मुक्ता चैतन्य
दहावीत शिकणारा मुलगा पालकांनी मोबाईल द्यायला नकार दिला म्हणून आत्महत्या करतो. ही अतिशय अस्वस्थ करणारी घटना आहे. मोबाईल फोनने मोठ्यांच्या आणि मुलांच्याही आयुष्यात उलथापालथ घडवून आणली आहे. मोबाईल आपल्याकडे नसेल तर आपण मागे पडू, आपल्याला मुलं हसतील, नावं ठेवतील, चिडवतील अशा अनेक भावना मुलांच्या मनात एकाच वेळी दाटून येतात, हे अनेकदा दिसून आलं आहे. टीनएजमध्ये निर्माण होणारं नैराश्य हे विविधस्तरीय आहे. आणि आपल्या समाजाचं काळजी करावी असं वास्तव आहे. मोबाईलमुळे नैराश्य तयार होतं की नैराश्यामुळे मोबाईलमध्ये गुंतणं वाढतं हे व्यक्तिसापेक्ष असलं तरी मोबाईलमुळे नैराश्य येऊ शकतं किंवा उलटही घडू शकतं. मुळात टीनएजर मुलांच्या आयुष्यात सगळं आलबेल सुरू नाहीये, हे लक्षात घेणं गरजेचं आहे.
आणखी वाचा: Health Special: सायबरबुलिंग म्हणजे काय?
माणसं कुठली तरी भावनिक गरज पूर्ण करण्यासाठी डिजिटल जगाचा वापर करत असतात आणि मग सततच्या वापरातून या जगावरचं अवलंबित्व तयार होत जातं. टीनएजर मुलांचा विचार करता हा स्व ओळखीचा काळ असतो. आपण नक्की कोण आहोत, आपला लैंगिक अग्रक्रम काय आहे, आपल्याला काय खरंच आवडतं या सगळ्याचा शोध घेणं या काळात सुरु असतं. मतं तयार होण्याचा आणि पक्की होत जाण्याचाही हाच काळ असतो. अशावेळी आजूबाजूचे लोक, मित्रमैत्रिणी, नव्याने ओळख झालेले आपल्याविषयी काय विचार करतात याबाबत टिनेजर्स अतिशय संवेदनशील असतात. सोशल मीडिया या सगळ्यात पातळ्यांवर स्वतःचा शोध घेण्याचा सोयीस्कर पर्याय टीनेजर्सना वाटतो. आपला एखादा फोटो पोस्ट केल्यावर काय प्रतिक्रिया येत आहेत यावरुन मी नक्की कोण आहे, छान आहे का, चांगली दिसते का आदी मतं मुलं आजमावतात.
आणखी वाचा: Mental Health Special: मुलांशी हिंसेबद्दल बोलणार का?
पण सोशल मीडिया हे खऱ्या आयुष्यापेक्षाही उघडंवाघडं जग आहे. इथे फोटोला जसे फिल्टर्स लावता येतात तसेच माणसांच्या मतांनाही लावता येतात. आणि हे फिल्टर्स चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे असतात. म्हणजे तिथे होणाऱ्या कौतुकामुळे जसं छान वाटू शकतं तसंच तिथे वाट्याला येणाऱ्या टीकेमुळे, बुलिंगमुळे प्रचंड निराशही वाटू शकतं. काही टीनेजर्सच्या बाबतीत ऑफलाईन आयुष्यात काही समस्या असेल मग ती कौटुंबिक असो, शाळा कॉलेजमधली असो, त्या समस्येमुळे निराशा येत असेल तर मुलं ऑनलाईन जगात आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात. पण ऑनलाईन जग तुमच्या वाट्याला सगळंच देत असतं. त्यामुळे अनेकदा तिथल्या ट्रोलिंगचा, बुलिंगचा परिणाम म्हणजे आनंदाच्या शोधात अधिकचा त्रासच वाट्याला येतो आणि मुळातच निराश झालेलं मन अधिकच निराश होण्याची शक्यता असते. युनिसेफच्या आकडेवारीनुसार १५ ते २४ वयोगटातील भारतीय तरुण- तरुणी नैराश्याचे सर्वाधिक बळी ठरतात. सामाजिक आणि समवयस्कांकडून स्वीकार ही माणसांची मूलभूत गरज असते. अशावेळी आपल्या मित्रमैत्रिणी किंवा समवयस्कांकडून आपल्याला स्वीकारलं जावं, यासाठीही टीनेजर्स अनेक गोष्टी करत असतात ज्यातून नैराश्य निर्माण होऊ शकतं.
सोशल मीडियाची अजून एक मोठी अडचण म्हणजे इथे काहीच पुरेसं नसतं. आयुष्य, नाती, भटकणं, खाणं- पिणं सतत ‘हॅपनिंग’ दाखवण्याचं प्रचंड प्रेशर या जगात आहे. तुमची पोस्ट हटके असेल तरच तुम्हाला लाईक्स मिळतात. मग ते हटके असणं एखाद्या धोकादायक स्टन्टपासून ते आदर्शवादाच्या जाहीर प्रदर्शनापर्यंत काहीही असू शकतं. इथे सरधोपट काहीही चालत नाही. टीनेजर मुलामुलींच्या बाबतीत हा मुद्दा त्यांच्या नैराश्यात भर घालण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. सुंदर दिसण्याचं, ट्रेण्डी राहण्याचं, हटके गोष्टी करण्याचं सतत आणि प्रचंड प्रेशर मुलांना नैराश्याकडे घेऊन जातंय. काढलेल्या फोटोत काहीही हटके नसेल तर निदान फिल्टर तरी हटके असला पाहिजे. स्व- ओळखीच्या या प्रवासात सोशल मीडिया दुधारी तलवारीचं काम करतो. योग्य पद्धतीने, विचारपूर्वक वापर झाला तर सोशल मीडिया टीनेजर्सना जगातल्या अगणित संधींशी जोडून टाकतो. नाहीतर रील्स, गेमिंग आणि सेल्फीच्या जाळयात अडकवून गुदमरून टाकतो.
मला टीनेजर्सबरोबर काम करताना जाणवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांना ऑफलाईन जग ऑनलाईन जगाइतकं रंजक वाटत नाही. कंटाळ्याची बाधा झालेली ही काही पहिली पिढी नाही. मोबाईल फोन हातात यायच्या आधीच्या पिढ्यांमध्येही तरुण मुलं- मुली सतत कंटाळलेली असायची. पण कंटाळा घालवण्यासाठी स्वतः प्रयत्न केल्याखेरीज तेव्हा पर्याय नव्हता. आज गादीत लोळत कंटाळा घालवण्याचं एक साधन हाताशी आहे. पण त्यामुळे खरंच कंटाळा जातोय की आहे त्यात भर पडतेय हे तपासून पाहायला हवं. कारण सतत दुसऱ्याची निर्मिती बघून बघूनही शिणवटा येतो. फक्त सोशल मीडियाच्या प्रचंड वेगापुढे आणि कॉण्टेन्टच्या तुफान उपलब्धतेपुढे अनेकदा तो लक्षातच येत नाही. डोकं सैतानाचं घर होऊ द्यायचं नसेल तर हाताला काम पाहिजे. टीनेजर्सचा मोबाईलवर जेवढा वेळ जातोय त्याचा हिशेब काढला तर याचं गांभीर्य लक्षात येतं.
टिनेजर्समधील नैराश्य ही मोठी समस्या आहे. त्याचं एकमेव कारण अर्थातच सोशल मीडिया नाही. अभ्यासाचं, अपेक्षित कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळवण्याचा प्रचंड ताण मुलांवर आहे. पालकांच्या आणि स्वतः स्वतःविषयी तयार केलेल्या अपेक्षांचं ओझं आहे. जग रॅट रेसच्याही पलीकडे गेलेलं आहे. नैराश्य हा दुर्लक्षित करावा असा आजार नक्कीच नाहीये. अशावेळी ‘काय झालंय निराश व्हायला?’ असं म्हणण्यापेक्षा आपलं मूल काय सांगू बघतंय हे समजून घेणं आणि त्यासाठी आवश्यक ती मदत घेणं गरजेचं आहे. सोशल मीडियाबद्दल बोलणं गरजेचं आहे. तिथून निर्माण होणारे स्व प्रतिमेचे अनेक मुद्दे उघडपणे मुलांशी बोलले गेले पाहिजेत. मुलांकडे असलेल्या फोनबद्दल, त्यात असलेल्या इंटरनेट आणि सोशल मीडियाबद्दल बोललं गेलं पाहिजे. सोशल मीडियावर आपण एखादी गोष्ट का करायची आणि का करायची नाही हेही बोललं गेलं पाहिजे.
मला आठवतंय, महासाथ संपल्यावर जेव्हा शाळा-कॉलेज सुरू झाली. एका वर्कशॉपनंतर एक तेरा वर्षांची मुलगी मला येऊन भेटली म्हणाली, “ताई मला कसलंच मोटिव्हेशन नाहीये. अमुक एक गोष्ट मी का करायची, त्यासाठी काहीतरी मोटिव्हेशन पाहिजे ना, तेच मला सापडत नाही, त्यामुळे मला काहीही करण्याचा कंटाळा येतो. महासाथीच्या दोन वर्षांनी माझ्यातलं सगळं मोटिव्हेशन संपवून टाकलं आहे.”
असं वाटणारी ती एकटी नाहीये. एका तेरा वर्षांच्या मुलीला माझ्या आयुष्यात कसलं मोटिव्हेशन नाहीये असं वाटणं ही अत्यंत काळजी करावी अशी गोष्ट आहे. आणि काळजी यासाठी करायची कारण असं वाटणारी ती एकटीच नाहीये.