मानसिक अस्वस्थता ही एक मानसिक आरोग्यस्थिती आहे, ज्यामध्ये इतर लोक काय म्हणतील याचा जास्त विचार केला जातो. मानसिक अस्वस्थतेने ग्रस्त असलेल्या रुग्णांना अनेकदा लोकांना भेटता येत नाही, बोलता येत नाही आणि जगाशी जुळवून घेता येत नाही असे वाटते. मात्र, आता त्यांच्यावर उपचार करण्यासाठी शरीराच्या घामाचा वापर करता येऊ शकतो. होय, एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, इतर लोकांच्या शरीराचा वास घेतल्याने मानिसक अस्वस्थता कमी होऊ शकते.
संशोधनासाठी बगलेतील घामाचा केला वापर
स्वीडनमधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून समोर आलेल्या निष्कर्षांमुळे ते स्वतःच थोडे आश्चर्यचकित झाले आहेत. मानवी ‘केमो-सिग्नल्स’च्या मदतीने मानिसक अस्वस्थता कमी करता येऊ शकते, असे या अभ्यासात म्हटले आहे. म्हणजेच मानवी शरीराचा गंध आपला आनंद किंवा चिंता यांसारख्या भावनिक अवस्था दर्शवू शकतो. या अभ्यासासाठी, संशोधकांनी काही सहभागींना आनंदी आणि भीतिदायक चित्रपट पाहताना त्यांच्या बगलेतील घामाचे नमुने जमा करण्यास सांगितले.
हेही वाचा : डोकेदुखी-मायग्रेनसाठी गुणकारी आहे पेपरमिंट तेल, जाणून घ्या इतर फायदे?
मानसिक अस्वस्थतेने ग्रस्त महिलांवर संशोधन केले
संशोधकांनी मानसिक अस्वस्थतेने ग्रस्त असलेल्या ४८ महिलांना पारंपरिक माइंडफुलनेस थेरपी देण्यासोबत बगलेतील घामाच्या काही नमुन्यांचा वास घेण्यास सांगितले. वास घेण्यासाठी काही स्त्रियांना घामाचा वास देण्यात आला होता, तर काहींना त्याऐवजी शुद्ध हवा देण्यात आली होती. ज्यांनी घामाचा वास घेतला त्यांच्यावर थेरपीचा प्रभाव अधिक चांगला दिसून आला.
घामाचा वास घेण्यामुळे माइंडफुलनेस थेरपी ठरते अधिक प्रभावी
अभ्यासात असे म्हटले आहे की, माइंडफुलनेस थेरपीसह घामाचा वास घेतल्यामुळे मानसिक अस्वस्थता सुमारे ४० टक्क्यांनी कमी होते. बीबीसीच्या अहवालानुसार, ते या आठवड्यात पॅरिसमधील वैद्यकीय परिषदेत त्यांचे काही प्रारंभिक निष्कर्ष सादर करत आहेत.
हेही वाचा : कांदा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते का? काय सांगतात संशोधक, जाणून घ्या
संशोधकांनी अभ्यासाबाबत काय सांगितले?
अभ्यासानुसार, कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटच्या प्रमुख संशोधक एलिसा विग्ना यांनी सांगितले की, “आनंदी व्यक्तीच्या आणि घाबरलेल्या व्यक्तीच्या घामाचा गंध सारखाच असतो. त्यामुळे घामातील मानवी फेरोमोनशी संबंधित काही गोष्टी असू शकतात, ज्यांचा उपचारांना मिळणाऱ्या प्रतिसादावर परिणाम होतो.
“दुसर्या कोणाच्या फक्त उपस्थितीमुळे हा परिणाम होऊ शकतो, असेही असू शकते; परंतु आम्हाला याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. खरे तर, आम्ही आता अशाच डिझाइनसह फॉलो-अप अभ्यासात याची चाचणी घेत आहोत.”