बॉलीवूड अभिनेत्री सोहा अली खान सध्या सिनेसृष्टीपासून दूर असली तरीही ती सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असते. सोहा अली खानने मध्यंतरीच कर्ली टेल्स चॅनेलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने स्वतःच्या फिटनेस आणि आहाराच्या दिनचर्येबद्दल सांगितले होते. त्यात ती म्हणाली होती की, जेव्हा ती झोपेतून उठते तेव्हा रात्रभर खोबरेल तेलात भिजवलेले खजुराचे सेवन करते, तर अर्ध्या तासानंतर काही फळे, चिया पुडिंग आणि नंतर अभिनेत्री जिमला जाते. नंतर जर तिला भूक लागली तर ती डोसा खाते, असे तिने सांगितले आहे.
अभिनेत्री सोहा अली खान ४५ वर्षांची आहे. तसेच तिला असे वाटते की, तिने चाळिशी गाठल्यापासून तिचे शरीर बदलत चालले आहे. जेव्हा अभिनेत्री ४० वर्षांची होती, तेव्हा सुरुवातीच्या काळात तिला अनेक गोष्टी जाणवू लागल्या. उदाहरणार्थ – तिच्या १८ ते २५ वर्षांपर्यंत तिचे वजन एकसारखेच होते आणि आता तिचे वजन अचानक दोन किलोने वाढले आहे. त्यामुळे अभिनेत्रीला असे वाटते की, तिने स्वतःची थोडी काळजी घेणे आवश्यक आहे.
तर अभिनेत्री सोहा अली खानने सांगितल्याप्रमाणे ‘खोबरेल तेलात भिजवलेले खजूर ‘ रिकाम्यापोटी खाण्याचा उपाय खरोखरच शरीरासाठी फायदेशीर आहे का? हे जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटच्या उपमुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनोदा कुमारी यांच्याशी संवाद साधला. डॉक्टरांनी सांगितले की, खजूर रात्रभर खोबरेल तेलात भिजवण्याची अशी कोणतीच प्रथा नाही. अनेक कारणांमुळे ही कल्पना योग्यसुद्धा नाही. सगळ्यात पहिले म्हणजे खजूर नैसर्गिकरित्या गोड असतो आणि त्यामध्ये भरपूर पोषक तत्वे असतात. तरीही त्यांना खोबरेल तेलात भिजवल्यास लिपिडमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल, ज्यामुळे वजन वाढू शकते; असे डॉक्टर कुमारी म्हणाल्या आहेत.
तसेच खोबरेल तेलात खजूर भिजवल्याने त्याच्या आरोग्यदायी फायद्यांमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ होत नाही. MCTs किंवा मध्यम-साखळी ट्रायग्लिसराइड्स ही एक प्रकारची चरबी आहे; जी ऊर्जा पातळी आणि मेंदूच्या कार्यास प्रोत्साहन देते. शिवाय खोबरेल तेलात असलेल्या सॅच्युरेटेड फॅटचे सेवन हे इतर आरोग्यदायी चरबीच्या तुलनेत संतुलित नसेल तर त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो; असे डॉक्टर कुमारी म्हणाल्या आहेत.
खोबरेल तेलात खजूर भिजवल्याने खजुरामधील पोषक घटक कमी होऊ शकतात, असे पोषणतज्ज्ञ व आरोग्य प्रशिक्षक पायल कोठारी यांनी सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार खजुरांमध्ये नैसर्गिकरित्या फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर असतात; जे आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तसेच अशा प्रकारे खजूर खोबरेल तेलात मिसळण्याचा सल्ला कोणालाही दिला जात नाही आणि त्याऐवजी संतुलित आहाराचा भाग म्हणून वैयक्तिकरित्या खजुराचे सेवन करून त्याचा आनंद घ्या. आरोग्यासाठी संपूर्ण प्रक्रिया न केलेले अन्नपदार्थ वापरणे आणि स्वयंपाक करताना किंवा चव वाढवणारे म्हणून नारळ तेलाचा वापर करणे अधिक श्रेयस्कर ठरेल. खारीक पाण्यात भिजवल्यास पचायला सोपे जातात आणि जास्तीत जास्त पोषण शोषण्यास मदत होते; असे डॉक्टर कुमारी यांनी सांगितले आहे.