Date Health Benefits: खजूर हा शुष्क प्रदेशातील मेवा आज प्रत्येक घरात पाहायला मिळतो. फायबरची खाण म्हणून ओळखला जाणारा खजूर हा पोषक सत्वांचा खजिना आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खजूर हा अत्यंत गुणकारी मानला जातो. अनेक आहारतज्ज्ञ हा सल्ला देतात की तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात निदान दोन खजुरांनी करायला हवी. दुपारच्या वेळी जेव्हा तुम्हाला छोटी भूक लागते तेव्हाही चिवडे, चकल्या खाण्यापेक्षा आपण खजूर खाल्ल्यास भूक नियंत्रणात राहू शकते.
खजूर भिजवून खाणे फायद्याचे आहे का?
भिजवल्याने खजूरमध्ये असलेले टॅनिन किंवा फायटिक अॅसिड काढून टाकले जाते ज्यामुळे आपल्याला रक्तात पोषकद्रव्ये सहजपणे शोषून घेतले जातात. भिजवल्याने खजूर पचण्यासही मदत होते.
आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार सावलिया सांगतात की, “खजूर खाण्यापूर्वी 8-10 तास आधी भिजवून ठेवल्यास त्याचा सर्वाधिक लाभ होऊ शकतो. शक्य असल्यास रात्री झोपण्याच्या आधी खजूर भिजवून ठेवावेत. यामुळे आपल्याला नेमका काय फायदा होऊ शकतो हे जाणून घेऊयात..
खजूर भिजवून खाल्ल्याने स्टॅमिना वाढतो का?
हेल्थसाईटच्या माहितीनुसार, खजुराचे सेवन हे लैंगिक इच्छा व स्टॅमिना वाढवण्यात गुणकारी ठरू शकते. पुरुषांच्या स्पर्मची गुणवत्ता वाढवण्यासाठी खजूर अत्यंत फायदेशीर मानले जातात.
खजूर भिजवून खाण्याचे महत्त्वाचे फायदे
- पोट स्वच्छ ठेवण्यास मदत
- हृदयाचे आरोग्य सुधारण्यात मदत
- कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवू शकतो
- हाडांचे आरोग्य सुधारण्यात मदत
- रक्तदाब नियंत्रित करण्यास गुणकारी
- मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत होते
- थकवा दूर होण्यास उत्तम पर्याय
- अॅनिमियासाठी सर्वोत्तम ठरू शकतो
- वजन वाढण्यासाठी मदत होऊ शकते
- मूळव्याधाचा धोका टळू शकतो
- जळजळ ऍसिडिटी कमी करू शकते
- निरोगी गर्भधारणेसाठी फायदेशीर ठरू शकते
- त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरू शकते
हे ही वाचा<< तुमच्या रक्त गटानुसार वजन कमी करण्यासाठी काय खावे काय खाऊ नये? पाहा तज्ज्ञांचा डाएट तक्ता
लहान मुलं खजूर खात नसल्यास काय करावे?
अनेकदा लहान मुलं खजूर खाण्यात टाळाटाळ करतात. यामुळेच अलीकडे अनेक लहानग्यांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता जाणवते. याशिवाय वजन, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही खजुराची मोठी मदत होऊ शकते. अलीकडे बाजरात खजुराचे विविध चविष्ट स्नॅक्स मिळतात, अगदी खजुराच्या चॉकलेट पासून ते चिक्की पर्यंत सगळं काही तुम्हाला एरवी खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांपेक्षा अधिक पोषण देऊ शकते. अर्थात यावेळी गुणवत्ता तपासून घेण्यात चूक करू नका.
(टीप: काही अपवादात्मक स्थितीत खजूर खाणे अपायकारक ठरू शकते, वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे ठरेल)