जेन झी आणि आता जेन अल्फा म्हणजेच किशोरवयीन आणि त्याही नंतरची (प्री टिन म्हणजे जेन अल्फा) पिढी फेसबुकवर नाही. ट्विटरही ती क्वचितच वापरताना दिसते. ही पिढी इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, डिस्कॉर्ड, व्हॉटपॅड अशा त्यांच्या पिढीच्या समाज माध्यमांवर आहे. पिढीनुसार समाज माध्यमे वापरण्यात बदल झालेले दिसतात कारण मुळात प्रत्येक पिढीच्या व्यक्त होण्याच्या गरजा, त्यामागचा विचार, समाज माध्यम एप्समधले निरनिराळे फीचर्स वापरण्याची उत्सुकता वेगवेगळी असते. मी जसजसा समाज माध्यमे आणि मुलं यांचा अभ्यास सुरु केला तसतसं माझ्या लक्षात येत गेलं की समाज माध्यमेही एक प्रकारचे गेमिंग प्लॅटफॉर्म्सचं आहेत. मुलांना त्यांच्या जगाची समाज माध्यमे आवडतात कारण एखादा गेम खेळावा तशी ती वापरता येतात. खरंतर हे मोठ्यांच्या जगाच्या बाबतीतही तितकंच खरं आहे.
आणखी वाचा: Mental Health Special: शाळकरी मुलांहाती मोबाईल: फायद्यापेक्षा …
समाज माध्यमांवर वावरताना आपल्यापैकी अनेक जण एखादा ‘अवतार’ घेतात. म्हणजे ऍनिमेशन अवतार तर घेतातच पण; आपण जसे आहोत तसे न दाखवता एक वेगळं रुप (इमेज) घेऊन या माध्यमांवर वावरत असतात. जाणीवपूर्णक समाज माध्यमांसाठी एक असं व्यक्तिमत्व तयार करतात जे त्यांचं नाहीये, पण समाज माध्यमांवर वावरण्यासाठी आणि जास्तीतजास्त लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी उपयोगाचं आहे. म्हणजे हे गेम्स सारखंच झालं ना, एखादी गोष्ट मिळवण्यासाठी मग इतर अनेक गोष्टी करत राहणं. हे चांगलं की वाईट/चुक की बरोबर या दृष्टिकोनातून किंवा ‘जजमेंटल’ होत याकडे थोडावेळ बघायला नको. एखादा गेम जसा आपण ऑनलाईन जगात खेळत असतो, तसंच आपण समाज माध्यम आपल्याही नकळत वापरायला सुरुवात केली आहे. म्हणजे बघा हा, एखादी पोस्ट प्रचंड व्हायरल होते आणि आपल्याला प्रश्न पडतो की यात असं, इतकं भारी काय आहे म्हणून ही पोस्ट इतकी व्हायरल झाली? ती पोस्ट व्हायरल होते कारण क्लिकबेटच्या नावाखाली काहीतरी ‘मिसलिडिंग’ हेडिंग बनवलेलं असतं. किंवा फोटो असा बदललेला असतो की बघणाऱ्याला त्यावर क्लिक करण्याची इच्छा झालीच पाहिजे. गेमिंगमध्ये खेळणारा सतत पुढे जावा यासाठी ट्रिगर्स पेरलेले असतात. तसेच ते समाज माध्यमांवरही असतात.
आणखी वाचा: सर्फिग : हमारी ही मुठ्ठी में आकाश सारा
शेवटी गेमिंग काय किंवा समाज माध्यमे काय, बनवणाऱ्या कंपन्यांसाठी हा व्यवसाय आहे. आणि कुठलाही व्यवसाय नफ्यात व्हायचा असेल तर ग्राहकाने परत परत येणं आवश्यक असतं. ग्राहक परत तेव्हाच येतो जेव्हा त्याला त्यानं घेतलेला अनुभव आवडतो. गेमिंग आणि समाज माध्यमे यावर तो अनुभव ग्राहकांना आवडावा, त्यांच्या पसंतीस पडावा यासाठीचे ट्रिगर असतात. जसं like, Love हे ट्रिगर्सचं आहेत. फॉलोअर्स, व्ह्यूज हा ट्रिगर आहे. जेन झी आणि जेन अल्फा मध्ये स्नॅपचॅट इतकं प्रचंड पॉप्युलर होण्यामागे तिथे असणारे विविध फोटो फिल्टर्स कारणीभूत आहेत. या पिढ्यांना फोटोला फिल्टर्स लावायला आवडतं. यात फोटो अधिक देखणा बनवणं हा हेतू असतोच शिवाय, अनेक विनोदी, स्टिकर्सवाले फिल्टर्स या पिढ्यामध्ये भरपूर वापरले जातात. जे स्नॅपचॅट सारख्या माध्यमावर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. म्हणजे फिल्टर हाही या गेममधला एक ट्रिगरच झाला.
या गेमिफिकेशनचे फायदे तोटे आहेतच. आणि त्याचा परिणाम मुलांवर होतोच आहे. महामारीनंतरच्या हायब्रीड जगण्यात आपण समाज माध्यामांमध्ये आहोत म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्याची आणि मुलांना समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. ‘मला माझ्या मनातलं काय वाट्टेल ते शेअर करता येतं’ हा सुद्धा या मोठ्या गेममधला एक महत्वाचा ट्रिगर आहे हे विसरता कामा नये.
‘मनातलं काय वाट्टेल ते’ शेअर करून मग पुढे काय? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तिथपर्यंत पोचता आलं पाहिजे, मुलांना तिथपर्यंत पोचवण्यासाठी मार्ग दाखवला पाहिजे…