक्षात येतं ना लहान मुलांच्या!
मोबाईलमुळे झोपेशी वैर नकोच.

आणखी वाचा: मुलांचा स्क्रीन टाईम पालकांमुळे वाढतोय का?

चार सोप्या युक्त्या करुन हे सगळं टाळता येऊ शकेल.
१) झोपायच्या अर्धा तास आधी फोन बंद करा. म्हणजे स्विच्ड ऑफ करा. मुलांचे फोन तर आपण सहज स्विच्ड ऑफ करू शकतो. जेणेकरून त्यांना शांत झोप मिळू शकेल.
२) मोठ्यांना फोन स्विच्ड ऑफ करणं शक्य नसेल तर त्यांनी फोनचा डेटा, वायफाय बंद करुन टाकावं. म्हणजे तुम्ही आपोआप ऑफलाईन जाता आणि आभासी जगात सतत चोवीस तास जे काही सुरु असतं त्यापासून मेंदूला जरा विश्रांती मिळून तुम्हाला शांत झोप लागू शकते.
३) आपल्या फोनमधल्या डिजिटल वेल बीइंग विभागात bedtime mode असा एक पर्याय असतो. तो सुरू करायचा. तुम्ही तुमच्या फोनच्या झोपेचं शेड्युलही लावू शकता. उदा. रात्री १० ते सकाळी ७ तुमचा फोन झोपलेला असेल. फोन वाजलाच नाही की तो उघडून बघण्याचा मोह आपोआप टाळता येतो. हा मोड ऑन केला की तुमचा स्क्रीन ग्रे होईल, तसंच तुम्ही जर सीरिअल, सिनेमा बघत असला तर त्याचा फक्त आवाज ऐकू येतो. चित्र दिसणं बंद होतं. थोडक्यात फोन सांगतो आता झोपा.
४) फोनमधली सगळी नोटिफिकेशन्स बंद करा. व्हॉट्सअप, बातम्या, सोशल मीडिया कशाचीही नोटिफिकेशन्स सुरू ठेऊ नका. यामुळे एकतर तुमचा फोन सतत वाजणार नाही. रात्रीच्या वेळीही वाजणार नाही आणि झोपेवर परिणाम होणार नाही.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smartphone has become hindrance in good slip hldc psp
Show comments