भारतात हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. विशेषत: तरुणांमध्ये ही समस्या वेगाने वाढतेय. यात दारू, सिगारेट ओढणारे आणि लठ्ठपणाचा सामना करणारे तरुण या आजाराचे सर्वाधिक बळी ठरत आहेत. या आजारामागे तणाव, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, नैराश्य, अपुरी झोप, व्यसन अशी अनेक कारणे सांगितली जातात. याच विषयावर इंडियन एक्सप्रेसशी बोलताना मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिनचे सल्लागार डॉ. बिक्की चौरासिया यांनी सविस्तर माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी एका हाय ब्लड प्रेशरग्रस्त रुग्णाचे उदाहरण देत त्यातून लवकरात लवकर बरे होण्यासाठी उपाय सुचवले आहेत.
डॉ. बिक्की चौरासिया यांनी सांगितले की, अजय केरकर नामक एका ३० वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियरला काही दिवसांपासून फ्लूसारखी लक्षणे दिसून येत होती, ज्यावर डॉ. बिक्की यांनी उपचार केले. सुरुवातीला रुग्णाची सामान्य तपासणी करत त्याचे ब्लड प्रेशर मोजण्यात आले. यावेळी 143/90 mmHg रीडिंगच्या सामान्य पातळीपेक्षा त्याचे ब्लड प्रेशर जास्त असल्याचे आढळून आले.
यावेळी डॉ. चौरासिया यांनी रुग्णाच्या इतर लक्षणांकडे पाहिले तेव्हा त्यांचा संशय अधिकच बळावला. रुग्णाचे वजन ९० किलो आणि बॉडी मास इंडेक्स (BMI) २९ असल्याने त्याला ब्लड प्रेशरचा धोका असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. संबंधित रुग्ण अतिशय खराब जीवनशैली जगत असल्याचेही यावेळी समोर आले. हा रुग्ण दिवसातून १० सिगारेट ओढायचा आणि आठवड्यातून एकदा २०० मिलीमीटर दारू प्यायचा. शिवाय त्याच्या कुटुंबातही ब्लड प्रेशरचा इतिहास होता. यात तो सतत बैठ्या पद्धतीने काम करायचा आणि त्याने आजवर कधीही ब्लड प्रेशर चेक केले नव्हते. त्यामुळे हा रुग्ण ब्लड प्रेशरची कोणतीही लक्षणे दिसत नसलेल्या भारतीयांचे प्रतिनिधित्व करणारा ठरला आहे. कारण भारतात असे अनेक लोक आहेत, ज्यांना ब्लड प्रेशरची कोणतीही थेट लक्षणे दिसत नाहीत; पण त्यांना याचा सर्वाधिक धोका आहे.
अशा रुग्णांना ब्लड प्रेशरची पातळी वाढूनही अस्वस्थता जाणवत नाही. अशा परिस्थितीत जर रुग्णाची योग्य तपासणी केली नाही तर नकळत त्याला हृदयविकार होऊ शकतो. ज्यामध्ये हृदयविकाराचा झटका येणे, स्ट्रोक किंवा किडनीसंबंधित आजार वाढण्याचीही शक्यता असते. अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेने हायपरटेन्शन आजाराबाबत एक धक्कादायक अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार, भारतातील केवळ ३७ टक्के भारतीयांनाच हाय ब्लडप्रेशरचे निदान होते आणि यातील केवळ ३० टक्केच रुग्ण योग्य उपचार घेतात असे दिसून आले.
यावर कामाचा अतिरिक्त ताण आणि दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करून देण्यासाठी असलेला दबाव यामुळे हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढल्याचे रुग्ण केरकर म्हणाले. हा आजार वृद्धापकाळात होणारा आजार मानला जातो, त्यामुळे बहुतेक रुग्ण त्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास असल्याचे मान्य करण्यास नकार देतात. यात जेव्हा तणावग्रस्त रुग्णाचा ब्लड प्रेशर डॉक्टरांसमोर रेकॉर्ड केला जातो, तेव्हा त्याला व्हाईट कोट सिंड्रोम म्हणतात.
यावर सविस्तर माहिती देण्यासाठी डॉ. चौरासिया यांनी रुग्णांच्या शरीराला २४ तास चालणारे बीपी मॉनिटरिंग डिव्हाइस जोडले, जे दिवसभर ब्लड प्रेशरसह विविध क्रियाकलाप, तणावाचा कालावधी आणि विश्रांतीच्या टप्प्यांची माहिती गोळा करते. ज्यामुळे त्यांना केरकर यांच्यासारख्या रुग्णावर उपचार करण्यास मदत मिळाली.
यात ज्यांचे ब्लड प्रेशर रीडिंग १४२ ते १४६ mmHg पर्यंत सिस्टोलिक आहे, त्यांना स्टेज १ ब्लड प्रेशरचा धोका असतो. या अवस्थेत घरी आराम करूनही काही रुग्णांना बरं वाटत नाही, असं डॉ. चौरासिया म्हणाले.
हाय ब्लड प्रेशरवरील युरोपियन आणि अमेरिकन दोन्ही मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 140-159/80-89 mmHg रीडिंग असेल तर हा स्टेज १ ब्लड प्रेशर मानले जाते, 160-179/90-99 mmHg रीडिंग असल्यास स्टेज २ आणि 180/100 mmHg दरम्यान रीडिंग असल्यास स्टेज ३ चा ब्लड प्रेशर आहे असे मानले जाते. ब्लड प्रेशरच्या पहिल्या स्टेजमध्ये रुग्णाला जीवनशैलीतील चांगले बदल करण्याचा आणि निरोगी आहार घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. यात केरकर या रुग्णास डॉक्टरांनी आहारात फळे, भाज्या, शेंगा आणि मांस, शून्य ट्रान्स फॅट्स खाण्याचा सल्ला दिला. याशिवाय मिठाचे सेवन कमी करणे आणि धूम्रपान आणि मद्यपान सोडण्याचाही सल्ला दिला. तसेच रुग्णाला आठवड्यातून पाच दिवस ३० मिनिटे सामान्य चालण्याचा किंवा जॉगिंग करण्याचाही सल्ला दिला. यात ताणतणाव नियंत्रित करण्यासाठी त्यांनी योगासने करावी, असेही डॉ. चौरासिया म्हणाले.
पण, केरकर यांनी सुरुवातीला फारसे प्रयत्न केले नाहीत; ज्यामुळे त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा दिसून आली नाही. यात त्यांना धूम्रपान आणि मद्यपान सोडण्यास खूप त्रास होत होता. यावेळी डॉक्टरांनी त्याला आणखी काही काळ त्याने अशाच प्रकारचे प्रयत्न करत राहिले पाहिजे असा सल्ला दिला.
ज्यानंतर रुग्ण चांगले खाऊ लागला, आठ तास झोपू लागला आणि नियमित व्यायाम करू लागला. ज्यामुळे त्याचा ब्लड प्रेशरचा त्रास कमी होत होता. परंतु, त्याच्या अनुवांशिक इतिहासामुळे कधीतरी हा त्रास अचानक वाढायचा. यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यावेळी डॉक्टरांनी त्याला दिवसातून एकदा एक लहान गोळी खाण्यासाठी दिली, ज्यामुळे कालांतराने त्याचे ब्लड प्रेशर रीडिंग 132/72 mmHg इतके चांगल्या स्थितीत येऊन पोहोचले, असे डॉ चौरासिया सांगतात.
डॉ. चौरासिया यांनी ब्लड प्रेशरसाठी दिल्या जाणाऱ्या औषधांच्या बाबतीत म्हटले की, ब्लड प्रेशरच्या औषधांचा लिपिड प्रोफाइल, थायरॉईड आणि किडनी फक्शन चाचण्यांसारख्या इतर गोष्टींशी जुळवून घेणारा असावा. कारण ब्लड प्रेशरचे एकच औषध सर्वांना दिले जाऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक केस समजून घेत ही औषधं कॅलिब्रेट केली पाहिजेत. यासाठी रुग्णाला आधी एका डोसने सुरुवात केली जाते. यानंतर एक गोळी दोन डोसमध्ये दिली जाते, नंतर दुसरी गोळी दिली जाते, पुन्हा दोन डोससह आणि त्यानंतर पुढे रुग्णाची स्थिती पाहून औषधं दिली जातात, असे डॉ. चौरासिया म्हणाले.
यावेळी ते आणखी एका महत्वाच्या मुद्द्यावर जोर देत म्हणाले, जेव्हा ब्लड प्रेशर नियंत्रित करण्याचा विचार येतो, तेव्हा औषधे केवळ ५० टक्के आजार बरा करण्याचे काम करतात. उर्वरित ५० टक्के आजार हा जीवनशैलीतील बदल आणि वैयक्तिक प्रयत्नातून बरा केला पाहिजे. या ५० टक्क्यांच्या प्रयत्नाशिवाय कोणतीही महागडी औषधं तुम्हाला वाचवू शकत नाही. यात ब्लड प्रेशर लेव्हलचे निरीक्षण करणे आणि तुमच्या डॉक्टरांच्या संपर्कात राहणे हे महत्त्वाचे आहे.
डॉ. चौरासिया यांनी नमूद केले की, केरकर या रुग्णाने दारू, सिगारेटचे व्यसन असतानाही चांगल्या प्रकारे स्वत:ला रिकव्हर केले. यासाठी निरोगी जीवनशैलीसह तो डॉक्टरांकडे जात राहिला आणि औषधे वेळेवर घेतली. त्यामुळे आज त्याचा ब्लड प्रेशरचा आकडा स्थिर आहे.
यात किडनी खराब होण्याच्या भीतीने बहुतेक जण ब्लड प्रेशरची औषधे अर्धवट सोडून देतात. यात अनेकांना वाटते की, ब्लड प्रेशरची औषधे एकदा घेण्यास सुरुवात केली की ती आयुष्यभर घ्यावी लागतात. पण, लोकांनी असा विचार न करता, डॉक्टरांकडे जाऊन वेळोवेळी स्क्रीनिंग केले पाहिजे, ज्यामुळे कोणतीही गंभीर स्थिती उद्धवण्याचा धोका कमी होतो, असेही डॉ. चौरासिया यांनी नमूद केले.