मासिक पाळी हा स्त्रियांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. दरमहा स्त्रियांना मासिक पाळीचा सामना करावा लागतो. काही स्त्रियांना या दरम्यान खूप भयंकर त्रास होतो. अंगदुखी, डोकेदुखी, ताप इत्यादीमुळे स्त्रियांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो, तर काही स्त्रियांना नियमित मासिक पाळीसुद्धा येत नाही, त्यामुळेसुद्धा त्यांच्या शरीरावर गंभीर परिणाम दिसून येतो. मासिक पाळीदरम्यान त्रास जाणवल्यास डॉक्टर अनेकदा विश्रांती घेण्यास सांगतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतेच केंद्रीय महिला आणि बालविकास (WCD) मंत्री स्मृती इराणी यांनी ‘मासिक पाळी’साठी भरपगारी सुट्टी देण्यावरून काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केले होते. महिलांना मासिक पाळीच्या काळात रजा मिळावी की नाही, यावर संसदेत बोलताना स्मृती इराणी यांनी कोणत्याही भरपगारी रजेचा विचार करीत नसल्याचं सांगितलं. मासिक पाळीदरम्यान सुट्टी दिल्यास भेदभावाला प्रोत्साहन दिलं जाईल, असे मत त्यांंनी व्यक्त केले होते.
त्या म्हणाल्या, “मी मासिक पाळी येणारी स्त्री म्हणून सांगते, मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नाही. हा स्त्रियांच्या जीवनाचा नैसर्गिक भाग आहे. त्यांना मासिक पाळीदरम्यान भरपगारी सुट्टी दिली तर स्त्रियांना समान संधी मिळणार नाही. त्यामुळे अशा गोष्टी मांडू नयेत, कारण- ज्यांना मासिक पाळी येत नाही, त्यांचा त्याविषयीचा विशिष्ट दृष्टिकोन असतो.”

आम्ही जर तुम्हाला विचारलं की मासिक पाळीदरम्यान महिलांनी कामापासून दूर राहून सुट्टी घेणे गरजेचे आहे का? तर तुमचे उत्तर काय असेल. लोकसत्ताने या संदर्भात महिलांशी संवाद साधला होता. याबाबत विविध क्षेत्रातील अनेक महिलांनी आपली मते व्यक्त केली होती. “मासिक पाळी हा स्त्रियांच्या जीवनचक्रातील एक भाग आहे. एखाद्या स्त्रिला या दरम्यान त्रास होत असेल तर तिला पगारी सुट्ट्या मिळायला हव्यात”, असे मत या महिलांनी मांडले होते. तुम्हाला काय वाटते, मासिक पाळीदरम्यान महिलांना खरंच विश्रांतीची आवश्यकता आहे? आणि आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर खरंच महिलांनी पाळीदरम्यान अनिवार्य सुट्ट्या घेणे गरजेचे आहे का? चला तर जाणून घेऊ या.

मासिक पाळीदरम्यान खरंच महिलांना विश्रांतीची आवश्यकता आहे? या संदर्भात लोकसत्ताने तज्ज्ञांचे मत जाणून घेतले.

प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार लोकसत्ता डॉटकॉमशी बोलताना सांगतात, “प्रत्येक महिलेची समस्या ही वेगवेगळी असू शकते. मासिक पाळीत जर काही महिलांना त्रास होत असेल, पोट खूप जास्त दुखत असेल किंवा खूप जास्त रक्तस्त्राव होत असेल तर त्यांना विश्रांतीची गरज भासू शकते; पण याचा अर्थ सरसकट प्रत्येक व्यक्तीला विश्रांतीची गरज भासेलच असे सांगता येणे कठीण आहे. जर एखाद्या व्यक्तीला सांगण्यात आले की, आवश्यकता नसताना तुम्हाला विश्रांती घेणे अनिवार्य आहे किंवा ज्यांना गरज आहे त्यांना विश्रांतीसाठी सुट्टी दिली नाही तर हा अन्याय होऊ शकतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर हे त्या व्यक्तीवर आणि त्या व्यक्तीच्या आरोग्यावर अवलंबून आहे. सरसकट कोणत्याही प्रकारचे विधान योग्य धरले जाणार नाही. मासिक पाळी हा स्त्रियांचा शरीरधर्म आहे, त्याला काही पर्याय नाही.”

हेही वाचा : महिलांनो, सॅनिटरी पॅडमुळे अ‍ॅलर्जी होते का? मासिक पाळीदरम्यान पॅड वापरताना कोणती काळजी घ्यावी? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….

मासिक पाळीदरम्यान महिलांनी कोणती काळजी घ्यावी?

डॉ. निखिल दातार सांगतात, शारीरिक स्वच्छता पाळणे खूप गरजेचे आहे. मासिक पाळीदरम्यान शारीरिक स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. मासिक पाळीचे व्यवस्थापन करताना आपण ज्या गोष्टी वापरतो, त्या गोष्टी स्वच्छ असायला हव्यात. कोणताही संसर्ग होता कामा नये, याची काळजी घ्यावी. या वस्तूची योग्य प्रकारे विल्हेवाट लावताना पर्यावरणाच्या दृष्टीने कोणतीही हानी होणार नाही, याची काळजी घेणे सामाजिक बांधिलकीचा भाग आहे. शारीरिक स्वच्छता ही स्वत:च्या बाबतीत घेतली जाणारी काळजी आहे.”

ते पुढे सांगतात, “या दोन गोष्टींची काळजी घेताना एक स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून नक्कीच सांगेन की, आपल्या देशात अजूनही या दरम्यान त्रास होताना किंवा मासिक पाळीदरम्यान रक्तस्त्राव होतानासुद्धा स्त्रिया अंगावर दुखणे काढतात. यावर उपचार घ्यायला पुढे येत नाही, ही मोठी समस्या आहे. पण, जेव्हा त्रास होत असेल तेव्हा त्यांनी हे आपलं नेहमीचं दुखणं आहे असं गृहीत न धरता त्याच्यावर आवश्यक उपचार घेतले पाहिजे किंबहुना मासिक पाळीत अतिरक्तस्राव झाल्यामुळे शरीरात रक्त कमी होणे, अशा बऱ्याच समस्या जाणवू शकतात. त्यामुळे फक्त मासिक पाळीदरम्यान काळजी न घेता संपूर्ण आरोग्याची काळजी घ्यावी. आहार, व्यायाम अशा सर्व गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. जर मासिक पाळीत समस्या असेल तर त्यावर नक्कीच उपचार घेणे आवश्यक आहे, पण त्या उपचारासाठी पुढे येणे आणि घरातल्यांनी त्यांना सहकार्य करणे, हेही गरजेचे आहे.”

खरंतर मासिक पाळीदरम्यान सुट्टी मिळणे हा एक वेगळा मुद्दा आहे, पण डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, जर या दरम्यान त्रास होत असेल तर विश्रांती घेणे तितकेच गरजेचे आहे. मासिक पाळी हा महिलांच्या जीवनचक्रातील एक महत्त्वाचा भाग आहे. याचा आदर करून स्त्रियांच्या आरोग्याला प्राधान्य देणे हे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smriti irani statement against period leaves do really women need rest during periods read what gynecologist said ltdc ndj