Smoking and Hair Fall : केस गळणे ही खूप मोठी समस्या आहे. अनेक जण केसगळतीच्या समस्येमुळे त्रासलेले दिसून येतात. केसगळतीची अनेक कारणे असू शकतात. पण, तुम्हाला माहीत आहे का की, धूम्रपानामुळेही केस गळू शकतात. डर्मेटोलॉजिस्ट डॉ. किरण नाबर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना धूम्रपानाचा केसांवर कसा दुष्परिणाम होतो, याविषयी सविस्तरपणे सांगितले आहे.
धूम्रपानामुळे केस का गळतात?
डॉ. नाबर सांगतात, “धूम्रपानामुळे केस गळतात. धूम्रपानामध्ये निकोटीन असते आणि धूम्रपानानंतर कार्बन मोनॉक्साइड बाहेर पडतो; ज्याचा केस आणि हेअर फॉलिकलच्या पेशींवरही दुष्परिणाम होतो. त्यामुळे केस गळतात.
तिसरे कारण म्हणजे धूम्रपानामुळे आपल्या शरीरातील इस्ट्रोजन पातळी कमी होते. परिणामत: केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या इस्ट्रोजनची कमतरता निर्माण झाल्यामुळे केस गळतात. त्यामुळे धूम्रपानामुळे केस गळतात, हे सत्य आहे.
केसगळतीस धूम्रपानातून उद्भवलेली कोणती परिस्थिती कारणीभूत?
डॉ. नाबर सांगतात, “तंबाखूचे सेवन केलं की, दूषित वायू तयार होतात आणि त्यातून निकोटीन बाहेर पडतं. त्यामुळे केस गळतात.
विदर्भात खर्राचं सेवन अधिक केलं जातं. त्याविषयी बोलताना डॉ. सांगतात, “खर्रा खाल्ल्यानंही केस गळू शकतात. जे दीर्घकाळ धूम्रपान करतात, त्यांना केसगळतीला सामोरं जावं लागतं.”
हेही वाचा : ब्रेड पकोडा की बेसनाचे धिरडे; काय खाणे जास्त चांगले? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
धुम्रपानाचे केसांवर होणारे अन्य परिणाम
डॉ. नाबर पुढे सांगतात, “धूम्रपानामुळे केस गळण्याशिवाय केस पांढरे होऊ शकतात. जे लोक दिवसातून १०-१५ वेळा सिगारेट ओढतात आणि दीर्घकाळ व्यसन करतात, त्यांना या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्याशिवाय धूम्रपान करणारे लोक वयाच्या तुलनेत लवकर वृद्ध दिसू लागतात.
हल्ली महिलांमध्येही धूम्रपानाचे प्रमाण वाढलेलं आहे. अशात धूम्रपानाचा महिला किंवा पुरुष यांच्यावर समान दुष्परिणाम दिसून येतो. धूम्रपान जर दीर्घकाळ सुरू असेल, तर केसांप्रमाणेच त्वचेवरही दुष्परिणाम दिसून येतो. त्याशिवाय हृदयाशी संबंधित आजार, तसेच फुप्फुसाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.”
धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीने केसांची काळजी कशी घ्यावी?
धूम्रपान हे केसांवर होणाऱ्या दुष्परिणामांच्या अनेक कारणांपैकी एक कारण आहे. बदलती जीवनशैली, धावपळीचे आयुष्य, ताणतणाव, चुकीचा आहार यांमुळेही केसांवर दुष्परिणाम दिसून येतो.
केसगळतीचे मुख्य कारण आनुवंशिकता होय. जर तुमच्या वडिलांना किंवा मामांना टक्कल असेल आणि तुम्हालाही कमी वयात टक्कल पडले, तर त्याला आनुवंशिकता म्हणतात. त्यामुळे हल्ली तरुणांना २०-२५ व्या वर्षीच टक्कल पडायला सुरुवात होऊ शकते. चांगला आहार न घेणे, ताणतणाव, व्यायामाचा अभाव या गोष्टीसुद्धा केसगळतीसाठी कारणीभूत असू शकतात.
केसांमधील कोंड्यामुळेही केस गळू शकतात. तसेच ज्या लोकांना करोना, डेंग्यू, मलेरिया यांसारखे गंभीर आजार झाले असतील किंवा काही लोक डाएट करताना ५० टक्के खाणे बंद करतात; ज्याचा केसांच्या वाढीवर दुष्परिणाम होऊ शकतो.
हेही वाचा : फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी सीताफळ खाण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे, डॉक्टरांकडून जाणून घ्या…
डॉ. नाबर सांगतात, “केसांचं आयुष्य हे चार वर्षांचं असतं; पण केस चार वर्षं न राहता लवकर गळतात. एकदा केस गळल्यानंतर पुढचा केस तीन महिन्यांनी येतो आणि जुन्या केसांना पुढे ढकलतो आणि त्यामुळे अचानक केसगळती सुरू होते. आजार, सर्जरी, उपवासामुळे किंवा अचानक ताणतणाव जाणवणे यामुळेही केस गळू शकतात.”
डॉ. नाबर पुढे सांगतात, “आनुवंशिकतेमुळे केस गळत असतील, तर तुम्ही समजून घ्या की, तुम्हाला दीर्घकाळ उपचार घ्यावा लागणार आहे. त्यासाठी तुमची तयारी असणे आणि तुम्ही हेल्दी लाइफस्टाईल स्वीकारणे खूप आवश्यक आहे. धूम्रपान करणे टाळा, चांगली झोप घ्या, चांगला आहार घ्या. या सर्वांमुळे केसगळती थांबू शकते.”